शंभर दोनशे टक्के सोडा तिकीट कोणालाच फायनल नाही

    दिनांक :02-Sep-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
wardha ticket is not final आर्वी विधानसभा मतदार संघात गेल्या दोन महिन्यांपासुन आ. दादाराव केचे यांनी आपल्याला तिकीट 200 टक्के फायनल झाल्याचे जाहीरपणे सांगणे सुरू केले आहे. एवढेच नव्हे तर आपल्यामध्ये कोणी येण्याचा विचारही करू नये, अशी तंबीच जणू देणे सुरू केले होते. काल 1 रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तळेगाव, आर्वीत आले असता त्यांनी कोणाचीच तिकीट पक्की समजू नये अशा भाषेत कोअर कमेटीत कानपिचक्या घेतल्याचे विश्‍वसनिय सुत्रांनी सांगितले. या कानपिचक्यांची आता चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. आ. दादाराव केचे यांनी आर्वी विधानसभा मतदार संघावर सलग दुसर्‍यांदा दावा केला आहे. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे शेवटची संधी द्या, अशी विनंती केली होती. त्यावेळी त्यांना तिकीट देण्यात आली. आता पुन्हा 2024 विधानसभा निवडणुकीत त्यांनी तिकीटासाठी मोर्चे बांधणी सुरू केली.
 
 
wardha
 
गेल्या आठवड्यात वर्धेत झालेल्या बैठकीत ना. प्रल्हाद पटेल यांना लक्ष राहू द्या अशी विनंती त्यांनी केली. त्यामुळे राज्यातील पक्षश्रेष्ठींचे त्यांकडे दुर्लक्ष आहे का असा प्रश्‍न कोअर कमेटी होताच बाहेर चर्चील्या गेला. दरम्यान, आ. केचे आता मतदार संघात जाहीर कार्यक्रमांमध्ये झपाटल्यागत wardha ticket is not final 100 नव्हे तर 200 टक्के आपलीच तिकीट पक्की असल्याचे सांगत सुटले आहेत. त्यामुळे आर्वी मतदारसंघाचा 7/12 च नावे केला की काय अशी चर्चा आता आर्वी मतदार संघात रंगू लागली आहे. त्यामुळे मतदारसंघाचे चांगले वातावरण गढूळ होऊ लागले आहे. तिकीट पक्की हा विषय पक्षश्रेष्ठींच्या कानावर पडला होता. आर्वी मार्गे धामणगाव येथे जात असताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे तळेगाव (श्या.पंत) येथे सचिन होले यांच्या नेतृत्वात बावनकुळे यांचे स्वागत करण्यात आले.
 
 
त्यानंतर पक्षांतर्गत बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यां समोर कोणीही माझीच तिकीट पक्की असल्याचा दावा करू नये अशी समज दिली. त्यानंतरही एका पदाधिकार्‍याने पुन्हा तिकीट संदर्भातच पुंगी वाजवताच बावनकुळे यांनी त्यालाही सुनावत खाली बसवले. तिकीटासाठी चढाओढ होणे अपेक्षित आहे. परंतु, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांची नावं घेत आपलीच तिकीट फायनल असल्याचे सांगून कार्यकर्त्यांमध्ये होत असलेला संभ्रम कालच्या बैठकीत आ. बावनकुळे यांनी एका वाक्यात दूर केल्याने तिकीट फायनलची हीच चर्चा आता चांगलीच रंगू लागली आहे.