हा पाकिस्तानचा ढोंगीपणा!

    दिनांक :28-Sep-2024
Total Views |
- भारताने फटकारले
- संयुक्त राष्ट्रसंघात पुन्हा काश्मीरचे तुणतुणे
 
न्यू यॉर्क, 
Hypocrisy of Pakistan पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत पुन्हा काश्मीरचे तुणतुणे वाजवले. त्यांनी भारतावर काश्मीरमध्ये तणाव वाढवत असल्याचा आरोप केला. या आरोपावरून भारताने त्यांना शनिवारी फटकारत पाकिस्तानचा हा ढोंगीपणा असल्याचे म्हटले आहे.
 
 
Bhavika
 
संयुक्त राष्ट्रसंघातील प्रथम सचिव भाविका मंगलानंदन यांनी २००१ मधील भारतीय संसदेवरील हल्ला आणि २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांसह अनेक घटनांचा हवाला देत भारताविरुद्ध सीमापार दहशतवादाचा वापर केल्याचा पाकिस्तानवर आरोप केला. यादी मोठी आहे, असे मंगलानंदन यांनी पाकिस्तानच्या बिनबुडाच्या आरोपांना उत्तर देताना सुनावले. त्या म्हणाल्या, दहशतवाद्याच्या मुद्यावर कधीही तडजोड करणार नाही.
 
 
Hypocrisy of Pakistan आम्ही देशाबद्दल बोलत आहोत, ज्याने ओसामा बिन लादेनची दीर्घकाळ खातीरदारी केली. जगभरातील अनेक दहशतवादी घटनांमागे त्याच देशाचा हात आहे. ज्यांच्या धोरणांमुळे अनेक घटकांना आपले घर बनवण्यासाठी आकर्षित केले आहे, असे मंगलानंदन यांनी उत्तर देण्याच्या अधिकाराचा वापर करीत पाकिस्तानच्या दुष्कृत्यांचा पाढा वाचला. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० निष्प्रभ करण्याची कृती आणि बेकायदेशीर असल्याचा कांगावा करीत, हा निर्णय मागे घेण्याचा सूर शरीफ यांनी आळवला होता. त्यांच्या वक्तव्यानंतर भारताने पाकिस्तानला खडसावले.
 

जम्मू-काश्मीर भारताचेच
जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून, पाकिस्तानने हिंसक मार्गाने या भागातील शांतता बिघडवण्याचा आणि निवडणुकांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे. अशा देशाने कुठल्याही हिंसाचाराबद्दल बोलणे हे ढोंगीपणा आहे, सांगून त्यांनी पाकिस्तानच्या कारवायांचा निषेध नोंदवला.