आता तरी पुढे हाची उपदेश |नका करू नाश आयुष्याचा |

    दिनांक :29-Sep-2024
Total Views |
संत प्रबोधन
- प्रा. डॉ. हरिदास आखरे
Saint Tukaram : संतांनी आपल्या अभंग वाङ्मयातून सातत्याने समाजातील सर्वांच्या कल्याणाची आर्त तळमळ मांडली आहे.
बुडती हे जन न देखवे डोळा |
म्हणूनही कळवळा येतसे ॥
त्या तळमळीतून सर्वांना शाश्वत सुख मिळावे; सर्वांचा संसार सुखाचा व्हावा, असा भाव प्रकट त्यासाठी त्यांनी समाजातील लोकांना कर्तव्यकर्म व सदाचाराचा जो उपदेश केला आहे तो सर्वच काळातील समाजाला संबद्ध आहे. म्हणून संतांचे जगावर सानंत उपकार आहेत.
 
 
sant-tukaram

 
काय सांगू आता संतांचे उपकार |
माझा निरंतर जगविती ॥
मानवी संसार जरी दुःखमय असला, तरी मनामध्ये सतत परमेश्वराचे नामस्मरण व हातामध्ये सदाचारयुक्त कर्तव्यकर्म असेल तर भीती बाळगण्याचे कोणतेही कारण नाही.
 
 
आता तरी पुढे हाची उपदेश |
नका करू नाश आयुष्याचा ॥
Saint Tukaram : या प्रपंचामध्ये कोणीही उच्च-नीच नाही. संसारामध्ये परमेश्वराचे नामस्मरण करण्याचा अधिकार सर्वांना आहे. भक्तिरस हा ईश्वरी प्रसाद आहे. तो ब्राह्मण, वैश्य, शूद्र, चांडाळ, वेश्यांचाही अधिकार आहे. आचारधर्माचा संपूर्ण सारांशच प्रस्तुत अभंगातून मांडला-
पुण्य परउपकार ते परपीडा |
आणीक नाही जोडा दुजा यांसी ॥
सत्य तो चि धर्म असत्य ते कर्म |
आणीक हे वर्म नाही दुजे ॥
गति ते चि मुखी नामाचे स्मरण |
अधोगति जाण विन्मुखता ॥
संतांचा संग तो चि स्वर्गवास |
नरक तो उदास अनर्गळा ॥
तुका म्हणे उघडे आहे घात |
जयाचे उचित करा तैसे ॥
(तु. गा. १०२१)
 
 
Saint Tukaram : संत तुकारामांनी पाप आणि पुण्याची अगदी साधी-सोपी असणारी व्याख्या सांगितली आहे. काया, वाचा आणि मन याद्वारा एखाद्या असहायाला साहाय्य करणे म्हणजे परोपकार होय. परोकारासारखे पुण्य जगात दुसरे कोणतेही नाही. साध्या-भोळ्या, निरपराध लोकांना विनाकारण त्रास देणे, छळणे म्हणजेच परपीडा, ते होय. नीतिशास्त्रातसुद्धा पाप-पुण्याच्या संकल्पनेला अवर्णनीय असे महत्त्व आहे. वेदविहित सत्य आचरण हा स्वधर्म मानावा. जीवनामध्ये नीतिशास्त्राविरुद्ध असत्य आचरण करणे हा अधर्म आहे. पूर्व मीमांसाशास्त्रात याचे दाखले आढळतात. संतांचा सहवास म्हणजेच स्वर्गसुख तर दुर्जनांशी सख्य म्हणजे नरकवास होय. आपले हित व अहित कशामध्ये आहे, हे आपण स्वतः ओळखणे आवश्यक आहे. आणि पुण्य दुसरीकडे नसून ते आपल्या वर्तणुकीमध्ये आहे. त्यांच्या शिकवणुकीमध्ये-
१) ज्ञानातील डोळसपणा आहे.
२) कर्मातील शुचिता पाळणे आवश्यक मानतात.
३) भक्तीतील समर्पणता जीवनामध्ये महत्त्वपूर्ण आहे.
मनुष्याने याचकाला यथाशक्ती दान करावे. परमेश्वराशी नाते जोडण्यासाठी दया आणि दान हे दोन महत्त्वपूर्ण टप्पे आहेत. आतिथ्य आणि परोपकार यांसोबतच दया व दान सर्वोत्तम जीवनमूल्ये आहेत. जीवनातील सर्वात्मभाव वाढविणारे ते संस्कारमोती आहेत. समाजाच्या उत्थानाकरिता, उन्नतीकरिता प्रत्येकाने या सामाजिक सद्गुणरूपी जीवनमूल्यांचे पालन करून भक्तिमार्गाने जीवन जगावे, असा महत्त्वपूर्ण संदेश संत तुकारामांनी आपल्या आचारधर्मामध्ये सांगितला आहे-
तुका म्हणे तुम्ही चला या चि वाटे |
भरवशाने भेटे पांडुरंग ॥ (तु. गा. ३७२८)
 
 
संतांचा जीवन कल्याणाचा उपदेश 
वेद, पुराण, श्रुती या सर्व ग्रंथांचा मूळ उद्देश मानवास योग्य आचाराची संहिता दाखवणे हा आहे. संत आपल्या वाङ्मयात वेदमार्गाचा पुरस्कार केला आहे. आजच्या काळात वेदाचीच आवश्यकता निर्माण झाली आहे. कारण नीतिमत्ता ढासळलेल्या अस्थिर समाजाला फक्त वेदांचे विचारच सन्मार्गाची दिशा दाखवू शकतात. संतांनी केलेला कर्तव्योपदेश जर शासन स्तरावर अंगीकारला गेला, प्रत्येक व्यक्तीला सात्त्विक जीवन जगण्याचा एक आदर्श वस्तुपाठच प्राप्त होईल.
 
 
कर्माचे तीन प्रकार आहेत-
Saint Tukaram : नित्य, नैमित्तिक आणि काम्य. या कर्मांची व्याप्ती फार गहन असून सर्व जगच कर्माच्या अधीन आहे. गतिमान विज्ञानयुगाला स्थैर्यप्राप्तीसाठी, अखिल मनुष्यमात्रांच्या कल्याणाकरिता संतांचा कर्तव्योपदेश आजही ४०० वर्षांनंतर तंतोतंत लागू पडतो तसेच नंतरही तो लागू पडेल, अशी जीवनमूल्ये त्यामध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळेच संत अभंग वाङ्मय हे अक्षर वाड्म:य ठरले आहे. आचरणाचे सर्व सिद्धांत संत स्वतःच्या आचरणातून व काळाच्या कसोटीवर तपासून पाहिले, तेव्हाच त्यांनी ते जगासमोर मांडले.
लोककल्याणाची आंतरिक तळमळ असल्यामुळेच संतांनी ही आचारसंहिता मांडली.
आपुलिया हिता जो असे जागता |
धन्य माता पिता तयाचिया ॥
 
 
संतांचे दिशा दर्शन
Saint Tukaram : भरकटलेल्या दिशाहीन समाजाला, जीवनमूल्ये हरवून बसलेल्या युवा पिढीला व आगामी असंख्य पिढ्यांना हा कर्तव्योपदेशाचा उपदेश निश्चितच मार्गदर्शक ठरेल. संतविचारांच्या आचाराशिवाय आजच्या नीतिमत्ताहीन समाजाला त्रिकालातही शांती मिळणे शक्य नाही. संत साहित्यात सांगितलेली मूल्ये घराघरांतून, विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून समाजामध्ये रुजविली गेली तर समाजाची झालेली नीतिमूल्यांची हानी भरून निघण्यास होईल. संताच्या उपदेशाचे पालन केल्यास विज्ञानयुगातील अस्थिर व तणावग्रस्त मानवी जीवनाला चिरंतन शांती तद्वतच समाधान प्राप्त होईल.
 
- ७५८८५६६४००