अग्रेसर महाराष्ट्र

    दिनांक :07-Sep-2024
Total Views |
अग्रलेख...
उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे भूषण आहेत. ते अभ्यासू, परिश्रमी आहेत. सोबतच समर्पित भावनेने काम लोकसेवक आहेत. त्यांचा कामाचा धडाका जबरदस्त आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्राला पुढे नेण्याची दृष्टी आहे. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राने सर्व आघाड्यांवर मोठी झेप घेतली होती. त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वात २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला १०५ जागा मिळाल्या होत्या. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेसोबत युती करून पुन्हा युतीला कौल मिळवून देण्यात यश प्राप्त केले होते. एकप्रकारे मुख्यमंत्री असताना केलेल्या कामांची ही पावतीच होती. पण, उद्धव ठाकरे यांच्या मनात पाप आले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनू दिले नाही. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जनतेने नाकारले होते, त्यांच्या तंबूत जाऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पण, ठाकरेच्या अडीच मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात महाराष्ट्र विकासाच्या मार्गावरून माघारी फिरल्याचा अनुभव आपण सगळ्यांनीच घेतला. दिवस पुढे जात असतानाच राज्यात राजकीय गणितं बदलली आणि पुन्हा एकदा भाजपा सत्तेत आली.
 
 
Deputy CM Devendra
 
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवत उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले आणि राज्याला नव्या दमाने समृद्धीच्या महामार्गावर गतिमान केले. आज अनेक राज्यांना पिछाडीवर सोडत महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणूक आघाडीवर असल्याचे सुखावणारे चित्र दिसत आहे. देशात एकूण जी थेट परकीय गुंतवणूक आली आहे, त्यातली ५२.४६ टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात आली आहे. याचे श्रेय भाजपा-शिवसेना-राकाँ (अजित) यांना आहेच, प्रामुख्याने ते सर्वाधिक यशस्वी मुख्यमंत्री राहिलेल्या आणि आता उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना आहे. ही अतिशयोक्ती नाही. विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत जागा जिंकताना जे कौशल्य फडणवीसांनी दाखविले होते, तसेच कौशल्य त्यांनी थेट विदेशी गुंतवणूक आणतानाही दाखविले, यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत. महाराष्ट्र हे तसे लोकसभेतील खासदारांच्या संख्येच्या दृष्टीने देशातील दुसर्‍या क्रमांकाचे राज्य आहे. उत्तरप्रदेशातील ८० खासदारांच्या पाठोपाठ महाराष्ट्रात ४८ खासदार आहेत. मात्र, आर्थिक स्थिती, कायदा आणि सुव्यवस्था, औद्योगिक विकास, राजकीय तसेच विकासाच्या अन्य सर्व प्रस्थापित मापदंडावर महाराष्ट्र हे देशात सर्वांत पुढे आहे. महाराष्ट्राने देशाच्या विकासातही आपले बहुमोल असे योगदान दिले आहे. आज महाराष्ट्रातील जनतेची मान अभिमानाने उंचावेल, अशी माहिती समोर आली आहे. गेल्या लागोपाठ दोन वर्षांपासून महाराष्ट्र देशातील गुंतवणुकीत आघाडीवर आहे. एप्रिल ते जून २०२४ या तिमाहीत महाराष्ट्रात ७०,७९५ रुपयांची गुंतवणूक आली. या तिमाहीत देशभरात १ लाख ३४ हजार ९५९ कोटी रुपयांची गुंतवणूक आली; यापैकी ७०,७९५ कोटी रुपयांची गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रातील आहे. गुंतवणुकीत दुसर्‍या स्थानावर कर्नाटक आहे. कर्नाटकात १९,०५९ कोटी रुपयांची गुंतवणूक आली. मात्र, महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांतील गुंतवणुकीत मोठी तफावत आहे. देशात पहिल्या दहांपैकी महाराष्ट्र उर्वरित नऊ राज्यांतील गुंतवणुकीची बेरीजही महाराष्ट्रातील गुंतवणुकीपेक्षा कमी आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी महायुतीच्या राज्यातील सर‘कार’च्या ड्रायव्हिंग सीटवर देवेंद्र फडणवीसच आहेत. फडणवीस यांच्यामुळेच महायुती सरकारच्या विकासाची गाडी भरधाव वेगाने योग्य मार्गावर धावत आहे.
 
 
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा अभ्यासू, संवेदनशील, जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला, प्रखर वक्तृत्व, विकासाची दृष्टी तसेच प्रशासनावर असलेला नेता मिळाला, हे महाराष्ट्राच्या जनतेचे भाग्यच म्हटले पाहिजे. कारण, गुंतवणूक, त्याही परकीय गुंतवणूक ही उगीच कोणत्याही राज्यात येत नाही. गुंतवणूक करणारा मग तो देशातील असो वा परदेशातील उद्योगपती, तो डोळे झाकून गुंतवणूक करत नाही. गुंतवणुकीच्या द़ृष्टीने कोणते राज्य सुरक्षित आणि उद्योगस्नेही आहे, त्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कशी राज्य सरकारची उद्योगांबाबतची भूमिका कशी आहे, या घटकांचा अभ्यास करूनच तो गुंतवणूक करीत असतो. महाराष्ट्रात विक्रमी गुंतवणूक आली, याचा अर्थ महाराष्ट्रातील एकूणच सगळे वातावरण देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांनाही पसंत पडले, असा होतो. २०२२-२३ मध्ये महाराष्ट्रात १,१८,४२२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. या वर्षातही महाराष्ट्रातील गुंतवणूक दिल्ली, कर्नाटक आणि गुजरातच्या बेरजेपेक्षाही होती. २०२३-२४ मध्ये महाराष्ट्रात १,२५,१०१ कोटी रुपयांची गुंतवणूक आली. महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातच्या दुप्पट तर गुजरात आणि कर्नाटकच्या बेरजेपेक्षा जास्त होती. २०१४ ते २०१९ या काळात म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात ३,६२,१६१ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली होती. सव्वादोन वर्षांपूर्वी राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर पाच वर्षांचे काम आम्ही अडीच करू, अशी ग्वाही राज्य सरकारने दिली होती. सव्वादोन वर्षांत राज्यात ३,१४,३१८ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. याचे सारे श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रिद्वय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे जात असले, तरी यात सिंहाचा वाटा हा देवेंद्र फडणवीस यांचा आहे, हे त्यांच्या विरोधकांनाही मान्य करावे लागेल. जेवढी गुंतवणूक तेवढे मोठे उद्योग राज्यात येण्याची शक्यता जास्त आणि जेवढे मोठे उद्योग राज्यात येतील, तेवढ्याच मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होतील.
 
 
आपल्या राजकीय प्रवासात Devendra Fadnavis फडणवीस यांनी राज्यातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेत त्यांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाचा मार्ग प्रशस्त केला. पण जातपात न मानणार्‍या फडणवीसांना जातीवरून अडचणीत आणण्याचे सातत्याने झाले आणि अजूनही होत आहेत, हे दुर्दैवीच. देवेंद्र फडणवीस पहिल्या कार्यकाळात मुख्यमंत्री झाले असताना महाराष्ट्रात मराठ्यांनी लाखांचे मोर्चे काढले. आज फडणवीस मुख्यमंत्री नसले, उपमुख्यमंत्री असले, तरी काही स्वार्थी शक्तींनी मनोज जरांगे पाटील यांना पुढे करून मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून त्यांना घेरण्याचा प्रयत्न चालवला आहे. खरं म्हणजे राज्यातील मराठ्यांना आरक्षण देणारे आहेत. पण दुर्दैवाची बाब म्हणजे त्यांना मराठाविरोधी ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आधी देश, मग पक्ष आणि सर्वात शेवटी व्यक्ती यावर फडणवीस यांची ठाम श्रद्धा आणि निष्ठा आहे. महाराष्ट्रात येत्या महिना-दोन महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले, तरी महायुती भाजपाच्या नेतृृत्वात निवडणुकीला सामोरी जाणार महायुतीचा मुकाबला महाविकास आघाडीशी आहे. या लढतीत महायुतीचा विजय एकशेएक टक्के निश्चित आहे. महायुती आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणार नसली, तरी महायुतीत सर्वाधिक जागा भाजपा लढवणार आणि सर्वाधिक जागा भाजपा जिंकणार, ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर सर्वात जास्त आमदार भाजपाचे राहणार असल्यामुळे मुख्यमंत्रिपद ओघानेच भाजपाकडे येणार, नक्की आहे. फडणवीस हे महाराष्ट्राची आन, बान आणि शान आहेत. आज फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची गरज नाही, तर महाराष्ट्राला फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून गरज आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. जे लोक भाजपाला जातीयवादी म्हणून हिणवतात, तेच लोक फडणवीसांना त्यांच्या जातीवरून त्रास देत आहेत, ही विडंबनाच होय. स्वत:ला पुरोगामी म्हणविणारे पवारादी नेते काही कालावधीत स्वत:च प्रचंड जातीवादी झालेत, हे महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतो आहे.