श्यामकांत जहागीरदार
नवी दिल्ली,
जम्मू-काश्मीरवर सर्वाधिक काळ कोणत्या घराण्याने राज्य केले असेल, तर ते Sheikh Abdullah शेख अब्दुल्ला यांच्या घराण्याने. काश्मीरचा पूर्ण बट्ट्याबोळ कोणी केला तर, तो याच अब्दुल्ला घराण्याने. केंद्रात जशी गांधी घराण्याने दीर्घकाळ सत्ता उपभोगली तसेच जम्मू-काश्मीरमध्ये अब्दुल्ला घराण्याने. केंद्रात काँग्रेसचे पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि नंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले, त्याचप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये आधी शेख अब्दुल्ला, नंतर डॉ. फारुक अब्दुल्ला आणि सर्वांत शेवटी उमर अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्रिपद उपभोगले. गांधी आणि अब्दुल्ला अभद्र युतीने काश्मीरचा प्रश्न कायमस्वरूपी चिघळला आणि त्याची किंमत देशाला वेळोवेळी चुकवावी लागली.
Sheikh Abdullah शेख अब्दुल्ला यांनी तीनवेळा जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्रिपद भूषवले. पहिल्यांदा ते देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ५ मार्च १९४८ रोजी मुख्यमंत्री झाले. ९ ऑगस्ट १९५३ पर्यंत म्हणजे ५ वर्षे १५७ दिवस ते मुख्यमंत्री होते. त्यानंतर तब्बल २२ वर्षांनी शेख अब्दुल्ला मुख्यमंत्री झाले. २५ फेब्रुवारी १९७५ ते २६ मार्च १९७७ असे दोन वर्ष एक महिना ते मुख्यमंत्री होते. तिसर्यांदा ९ जुलै १९७७ ते ८ सप्टेंबर १९८२ या काळात शेख अब्दुल्ला मुख्यमंत्री झाले. यावेळी ५ वर्ष ६१ दिवस ते मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्रिपदावर असतानाच शेख अब्दुल्ला यांचे निधन झाले.
ऑल जम्मू-काश्मीर मुस्लिम हा त्यांचा पहिला राजकीय पक्ष. नंतर त्यांनी या पक्षाचे नाव बदलत जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स असे केले. मात्र, पक्षाचे नाव बदलल्यानंतरही त्यांच्या मुस्लिमधार्जिण्या आणि भारतद्वेष्ट्या भूमिकेत फारसा बदल झाला नाही. जम्मू-काश्मीरचे भारतात विलीनीकरण झाल्यानंतर अब्दुल्ला जम्मू-काश्मीरचे पहिले पंतप्रधान झाले. त्यावेळी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्याला वजिरे आलम म्हणजे पंतप्रधान म्हटले जात होते. त्याची आणि झेंडाही वेगळा होता. याचविरोधात तत्कालीन जनसंघाचे नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ‘एक देश मे दो विधान, दो निशान आणि दो प्रधान’ विरुद्ध आंदोलन करीत आपल्या प्राणाचे बलिदान केले होते.
Sheikh Abdullah शेख अब्दुल्ला काश्मीरच्या स्वयंनिर्णयाचे पुरस्कर्ते होते. भारतविरोधी शक्तींना पाठिंबा दिल्याच्या आरोपावरून केंद्र सरकारने त्यांचे सरकार बरखास्त केले आणि अटकही अब्दुल्ला यांचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. तरी सुद्धा नेहरू यांनी त्यांचे सरकार बरखास्त करीत त्यांना अटक केली. याचाच अर्थ शेख अब्दुल्ला देशविरोधी कार्यात गुंतले असल्याचे भक्कम पुरावे तेव्हा सापडले असावे.