विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल

    दिनांक :06-Sep-2024
Total Views |
- देशातील एकूण गुंतवणुकीच्या ५२ टक्के एकट्या महाराष्ट्रात
- उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली माहिती

मुंबई, 
२०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सर्वाधिक म्हणजे देशातील एकूण गुंतवणुकीच्या ५२,४६ टक्के विदेशी गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आहे. उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी आज ट्विट करून ही माहिती दिली. राज्यात येणारे उद्योग, प्रकल्प परराज्यात पळवले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असताना, महायुतीकडून राज्यात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक झाल्याची आकडेवारी प्रसिद्ध करीत फडणवीसांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले.
 
 
Devendra Fadnavis
 
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, अतिशय बातमी! देशातील एकूण गुंतवणुकीच्या ५२.४६ टक्के विदेशी गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. मागील दोन वर्षे सातत्याने विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक १ वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीत एकूण ७० हजार ७९५ कोटी गुंतवणूक आली.
 
 
Devendra Fadnavis : सर्व राज्यांमधील विदेशी गुंतवणुकीच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली. थोडक्यात सांगायचे तर, या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही १ लाख ३४ हजार ९५९ कोटी रुपये इतकी असून, त्यापैकी ७० हजार ७९५ कोटी अर्थात् ५२.४६ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली. राज्यात २०१४ ते २०१९ या काळात असताना एकूण ३ लाख ६२ हजार १६१ कोटी रुपये विदेशी गुंतवणूक आली होती. अडीच वर्षांत आम्ही ५ वर्षांचे काम करून दाखवू, हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते. आता सव्वा दोन वर्षांत ३ लाख १४ हजार ३१८ कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखवली.
राज्ये व तेथील विदेशी गुंतवणूक
महाराष्ट्र - ७० हजार  ७९५ कोटी
कर्नाटक - १९ हजार ०५९ कोटी
दिल्ली - १० हजार ७८८ कोटी
तेलंगणा - ९ हजार ०२४ कोटी
गुजरात - ८ हजार ५०८ कोटी
तामिळनाडू - ८ हजार ३२५ कोटी
हरयाणा - ५ हजार ८१८ कोटी
उत्तरप्रदेश - ३७० कोटी
राजस्थान - ३११ कोटी