पितृपक्षाचे शास्त्र!

    दिनांक :25-Sep-2024
Total Views |
धर्म-संस्कृती
- प्रा. दिलीप जोशी
Pitru Paksha : हिंदू संस्कृती ही जगातील एकमेव संस्कृती आहे, ज्यात शाश्वत सिद्धांत आहेत. म्हणूनच अनादिकाळापासून आजतागायत ती टिकून आहे. आपल्या संस्कृतीत मोक्ष, मुक्ती, पुनर्जन्म, चौर्‍यांशीचा फेरा, इहलोक, स्वर्ग, पाप-पुण्य, नैतिकता अशा बाबींचा शाश्वत विचार केला आहे. भव, पितृदेवो भव, आचार्यदेवो भव’ हा विचार आपल्या रक्तात भिनलेला आहे. म्हणूनच जिवंत असताना तर आई-वडील-गुरू यांची सेवा भारतीय माणूस करतोच; पण त्यांच्या मृत्युपश्चातही त्यांना मुक्ती मिळावी म्हणून श्राद्ध, तर्पण, पिंडदानादी क्रिया हिंदू संस्कृतीत दृढ श्रद्धेने केल्या जातात. इतर संस्कृतीत ही श्रद्धा नाही. आई-वडील-सगेसोयरेच नाही तर प्राणिमात्रांचीदेखील केवळ जिवंतपणीच नाही तर मेल्यावरही त्यांच्या मुक्तीसाठी धडपड हे फक्त इथेच भारतात आहे.
 
 
Pitru Paksha
 
आपल्या धर्मात मृत्युपश्चातचाही विचार केला आहे. आपली पहिली इच्छा मोक्ष किंवा मुक्ती आहे. हे नाही तर मनुष्ययोनीत आणि तेही भारतातच पुनर्जन्म व्हावा. चौर्‍यांशीचा फेरा शक्यतो नकोच ही आपली सततची इच्छा असते. यासाठी आयुष्यभर पुण्याईसाठी आपला प्रयत्न असतो. मृत्यूनंतरही इथे व्यवस्था आहेत. यातलाच महत्त्वाचा भाग म्हणजे पितृपक्ष. भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष म्हणजे पितृपक्ष. या १५ दिवसांना शास्त्रात ‘महालय’ म्हणतात. हा विशेष कालावधी असून तो अत्यंत पवित्र कालावधी आहे. पितरांना सद्गती देणारा हा कालावधी असून तो निषिद्ध अजिबात नाही. कधी झाली सुरुवात? : पितृपक्ष अनादिकाळापासून आहे. या महालयाचा उल्लेख वेद, पुराण, रामायण आणि महाभारतातही आहे. आपल्या पितरांना मोक्ष मिळावा, मुक्ती मिळावी, सद्गती मिळावी, शांती मिळावी म्हणून पक्षपंधरवड्यात पितरांचे आवाहन करून त्यांना पाचारण करतात. या पितृपक्षात ते भूलोकात आपल्या घरी येतात, हा आपला विश्वास आहे. पिंडदान श्राद्ध, तर्पण, क्षमादान, अर्घ्यदान, अग्नौकरण, विकीरदान, स्वधावाचन करून त्यांना भोजनाने तृप्त केले जाते. ते होऊन उत्तमलोकात परत जातात. ही आपली नितांत श्रद्धा आहे.
 
 
 
Pitru Paksha : ज्या तिथीला आपले वडील मृत्यू पावले; पितृपक्षातील त्याच तिथीला पिंडदान केले जाते. जर तिथीबद्दल संभ्रम असेल किंवा काही अपरिहार्यतेमुळे नियोजित तिथीला पिंडदान होऊ शकले नाही तर सर्वपितृ अमावास्येला पिंडदान करून पितरांचे भोजन करतात. जर आपली आई किंवा घरातील स्त्री सौभाग्यवती असेल तर चालू वर्षात पितृपक्षात नवमी तिथीला ज्या तिथीला ‘आईनवमी’ किंवा ‘अविधवा नवमी’ म्हणतात. या नवमीला पिंडदान तर्पण केले जाते. याच पितृपक्षात चतुर्थी किंवा पंचमीला भरणी नक्षत्र असते. म्हणून या दिवशीच्या श्राद्धाला भरणी श्राद्ध करतात. ज्यांना कोणाला गया, त्र्यंबक, ब्रह्मकपाल अशा पवित्र ठिकाणी जाऊन पिंडदान श्राद्ध करण्याची इच्छा असते; त्यांना ते शक्य होत नाही, त्यांनी भरणी श्राद्ध करावे. हे श्राद्ध गयादी तीर्थश्राद्धाचे फळ देते.
 
 
Pitru Paksha : चालू वर्षात कोणी अविवाहित पुरुष गेला असेल तर चतुर्थी किंवा पंचमीला भरणी श्राद्ध केले जाते. वर्षश्राद्ध झाल्याशिवाय भरणी श्राद्ध करू नये. कारण एक वर्षपर्यंत तो जीव प्रेतयोनीतून पितृयोनीत जात नाही. म्हणूनच वर्षभर दर महिन्याला श्राद्ध सांगितले आहे. पितृपक्षाचे शास्त्र समजून घेतले पाहिजे. आपल्या शास्त्रात आपले चार प्रकारांचे देह सांगितले आहेत. स्थूलदेह, सुक्ष्मदेह, कारणदेह आणि महाकारण देह. यातील स्थूलदेह म्हणजे जो आपल्याला दिसतो, ज्याची आपण काळजी घेतो ते आपले शरीर. हा देह पंचमहाभूतांचा किंवा पंचतत्त्वांचा बनलेला असतो. माणूस मृत पावतो म्हणजे त्याचा अंत्यसंस्कार केला म्हणजे हा स्थूलदेह पंचतत्त्वात विलीन होतो. हा देह संपला तरी सुक्ष्मदेह इथेच असतो. स्थूलदेहाची अंत्यसंस्काराने सोय झाली, पण सुक्ष्मदेहालाही अवयव असतात. श्राद्ध प्रयोगात त्या सर्व अवयवांचा उल्लेख असतो. विशेष म्हणजे हा सुक्ष्मदेह कावळ्याला दिसतो. पक्षितज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी त्यांच्या पुस्तकात आणि साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषणात स्पष्टपणे सांगितले आहे. म्हणून सुक्ष्मदेहाकरिता श्राद्ध विधी आहे. मनुष्य मृत झाला की तो मनुष्ययोनी सोडून प्रेतयोनीत जातो. स्थूलदेह त्याग आणि सुक्ष्मदेह धारण हा पहिला टप्पा. ‘प्रेतलोक गमनार्थम्’ श्राद्धकर्म असते. या सुक्ष्मदेहाची तृप्ती झाली की, हा देह पितृलोकात ज्याला शास्त्रात ‘यमलोक’ म्हणतात, तेथे जातो. हा कालावधी एक वर्षाचा असतो. वर्षश्राद्धानंतर सुक्ष्मदेहाची व्यवस्था होते. तेव्हा कारणदेह. कारणदेह पितृपक्षात आपल्याकडे येत असतो.
 
 
हा कारणदेह तृप्त होतो तेव्हा त्यांना उत्तमलोक प्राप्त होतो. त्यानंतर तृप्त होऊन कारणदेहाची व्यवस्था होते. आता उरला महाकारणदेह. हा महाकारणदेह पितृपक्षात पिंडदान आणि श्राद्ध यामुळे मुक्त होऊन तो उत्तमलोकांतून कैलासलोक, वैकुंठलोक ज्याला शास्त्रात मोक्ष, मुक्ती म्हणतात, तिथे स्थिरावतो. यालाच ‘सद्गती’ म्हणतात. भूलोकातून प्रेतलोकात, उत्तमलोकात आणि उत्तमलोकातून वैकुंठ अर्थात सद्गती. स्थूलदेह सुक्ष्मदेहात, सुक्ष्मदेह कारणदेहात, कारणदेह महाकारणदेहात आणि शेवटी महाकारणदेह नारायण स्वरूपात विलीन होतो. म्हणजे पिंड ब्रह्मांडात विलीन होते. असा हा प्रवास पिंडदानाने सुकर होतो. म्हणून पितृपक्ष महत्त्वाचा. पिंडदानातील पिंड हा भात, तीळ आणि मध किंवा तुपाचा बनवतात; त्याला ‘चरूपिंड’ म्हणतात. श्राद्धादी प्रयोगात पिंड कणकेचा बनला असेल तर त्याला ‘सत्तूपिंड’ म्हणतात. हे पिंड म्हणजे पितरांचे शरीर आहे. दर्भासनावर बसवून त्याचेच पूजन आपण करतो. पिंडाला नमस्कार करतो. पिंडदान करताना तीन तीन पिंडांच्या तती मांडतात. पिता, पितामह आणि प्रपितामह म्हणजे वडील, आजोबा आणि पणजोबा यांच्यासाठी ती असतात. तीन पिंडांची रांग ही प्रातिनिधिक असते. या क्रियेत पूर्वज, सगेसोयरे यांचीही तृप्ती केली जाते. आपल्या गुरूंनाही तृप्त करण्याचा विधी यात आहे. इतकेच नाही, तर प्राणिमात्रांचे पिंडदान आपल्या संस्कृतीत आहे. भगवान रामचंद्रांनी पक्षिराज जटायूचे तर ज्ञानेश्वर माउलींनी आळे फाट्यावर रेड्याचे पिंडदान केल्याचे सर्वश्रुत आहे.
 
 
Pitru Paksha : ‘तत्र देवो सहाय्यकृत’ हा आपला विश्वास आहे. त्यांची तृप्ती आपल्या घरातील अवदसा आणि अवकळा पितृपक्षात पितराना तृप्त केल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होऊन घरात निरामय वातावरण निर्माण होते. या पितृपक्षात गया, हरिद्वार, त्र्यंबक, बद्रीनाथ आणि उज्जैन क्षेत्री श्राद्ध, तर्पण, पिंडदान फलदायी असते. या शिवाय ब्रह्मकपाल येथे जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध स्वत: करण्याची परंपरा आहे. स्वश्राद्ध इतर स्थानीही करता येते. या सर्व तीर्थात गया क्षेत्र अग्रस्थानी ‘श्राद्धारंभे गयायां ध्यात्वा, ध्यात्वा देव गदाधरं-’ भाद्रपदातील पौर्णिमा आणि कृष्णपक्ष मिळून सोळा दिवस होतात. हा महालय म्हणून प्रसिद्ध आहे. महालय म्हणजे सर्वात मोठे घर अर्थात वैकुंठस्थान. पितृपक्षात पितरांना अन्न आणि अक्षय्यतृतीयेला घडाभरून पाणी दिल्यास त्यांना सद्गती तर मिळतेच; आपल्याही जीवनात सुख-शांती-समाधान कायम निवासी राहते. पितृपक्ष हा पितरांना सद्गती देणारा पंधरवडा आहे. अतीव विश्वासाने भारतात श्राद्ध, तर्पण, पिंडदान केले जाते. ते निश्चित फलदायी आहे. पितृपक्ष ही पुण्य कमावण्याची सर्वात मोठी संधी आहे. 
 
- ९८२२२६२७३५