मुंबई वार्तापत्र
- नागेश दाचेवार
राज्य सरकारने ज्या दिवशीपासून 'Ladki Bahin Yojana' लाडकी बहीण योजना लागू केली, त्या या योजनेला मविआ अर्थात काँग्रेस, शरद पवार गट राकाँ, उद्धव ठाकरे गटाने विरोध चालवला आहे. कुठलीही घटना घडली की, आम्हाला लाडकी बहीण योजना नको, ‘हे द्या आणि ते द्या’चा सूर लावला जात आहे. मुळात मूलभूत सुविधा मागण्याचा अधिकार जनतेला आहे आणि जनतेला न्यायहक्क मिळवून देण्यासाठी राजकीय नेत्यांना अधिकार आहे. ते सरकारमधील असो किंवा सरकारबाहेरील म्हणजे विरोधक असोत. मात्र, एखादी गोष्ट देण्यासाठी दुसरी योजना बंद करा, ती योजना नकोची नकारघंटा वाजवली जात आहे. कायदा व सुरक्षेसाठीचा आरोग्य विभागाच्या, कृषी विभागाच्या, गृहविभागाच्या निधीत कपात झालीय् का? तर नाही; उलट वाढ झाली आहे. मग मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी लाडकी बहीण योजना करावी, अशी विरोधकांची पोटदुखी नेमकी कशासाठी असावी? राज्यातल्या गोरगरीब बहिणींना, ज्या हातावर आणून पानावर खाणार्या बहिणी आहेत, त्यांना फूल ना फुलाची पाकळी समजू, अशी आर्थिक मदत जर सरकारकडून होत असेल तर त्या मिळणार्या मदतीला खोडा का घातला जात आहे? बहिणींच्या योजनेला इतका का विरोध केला जात आहे? या आर्थिक अन्य सुविधा द्या, अशी मागणी करा. मात्र, या योजनेच्या माध्यमातून महिला महायुतीला मतदान करतील आणि आपल्या राजकीय अस्तित्वाला धक्का लागेल म्हणून गरीब, भोळ्याभाबड्या बहिणींच्या पोटावर लाथ मारण्याचे पाप करू नका. सध्या बहिणींना जे मिळताहेत ते मिळू द्या आणि तुम्ही अर्थात विरोधकांनी सत्तेत आल्यावर ही योजना बंद करून हा निधी सुविधांवर खर्च करावा आणि याबाबतची घोषणा आत्ताच करावी. निव्वळ महिलांची, महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करू नये, एवढी हात जोडून कळकळीची विनंती सर्वसामान्य बहिणींची विरोधकांना, विरोध करणार्यांना आहे.
देशातील महिलांना ८ हजार ५०० खटाखट देण्याची घोषणा राहुल गांधी लोकसभेच्या निवडणूक प्रचार सभांमधून करत फिरत होते. त्यावेळी संपूर्ण काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते जाऊन महिलांना ‘खटाखट पैसे देऊ’चे आश्वासन देत फिरत होते. काँग्रेस पक्षाच्या पाठोपाठ त्यांच्या इंडिया आघाडीतील घटकपक्ष अर्थात महाराष्ट्रातील शरद पवार आणि उद्धव ठाकरे गट खटाखट खटाखट करत उडताना दिसले होते. त्यांच्या या योजनेच्या कितीतरी पटीने कमी तुटपुंजी अशी १५०० रुपयांची मदत महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी जाहीर केली. जाहीर केलेली मदत आहे म्हणणे एकदाचे मान्यदेखील करता येईल; मात्र ती दिली जाऊ नये, अशी मागणी तेच लोकं करत आहेत, ज्यांनी लोकसभेच्या प्रचाराच्यावेळी आम्ही ८,५०० रुपये देऊ, अशी घोषणा केली होती. ही अशी दुटप्पी भूमिका यांचा खरा चेहरा उघड करते.
'Ladki Bahin Yojana' : बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचाराची घटना समोर आली. त्यावेळी आम्हाला लाडकी योजनेचे १५०० रुपये नको, मुलींना सुरक्षा द्या, अशी मागणी विरोधक करताना दिसले. त्यावेळी झालेल्या आंदोलनात लाडकी बहीण योजना नकोचे फलक झळकावल्या गेले. तेथील पालकांना फलक फडकवायचेच असते तर ‘वुई वॉण्ट जस्टिस, आरोपीला फाशी द्या, कारवाई करा,’ अशा आशयाचे फलक त्यांनी फडकवले असते, पण ते छापायला द्या, छापून आणा ही पंचायत कोण करेल, ज्यांना याचा राजकीय फायदा उठवायचा असेल तोच करेल. आता हे फलक फडकविल्याने कोणाला फायदा होणार होता, हे जगजाहीर आहे.
महिला सुरक्षेविषयी या लोकांनी न बोललेलंच बरं!
नुकतीच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने आकडेवारी जाहीर केली. त्यात यांच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या मविआच्या कार्यकाळात २०२० मध्ये ३१ हजार महिला अत्याचाराच्या घटना घडल्या. दिवसाला ८८ घटना राज्यात घडल्या. २०२१ मध्ये ३९ हजार २६६ महिला अत्याचाराच्या घटना घडल्या. दिवसाला १०९ घटना घडल्या. जानेवारी ते जून २०२२ मध्ये २२ हजार ८४३ घटना घडल्या. दिवसाला १२३ घटना घडल्या. जुलै ते डिसेंबर २०२२ मध्ये २० हजार ८३० महिला अत्याचाराच्या घटना घडल्या. दिवसाला घटना घडल्याचे म्हटले आहे. या आकडेवारीने महिलांच्या सुरक्षेविषयी आज छाती बडवणार्यांचा खरा चेहरा उजागर केला आहे.
कायदा व सुव्यवस्थेविषयीदेखील बोलण्याचा अधिकार यांना नाही
एक मंत्री सर्वसामान्यांना बंगल्यावर बोलावून मारहाण करतो. देशासाठी सेवा दिलेल्या नेव्ही अधिकार्याला मारहाण केली जाते. विरोधात बोलले म्हणून घरं पाडली जातात. कविता केवळ पोस्ट केली म्हणून डांबले जाते. एका गुंडाला पोलिस सेवेत रुजू करून त्याच्याकरवी कोट्यवधींची वसुली केली जाते. वसुलीची पोल खोल होऊ नये म्हणून सामान्य व्यापार्याचा खून केला जातो. ही सारी मविआच्या सत्ताकाळात चाललेली गुंडगिरी जनतेने बघितलीच नव्हे, तर अनुभवली आहे. राज्यातील जनतेला मोकळ्या मनाने श्वास घेण्याचे स्वातंत्र्य नव्हते, अशी अघोषित आणिबाणी राज्यात लावण्यात होती. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात आगी लागण्याचे प्रकारही मविआच्या काळात घडले होते.
या लोकांचं बरं आहे, ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण’ घटना कुठलीही असो, लोकांच्या डोक्यावर खापर फोडून मोकळं व्हायचं. आता तर 'Ladki Bahin Yojana' लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने, त्या योजनेला बदनाम करण्याचं नवं षडयंत्र यांनी आहे. सगळ्या घटनेत यांना आता लाडकी बहीण दिसू लागली आहे. लाडकी बहीण नको, १५०० नको... या सोबतच कायदा सुव्यवस्था सुधारा, आरोग्य व्यवस्था सुधारा, पुतळा उभारा, नोकर्या द्या, शेतकर्यांना मदत करा, एसटी कर्मचार्यांना मदत करा अशा अनेक मागण्या करत असताना विरोधक मात्र लाडकी बहीण नकोचा नारा लावताना दिसत आहे. अरे बाकी सगळ्या मागण्या मान्य, पण लाडक्या बहिणीला मदत देऊ नकाचा आग्रह का? त्या बहिणींनी तुमचं काय घोडं मारलं? सार्या घटकांना मदत देण्याची मागणी करत असताना मात्र बहिणींची मदत बंद करून ती द्या, अशी मागणी करणे, हे बहिणींसाठी एकप्रकारे अन्यायकारकच म्हणावे लागेल.
- ९२७०३३३८८६