महापराक्रमी सम्राट समुद्रगुप्त

    दिनांक :25-Sep-2024
Total Views |
इतिहास
भारताच्या इतिहासात प्रखर, पराक्रमी आणि अतिशय बुद्धिमान म्हणून Samrat Samudragupta सम्राट समुद्रगुप्ताचे (३२०-३८०) नाव अतिशय आदराने घेतले जाते. हा गुप्त राजघराण्यातील (राजवंशातील) एक थोर राजा होता. पहिला चंद्रगुप्त आणि त्याची राणी लिच्छवी-राजकन्या कुमारदेवी यांचा तो पुत्र होय. सम्राट चंद्रगुप्ताने आपल्या अंतकाळी दरबार भरवून समुद्रगुप्त याची आपला उत्तराधिकारी म्हणून निवड केली. त्यावरून तो त्याचा ज्येष्ठ पुत्र नव्हता, तरीही त्याचे लक्षात घेऊन चंद्रगुप्ताने त्याची युवराजपदी नियुक्ती केली. हरिषेणनामक समुद्रगुप्ताच्या महादंडनायकाने प्रयागप्रशस्तीत या प्रसंगाचे वर्णन केले असून तीत समुद्रगुप्ताचे व्यक्तिमत्त्व, कर्तृत्व, पराक्रम, विद्वत्ता, राज्यविस्तार, अश्वमेध यज्ञ इत्यादींचे तपशील दिले आहेत.
 
 
Samudragupta
 
आपल्या पित्याने केलेली निवड योग्य होती, हे समुद्रगुप्ताने गादीवर आल्यावर (सन ३३५) आपल्या कृतीने सिद्ध केले. तो मोठा शूर आणि राजा होता. त्याने प्रथम आपल्या राज्याच्या पश्चिमेस व दक्षिणेस राज्य रूद्रदेव, मतिल, नागदत्त, गणपतिनाग, नागसेन, अच्युत वगैरे राजांचा पराभव करून त्यांची राज्ये खालसा केली आणि विंध्य पर्वतातील अरण्य राज्यांच्या अधिपतींना आपले स्वामित्व कबूल करावयास लावले तेव्हा त्याच्या राज्याची पश्चिम सीमा चंबळ नदीपर्यंत पसरली. नंतर पश्चिमेच्या मालव, आर्जुनायन, यौधेय, मद्र आभीर या गणराज्यांनी तसेच मध्य प्रदेशातील सनकादिकांनी आणि नेपाळ, इ. शेजारच्या राजांनी त्याचे स्वामित्व मान्य केले आणि त्याला खंडणी देऊ केली. दूरच्या माळवा काठेवाडातील क्षत्रपांनी आणि पंजाब अफगाणिस्तानातील कुशाणांनीही त्याच्यापुढे नम्र होऊन आणि त्याला कन्या देऊन आपल्या राज्याची अधिकारपत्रे देण्याविषयी त्याची प्रार्थना केली.
 
 
Samrat Samudragupta अशा रीतीने उत्तर भारतात आपले स्वामित्व केल्यावर त्याने दक्षिणेकडील कोसलच्या (छत्तीसगडच्या) महेंद्र राजाचा पराभव करून महाकांतारवर (बस्तर जिल्हा) स्वारी केली, तो देश जिंकल्यावर पूर्वेकडे वळून त्याने सध्याच्या गंजाम, विजगापट्टम, गोदावरी, कृष्णा आणि नेल्लोर जिल्ह्यांच्या राजांचा पराभव केला आणि कांची (सध्याचे कांजीवरम्) पर्यंत धडक मारली. त्याच्या सेनेबरोबर त्याचे आरमारही पूर्व किनार्‍याने जात होते असे दिसते कारण विजयांची वार्ता ऐकताच सिंहल (श्रीलंका) आदी करून सर्व द्विपातील अधिपतींनी त्याचे स्वामित्व मान्य करून त्याला उपायनादिकांनी प्रसन्न केले, असे त्याच्या प्रयागप्रशस्तीत म्हटले आहे. समुद्रगुप्त महत्त्वाकांक्षी असला, तरी धोरणी होता. आपण जिंकलेल्या दक्षिण भारतातील दूरच्या देशांवर आपण स्वत: राज्य करणे शक्य होणार नाही, हे जाणून ते देश खालसा न करता त्या त्या राजांना आपले स्वामित्व कबूल करून वार्षिक खंडणी देण्याच्या अटीवर परत केले. तसेच दक्षिणेतील प्रबळ वाकाटक सम्राटांशी युद्ध करण्याचे त्याने टाळले.
 
 
राज्यात परत आल्यावर समुद्रगुप्ताने आपला महासेनापती आणि परराष्ट्रमंत्री (महादंडनायक) हरिषेण याला आपल्या विजयाचे वर्णन करणारी प्रशस्ती लिहावयास सांगून, ती कौशाम्बी येथे असलेल्या अशोक स्तंभावर कोरवून घेतली. त्या इतर कोणत्याही प्राचीन भारतीय राजापेक्षा समुद्रगुप्ताविषयी अधिक माहिती उपलब्ध झाली आहे. नंतर त्याने अश्वमेध यज्ञ करून प्राचीन वैदिक परंपरेचे पुनरुज्जीवन केले आणि आपले सम्राटपद जाहीर केले. त्यापूर्वी कित्येक शतके कोणीही अश्वमेध यज्ञ केला नव्हता म्हणून त्याच्या वंशजांच्या लेखात त्याचे ‘चिरोत्सन्नाश्वमेधाहर्ता’(दीर्घकाल प्रचारात नसलेला अश्वमेध यज्ञ करणारा) असे वर्णन आले आहे. त्याने आपली अश्वमेधनाणी पाडली. त्यांवर अश्वमेधाच्या अश्वाची आकृती असून ‘अश्वमेधपराक्रम:’ असा लेखही आहे. समुद्रगुप्ताबाबत आपल्याला जी माहिती मिळते ती मौर्य सम्राट अशोकाच्या अलाहाबादच्या स्तंभाच्या दुसर्‍या बाजूला सम्राट समुद्रगुप्ताने केलेल्या साम्राज्य विस्ताराच्या प्रशस्तीपर वर्णनावरून मिळते. या स्तंभलेखात समुद्र्गुप्ताचा उल्लेख लिच्छवीदौहित्र असा केलेला आहे. सम्राट समुद्रगुप्ताच्या दरबारातील महादंडनायक हरिषेण याने समुद्रगुप्ताचे चंद्रगुप्त पहिला याने त्याची वारस म्हणून केलेली नियुक्ती, सत्तेसाठी झालेली यादवी, समुद्रगुप्ता चे पराक्रम इत्यादींचे वर्णन ‘ प्रशस्ती ‘ या काव्यात करून ते या स्तंभावर कोरले आहे.
 
 
Samrat Samudragupta महाराजाधिराज चंद्रगुप्ताने अयोध्या, प्रयाग व दक्षिण बिहारातील मगध या प्रांतावर नियंत्रण प्रस्थापित केले होते. त्याच्या अखेरच्या दिवसात त्याच्या वर्चस्वाखाली मगध, प्रयाग, साकेत वैशाली हे प्रांत होते.
समुद्रगुप्ताने जवळपास चाळीस वर्षे शासन केले. त्याने आपल्या पराक्रमाने व मुत्सद्दीपणामूळे जवळ जवळ संपूर्ण भारत आपल्या वर्चस्वाखाली आणला. शक, कुशाण, वाखाटक आणि सिंहली राजांसोबत त्याचे सलोख्याचे संबंध होते. वाकाटक राजांना न दुखावता दक्षिणेकडील बारा राज्ये मांडलिक बनविली यात त्याचा मुत्सद्दीपणा येतो.यामुळेच डॉ. व्हिन्सेंट स्मिथ समुद्रगुप्ताची नेपोलियनशी करतात.
 
 
उत्कृष्ट प्रशासक
Samrat Samudragupta समुद्रगुप्ताची प्रशासनव्यवस्था अत्यंत कार्यक्षम होती. अंतर्गत बंडांचा वेळीच बंदोबस्त केला. बाह्य आक्रमणापासून संरक्षण केले. दक्षिणेतील जिंकलेल्या राज्यांना स्वायत्त मांडलिक राजाचा दर्जा देऊन समुद्रगुप्ताने नियमितपणे खंडण्या वसूल केल्या. या खंडण्यावरच त्याच्या राज्याचा खर्च भागे. साहजिकच प्रजेवर कराचा बोजा कमी असे.
समुद्रगुप्ताने जी नाणी पाडली त्यावरून त्याच्या धोरणाचे, साम्राज्यविस्ताराचे, धार्मिक धोरणाचे, पराक्रमाचे, प्रजेविषयी दयाळू धोरणाचे, कला, साहित्य व संगीत याबद्दल रसिकतेचे प्रमाण मिळते. त्याने पाडलेल्या नाण्यांवर या गोष्टी अंकित केल्या आहेत.
१) पृथ्वी जिंकून स्वतःच्या सत्कर्माने स्वर्ग जिंकत आहे.२) परशू घेऊन अजिंक्य राजांना जिंकणारा परशुधारी समुद्रगुप्त.३) वाघाची शिकार करणारा ‘व्याघ्र पराक्रमी राजा समुद्रगुप्त’.४) तल्लीन होऊन वीणावादन ‘ महाराजधिराज समुद्र गुप्त.५) अश्वमेध यज्ञ करून पृथ्वीचे संरक्षण व स्वर्ग जिंकणारा सम्राट समुद्रगुप्त. ६. पिता चंद्रगुप्त आणि माता कुमारदेवी यांच्या प्रतिमा एका बाजूला तर दुसर्‍या बाजूला सिंहारुढ दुर्गादेवीची प्रतिमा अंकित करणारा सम्राट. या नाण्यांवरून सम्राट योग्यता आपल्या लक्षात येते. समुद्रगुप्ताच्या पत्नीचे नाव दत्तदेवी होते. समुद्र्गुप्तानंतर त्याचा मुलगा रामगुप्त गादीवर आला.समुद्रगुप्ताचे राज्य उत्तर भारताच्या विस्तृत प्रदेशावर पसरले होते. उत्तरेस हिमालय पर्वत, पश्चिमेस यमुना व चंबळ या नद्या, पूर्वेस बह्मपुत्रा आणि दक्षिणेस मध्य प्रदेशातील सागर जिल्हा, हा त्याच्या अंमलाखाली होता. त्याचा दरारा तर उत्तरेस अफगाणिस्तानापासून दक्षिणेस सिंहल द्वीपापर्यंत पसरला होता.
 
 
Samrat Samudragupta : हरिषेण त्याच्या पराक्रमाविषयी ‘समरशतावरणदक्ष’ (शेकडो युद्ध करण्यात दक्ष) असे समुद्रगुप्ताने ‘पराक्रमाड़्क ‘विक्रमांक’ अशी सार्थ पदवी धारण केली होती. तो विद्वान, प्रतिभासंपन्न, शास्त्रज्ञ आणि कलाभिज्ञही होता. त्याला विव्दानांच्या संगतीत आनंद वाटे. त्याने स्वत: शास्त्रांचा अभ्यास केला होता आणि त्यांच्या तत्त्वांचे परिपालन केले होते. त्याने स्वत: इतकी सुंदर काव्ये रचली होती की, त्यांतील कल्पना आपल्या आणण्यात विव्दज्जन स्वत:ला धन्य मानीत. त्याची ‘कविराज’ पदवी सुप्रतिष्ठित झाली होती. दुर्दैवाने ही सर्व काव्ये कालाच्या ओघात नष्ट झाली आहेत. हरिषेण याने रचलेली प्रयागप्रशस्ती ही संस्कृत चंपूकाव्याचा उत्कृष्ट नमुना आहे. समुद्रगुप्ताला संस्कृत भाषेविषयी नितांत प्रेम होते. आपल्या सोन्याच्या नाण्यांवर संस्कृतमध्ये लेख घालण्याची आपल्या पित्याची पद्धत समुद्रगुप्ताने चालू ठेऊन ते सुंदर विविध वृत्तांतील श्लोकार्धात रचले. उत्तम कलाभिज्ञ होता. त्याने सहा भिन्न प्रकारची सुंदर सोन्यांची नाणी पाडली होती. त्याला वीणावादनाचाही नाद होता. त्याच्या एका नाण्यावर तो वाजवीत बसलेला दाखविला आहे. हरिषेण म्हणतो, त्याने बुद्धीमत्तेत बृहस्पतीला, वादयवादनात तुम्बुरूला आणि गायनात नारदाला मागे टाकले होते. समुद्रगुप्त अत्यंत उदार होता. त्याने शेकडो गोसहस्रदाने दिली होती. तो शत्रूंचा कर्दन पण सज्जनांचा आश्रयदाता आणि दीन व अनाथजनांचा पोषिंदा होता. समुद्रगुप्त स्वत: वैदिक धर्मी होता, तरी त्याचा इतर धर्मांनाही उदार आश्रय दिला. त्याने प्राचीन ऐरिकिण (सागर जिल्ह्यातील एरण) येथे बांधलेल्या विष्णुमंदिराचे अवशेष अद्यापही तेथे दिसतात. त्यावरून तत्कालीन स्थापत्य व शिल्पकलेची प्रचीती येते. वामनाच्या काव्यालंकारसूत्रवृत्तीत उद्धृत केलेल्या श्लोकार्धावरून सुप्रसिद्ध बौद्ध तत्त्वज्ञ यास त्याचा आश्रय होता असे समजते. त्याकाळी लंकेतून बोधगयेस गेलेल्या काही यात्रेकरूंना तेथे राहण्याची अडचण भासली, तेव्हा त्यांनी आपल्या (मेघवर्ण) राजाचे त्याच्याकडे लक्ष वेधले. त्या राजाने समुद्रगुप्ताकडे मौल्यवान नजराणा पाठवून बोधगया येथे श्रीलंकेच्या यात्रेकरूंकरिता विहार बांधण्याची परवानगी मागितली आणि समुद्रगुप्ताने ती आनंदाने दिली.