गणेशपेठ बसस्थानकाचे काँक्रिटीकरणाचे काम सुरु

18 Sep 2024 21:23:00
- काँक्रिटीकरणाच्या कामास लागणार दोन महिने
 
नागपूर, 
Ganeshpeth bus station : मध्यवर्ती गणेशपेठ बसस्थानक परिसरात सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. दोन महिन्यात ही सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे बसस्थानकाच्या उजव्या बाजूने जाणार्‍या सर्व बसगाड्या आता आत जाणार्‍या बसच्या मार्गावर असलेल्या प्लॅटफॉर्मवर बसेस राहणार आहे. मुख्यत: बसस्थानक परिसराच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी एमआयडीसीकडे निधी उपलब्ध करून दिला असून काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. गणेशपेठ बसस्थानकावर दररोज अन्य बसस्थानकांवरून मुक्कामी गाड्यांची संख्या सर्वाधिक असते. मात्र, पुढील सूचनेपर्यंत या गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था अन्यत्र करण्यात आली आहे. याशिवाय गणेशपेठ बसस्थानकावर दिलेल्या ठिकाणी बसेसची पार्कींग करून रात्रीच्या विश्रांतीसाठी चालक-वाहक यांना स्थानकावरील विश्रांतीगृहात थांबता येणार आहे.
 
 
ganeshpeth
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागपूरसह काही बसस्थानक परिसराच्या काँक्रिटीकरणाचा निर्णय घेतला. त्यानुसार आता काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आले आहे. याप्रसंगी एसटी महामंडळाच्या गणेशपेठ आगार प्रमुख अनिल आमनेरकर व एमआयडीसीचे अधिकारी आदी उपस्थित होते.पहिल्या टप्प्यात बसेस आत येण्याचे प्रवेशद्वार ते आगारातील डिझेल पंपाच्या भाग या परिसरात काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यानंतर पुढील महिन्यात डाव्या बाजूने काँक्रिटीकरणाचे काम सुरु केल्या जाणार आहे.
 
 
Ganeshpeth bus station : गणेशपेठ बसस्थानकावरील नियोजनानुसार कंधार, नांदेड, माहूर, देगलूर, किनवट, दिग्रस, वणी, पुसद, पांढरकवडा, उमरखेड, लातूर, उदगीर, अहमदपूर, वसमत, छत्रपती संभाजीनगर येथून येणार्‍या बसेस वर्धमाननगर आगारात पार्क कराव्या लागतील. परभणी, बुलढाणा, चिखली, मेहकर, अकोला, वाशीम, दर्यापूर, परतवाडा, वरुड, राजुरा, चिमूर, वरोरा, चंद्रपूर, गोंदिया, पवनी, तुमसर, साकोली येथून येणार्‍या बसेसचे पार्किंग मोरभवन येथे होईल. जळगाव, ब्रह्मपुरी येथील बसेसची पार्किंग व्यवस्था इमावाडा आगारात करण्यात आली आहे. पातूर, अंबड, गडचिरोली, अहेरी येथील बसेस घाट रोड आगारात राहतील. तिरोडा, भंडारा, उमरेड, सावनेर, रामटेक, काटोल येथून नागपुरात मुक्कामी येणार्‍या बसेसचे पार्किंग गणेशपठ आगार येथेच होणार आहे.
Powered By Sangraha 9.0