तीस्ता पाणीवाटपावर बांगलादेश भारताशी चर्चा करण्यास उत्सुक

    दिनांक :02-Sep-2024
Total Views |
ढाका, 
Bangladesh : Teesta water sharing  तीस्ता पाणीवाटप करारावर बांगलादेशच्या अंतरिम सरकारला भारतासोबत चर्चा पुन्हा सुरू करायची आहे, असे जलसंपदा सल्लागार सईदा रिझवाना हसन यांनी ढाका येथे वृत्तसंस्थेला मुलाखत देताना सांगितले. नदीकाठच्या वर व खाली देशांनी पाणी वाटपाबाबतच्या आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. तीस्ता करार व भारतासोबतचे पाणी वाटपाचे इतर करार संवादाद्वारे सौहार्दपूर्णपणे सोडवले जातील, असा विश्वास हसन यांनी व्यक्त केला, परंतु करार होऊ शकला नाही तर, बांगलादेश आंतरराष्ट्रीय कायदेशीर कागदपत्रे व तत्त्वे विचारात घेईल, असे संकेतही त्यांनी दिले.
 
 

SYEDA-RIZWAN-HASAN
 
Bangladesh : Teesta water sharing  मी पाणी वाटपाच्या मुद्यावर बांगलादेशात सर्व भागधारकांशी चर्चा केली आहे. आम्हाला तीस्ता कराराच्या संदर्भात प्रक्रिया व संवाद पुन्हा सुरू करण्याची गरज आहे. आम्हाला गंगा करारावरही काम करायचे आहे. गंगा करार दोन वर्षांत पूर्ण होत आहे, असेही त्यांनी या मुलाखतीत सांगितले. तीस्ता पाणी वाटप कराराचा मसुदा तयार करण्यात आला व दोन्ही सहमती दर्शविली, परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधामुळे करारावर स्वाक्षरी झाली नाही. आम्ही कराराला अंतिम रूप देऊ शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आम्ही कराराच्या मसुद्यापासून सुरुवात करू व भारताला पुढे येऊन संवाद प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यास प्रवृत्त करू, असेही त्या म्हणाल्या. २०११ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या भेटीदरम्यान भारत बांगलादेशने तीस्ता पाणीवाटपाचा करार केला होता, परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राज्यातील पाण्याच्या टंचाईचे कारण देत त्यास मान्यता देण्यास नकार दिला. आम्ही याप्रकरणी एक सौहार्दपूर्ण तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे त्या म्हणाल्या.