नाशिक,
Saptashrungi-Navratri 2024 येत्या ३ ऑक्टोबर गुरुवार रोजी देशभरात नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. देवी भगवतीच्या शक्ती आणि चैतन्याने आसमंत भारून जाईल. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनाला या काळात भाविकांची गर्दी उसळते. लाखो भाविकांना सुखरुप आणि डोळे भरून देवीचं दर्शन घेता यावं, यासाठी तयारी सुरू झाली आहे. मात्र, सप्तशृंगी गडाचा घाटमार्ग आजपासून चार दिवस बंद ठेवण्यात आला आहे.
Saptashrungi-Navratri 2024 घाटमार्गावर डोंगरावरून पडणारे मोठे दगड रोखण्यासाठी, जाळ्या लावण्याचे काम सुरू आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी अकुनुरी नरेश आणि कळवणचे तहसीलदार रोहिदास वारुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रोत्सवाच्या काळात म्हणजेच ३ ते १२ ऑक्टोबरपर्यंत गडमंदीर पूर्ण वेळ दर्शनासाठी खुलं राहणार आहे. सप्तशृंगी मंदीर ट्रस्टसोबतच्या बैठकीनंतर त्यांनी माहिती देताना सांगितलं की, खाजगी वाहनांना घाटमार्गावर प्रवेश बंद करण्यात आला आहे. यंदा या तीर्थक्षेत्रात किमान ९ ते १० लाख भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून आणि विशेषत: गुजरातमधून भाविक या मंदीरात देवीच्या दर्शनाला येतात.
Saptashrungi-Navratri 2024 मंदीर परिसरात एकूण ६५ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून गर्दीच्या व्यवस्थापनासाठी होमगार्डस् उपस्थित राहतील. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने, ८० विशेष बसेस चालविण्यात येणार असून, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातून अतिरिक्त ३७५ बसेस सोडण्यात येणार आहेत. त्यासोबतच, गडमंदीरावर पार्कींगच्या व्यवस्थेसह वैद्यकीय उपचारांची व्यवस्था, मुबलक पाणीपुरवठा आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.