माय माझी महाकाली तू सत्वाची गं धार...!

संजय रामगिरवार

    दिनांक :24-Sep-2024
Total Views |
चंद्रपूर, 
Navratri 2024 :
 
माय माझी महाकाली तू सत्वाची गं धार।
सार्‍या घाटाची मालकीण दया करी आम्हावर॥
 
 
डफाच्या तालावर चांदा गडाची म्हणजेच, चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीचे हे स्तवण गीत म्हणत अगदी तल्लीन होणारे पोतराजे नवरात्र उत्सावात सामील होतील. माता महाकालीच्या दर्शनासाठी जसे दरवर्षी चैत्र पोर्णिमेच्या यात्रेला मराठवाडा, तेलंगणा, आंध्रप्रदेश येथून मोठ्या संख्येत भाविक येतात तसेच नवरात्रीलाही या भाविकांची येथे मोठी गर्दी असते.
 

mahakali 
 
 
गत दोन वर्षांपासून चंद्रपुरात माता महाकाली महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या महोत्सवात मातेच्या जागरण कार्यक्रमासह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मोठी रेलचेल आहे. महाकाली मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या मंदिराचा संबंध कोराडी व माहूर येथील देवीशीही जोडला जातो. विदर्भातील जी शक्तीपीठे आहेत त्यात महाकाली मंदिराचे मोठे महत्त्व आहे. एका लढाईत झालेला विजय महाकाली देवीच्या कृपेनेच झाला म्हणून गोंड राणी हिराई यांनी चंद्रपुरात माता महाकालीचे भव्य मंदिर १७०७ ते १७०९ या कालावधी दरम्यान उभारले व नंतर चैत्र पोर्णिमेला यात्राही सुरू केली.
 
 
 
 
जवळपास ८० वर्षांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील राजाबाईला स्वप्नात देवीने दर्शन देऊन माझ्या भक्तीचा प्रसार कर, असे सांगितल्याने तिने ती मोठ्या ताफ्यासह दर्शनाला आली. तेव्हापासून या यात्रेला मराठवाड्यातून मोठ्या संख्येने देवीचे भक्त येऊ लागले आहेत, अशी आख्यायिका आहे. शहराचे मुख्य प्रवेशव्दार असलेल्या जटपुरा व अंचलेश्वर दारासमोर नारळ फोडून देवीचा जयघोष करत या उत्सवाला सुरुवात होते. अष्ठमी आणि नवमीच्या दिवशी तर मोठी गर्दी असते. पहाटे पाच वाजता काकड आरती झाल्यानंतर रात्री उशिरा बारा वाजेपर्यंत मंदिर भक्तांसाठी सुरू असते.
 
 
छत्रपती शिवाजी महाराजांनीही माता महाकाली देवीचे दर्शन घेतले असल्याचे येथे सांगितले जाते. देवीचे मंदिर परंपरेपेक्षा थोड्या वेगळ्या आकाराचे आहे. देवळाचा दरवाजा हा पश्चिममुखी असून, मुख्य सभामंडप ४ फूट उंचावर आहे. तेथून ४ ते ५ फूट खोलात मुख्य गाभारा आहे. गाभार्‍यात देवीचे अधिष्ठान आहे. खडकात कोरलेली ५ फूट उंचीची माता महाकालीची मूर्ती आहे. तिच्या हातात खड्ग व ढाल आहे. यात्रेच्यावेळी व दर मंगळवारी देवीला साज चढवला जातो. सभामंडपाची उंची २० फूट असून, मध्यावर ४ जाड दगडी खांब आणि कमानी आहेत. मंदिरावर चारही बाजुने चार मिनारासारखे बांधकाम आहे व मध्यावर शिखर आहे.
 
 

mahakali 
 
 
मात्र, त्याचा आकार हिंदू पद्धतीचाच आहे. मंदिरात एक तळघरही आहे. उतरण्यासाठी रस्ता असून तेथे एक पलंग आणि झोपलेल्या स्थितीतील देवीची मूर्ती आहे. त्रेतायुगात राजा कृतध्वजाला सुनंद नावाचा मुलगा होता. तो ईश्वरभक्त असल्याने त्याला एकदा देवीने दृष्टान्त दिला. त्या दृष्टान्ताप्रमाणे राजपूत्र सुनंद याने ठराविक ठिकाणी उत्खनन केले असता भुयारात शिळेवर कोरलेली महाकाली देवीची प्रतिमा आढळली होती, अशीही आख्यायिका आहे.
 
 
नंतर गोंड राजा खांडक्या बल्लाळशहा येथे राज्य करीत असताना शिकारीच्या निमित्ताने झरपट नदीच्या भागात आला. येथे असलेल्या गोक्षुरकुंडातील पाण्याने स्नान करून राजधानीकडे जाताना झरपट नदीच्या पलीकडे काही अंतरावर खडकात कोरलेली महाकाली देवीची मूर्ती त्याला दिसली. त्याने ते ठिकाण स्वच्छ करून छोटेसे देऊळ बांधले. पुढे राणी हिराईने तेथे महाकालीचे अती भव्य मंदिर बांधले.
 
काही भाविक देवीला बकर्‍या, म्हशी, वासरे जिवंतच सोडतात. आधी काही लोक बकर्‍यांचा बळी देत होते. पण आता ही प्रथा मोडली आहे. देवीच्या पुरुषभक्तांना पोतराजे व स्त्री भक्तांना देवकरीन असे म्हणतात. पोतराजे स्त्री सदृश वेष धारण करतात. ते कमरेभोवती हिरव्या रंगाचा घागरा नेसतात. त्यावर घुंगरांची सैलशी माळ असते. त्यांच्या पायात खडे भरलेले मोठे पितळी वाळे असतात. पोतराजे स्त्रीप्रमाणे केस वाढवून त्याचा आंबाडा बांधतात व कपाळी कुंकवाचा मळवट भरतात. त्यांच्या हातात तीनचार इंच व्यासाचा, चारपाच फुट लांबीचा व शेवटी निमुळता होत गेलेला साठ असतो. त्याच्या मुठीला शेंदूर माखलेला असतो. देवीला नवस अर्पण करणार्‍या लोकांचा जत्था मंदिरासमोरच्या प्रांगणात येतो. त्या जत्थ्यासोबत पोतराजा असतो. त्यांच्या उपस्थितीत या यात्रेला पारंपारिक रंग चढतो...
 
 
मला वरदेहून दिसे, गड चांद्याची चांदणी
गोंड राजाची बांधणी ।
मला वरदेहून दिसे, गड चांदियाचा आंबा
राहुळात माझी रंभा ...
 
 
अशी गाणी म्हणत यात्रेस आलेले लोक मंदिराच्या सभोवताल पडाव टाकतात आणि काही दिवसांनी परत आपापल्या गावी जातात.