शुद्ध बीजापोटी |फळे रसाळ गोमटी !

13 Jan 2025 18:55:17
संत प्रबोधन
- प्रा. डॉ. हरिदास आखरे
Saints Sermons : महाराष्ट्रातील सर्व संतपरंपरेने आचाराचा एक आदर्श प्रस्थापित केला आहे. जीवन मूल्यांचा, जीवन आदर्शांचा एक सिद्धांत त्यांनी समाजासमोर दीपस्तंभाप्रमाणे सदोदित तेजोमय करून ठेवला आहे. संत साहित्याने आचरणाशी संबंधित असंख्य अभंग प्रतिपादन केले आहेत. प्रस्तुत अभंगात आपले कर्तव्य जेवढे शुद्ध असेल, तेवढे त्याचे फळ गोड असते, असे संत तुकाराम महाराज सांगतात.
 
 
om dk
 
 
शुद्ध बीजापोटी | फळे रसाळ गोमटी ॥
मुखी अमृताची वाणी | देह वेचावा कारणी ॥
सर्वांगी | चित्त जैसे गंगाजळ ॥
तुका म्हणे जाती | ताप दर्शने विश्रांती ॥
(तु. गा. ६२)
ज्याचे बीजच शुद्ध आहे, अशा बीजातून निर्माण होणारे प्रत्येक नवीन रोपटे हे अतिशय शुद्ध असणार आहे. त्याची फळेसुद्धा खूप रसाळ असतील. त्याचप्रमाणे ज्याच्या मुखामध्ये अमृतासारखी रसाळ वाणी आहे. ज्याचा देह निर्मळ आहे व देह देवाच्या कारणी सेवेत आहे. जो पुरुष सर्व अंगांनी पवित्र आहे व ज्याचे चित्त गंगाजलाप्रमाणे निर्मळ आहे, अशा सात्त्विक पुरुषाच्या दर्शनाने त्रिविध ताप जाऊन जीवाला विश्रांती प्राप्त होते.
अ) परद्रव्य : परनारी हा खरा विटाळ!
संत साहित्याने सोवळ्या-ओवळ्याच्या व भेदभावाच्या संकल्पनेला मूठमाती दिली आहे. तथापि, अशा प्रकारची भूमिका स्वीकारायचीच त्यांनी एका महत्त्वाच्या विचाराने ती विशद केली आहे. ती म्हणजे, परद्रव्य व परनारी यांचा संग हाच खरा विटाळ होय. यापासून जो स्वतःला अलिप्त ठेवतो तोच खरा सोवळा व शुद्ध होय, अशी परखड भूमिका त्यांनी घेतलेली आहे.
 
 
 
साधने तरी हीच दोन्ही | जरी कोणी साधेल ॥
परद्रव्य परनारी | याचा विटाळ ॥
देवभाग्ये घरा येती | संपत्ती त्या सकळा ॥
तुका म्हणे ते शरीर | गृह भांडार देवाचे ॥
(तु. गा. ५७५)
मानवी जीवनातील आचाराचा सर्वांत मोठा सिद्धांत संत आपल्या अभंग वाङ्मयातून मांडतात. मानवी जीवन जगताना समाज नीतिमूल्यांचे पालन करावयाच्या दोन गोष्टी जरी मनापासून आचरणात आणल्या, तरी खूप मोठी अनागोंदी कमी होईल. सोवळ्या ओवळ्याची भूमिका अधिक विस्तृतपणे मांडताना ते म्हणतात -
नाही निर्मळ जीवन | काय करील साबण ॥
तैसी चित्तशुद्धी नाही | तेथे बोध करील काई ॥
(तु. गा. ७५९)
Saints Sermons  : बाहेरून शरीर धुवून काय उपयोग, मन तर अजून मळलेले आहे. जन्मभर खोटी वागणूक व्यापलेली आहे. सर्वांत पहिल्यांदा व्यवहारापासून आपली मुक्तता व्हावयास पाहिजे. काया, वाचा, मनाने प्रत्येकाने शुद्ध राहणे आवश्यक आहे. आपल्या चित्ताच्या शुद्धाशुद्धतेला स्वतःच्या मनाची ग्वाही देणे आवश्यक आहे. पाप-पुण्याच्या विटाळाच्या विचाराने स्वतःचे मन भरून टाकून अनिष्ट विचारांमध्ये गढून गेला आहे. अवघे विश्वच सोवळे आहे. त्याचा अर्धा भाग शुद्ध आणि अर्धा भाग अशुद्ध हे शोधण्याचा तू करणे अगदी व्यर्थ आहे. तू स्वतःला काम-क्रोधापासून वेगळा ठेव आणि सोवळा हो. जी व्यक्ती मनामध्ये परद्रव्य आणि परनारी यांची अभिलाषा करते आणि नाक दाबून होम, हवन, तप, साधना करतो त्याला काहीही अर्थ उरत नाही. त्याचा आचार हा अनुकरणीय नाही. अशांचा आचार जळो, असे संत तुकाराम मोठ्या विषादाने सांगतात. अशा व्यक्ती मनामध्ये काम-क्रोधाने विटाळलेल्या असतात. परंतु, बाहेरून उगाचच सोवळेपणा दाखवत फिरतात. संत ज्ञानेश्वरांनीही हाच विचार ‘ज्ञानेश्वरी’मध्ये मांडला आहे.
तोंड भरोका विचारा | आणि अंतःकरणी विषयासी थारा ॥
तेणे नातुडे धनुर्धरा | त्रिशुद्धी गा ॥ (ज्ञानेश्वरी)
बहिर्रंगाच्या, सोवळ्या-ओवळ्याच्या संकल्पनेला छेद देत मनाच्या शुद्धतेला सर्वच संत साहित्याने अधिक महत्त्व दिले आहे. भूलवून जी व्यक्ती नाना प्रकारचे शुभाशुभ शकून सांगते, अशा लोकांजवळ परमेश्वर कदापि वास करीत नाही. ते एका अभंगात म्हणतात, परमेश्वराच्या निस्सीम भक्ताला सर्व वेळ व काळ शुभ असतात. त्यांच्यासाठी सर्व दिशा फलदायी असतात. अंधश्रद्धेचा आचार पाळणार्‍या लोकांच्या डोळ्यात संत व त्यांच्या साहित्याने झणझणीत अंजन घातले आहे. ते ढोंगी साधूंबद्दल -
ऐसे संत झाले कळीं | तोंडी तमाखूची नळी ॥
स्नानसंध्या बुडविली | पुढे भांग वोडविली ॥
भांगभुर्खा हे साधन | पचीं पडे मद्यपान ॥
तुका म्हणे अवघें सोंग | तेथे कैंचा पाडुरंग ॥
(तु. गा. २८४७)
अशा प्रकारे आचरणाला महत्त्व देणार्‍या सर्व संतांनी वैदिक वाङ्मय हे जगातील सर्वश्रेष्ठ मानले. त्यानुसार आचरण केल्यास मनुष्यमात्रास सद्गती प्राप्त होते. कारण वेद या शब्दाचा अर्थच ज्ञान असा होतो. त्यांनी वेदशास्त्रांना प्रमाणभूत मानून वेदांची महतीच प्रतिपादन केली आहे. संत वेदनीतीचा प्रचार व प्रसार करू, असे म्हणतात.
वाचा बोलो वेदनीती | करू संती केले ते ॥
(तु. गा. २६०)
संत ज्ञानेश्वर वेदमार्गानेच जाण्याविषयी
वेदमार्गे मुनी गेले | त्याची मार्गे चालिलो ॥
(ज्ञा. गा. ९६०)
वेदमार्गाचे आचरण करण्याविषयी संत एकनाथ ‘भागवता’त सांगतात-
ऐसा माझा वेदु हितकारी | दावूनी गुणदोष नानापरी ॥
जन काढी विषया बाहेरी | वेद उपकारी जगाचा ॥
(ए. भा. २१/७७)
आचारासंबंधी श्रीमद्भागवतामध्ये महर्षी व्यासांनी सांगितलेला मार्ग असा -
निर्बीजा पृथ्वी निचा महत्त्वगंता भूपाला ॥
निजधर्मकर्मरहिता | विप्रा भागवता ॥ (श्रीमद्भागवत)
जगाला अहितापासून वाचविणारी व हिताचा मार्ग दाखविणारी वेदासारखी दुसरी माउली नाही, असे संत ज्ञानेश्वर सांगतात.
पै अहितापासुनि काढिती | हित देऊन वाढविती ॥
नाही श्रुतीपरौती | माउली जगा ॥
(ज्ञानेश्वरी १६/४६१)
 
 
Saints Sermons  : सर्व संतांनीसुद्धा वेदाचीच महती गायिली आहे. वेदमार्गाचे आचरण ही सर्वोत्कृष्ट आचारसंहिता आहे. वेदांमध्ये ऋषिमुनींनी जे सांगितले आहे, ते वर्तविण्यासाठीच आम्ही या ठिकाणी आलो आहोत, असा ते आपल्या जन्माचा उद्देशही सांगतात-
आम्ही वैकुंठवासी | आलो याचि कारणासी ॥
बोलिले जे ऋषी | भावे साच वर्ताव्या ॥
झाडू संतांचे मारग | आडराने भरले जग ॥
उच्छिष्टाचा भाग | शेष ते सेवूं ॥
अर्थे लोपली पुराणें | नाश केला शब्दज्ञाने ॥
विषयलोभी मन | साधने हे बुडविली ॥
पिटूं भक्तीचा डांगोरा | कळिकाळासी दरारा ॥
तुका म्हणे करा | जेजेकार आनंदे ॥
(तु. गा. ५२०)
समाजातील सर्वांचे कल्याण व्हावे. सर्वांचा संसार सुखाचा व्हावा. सर्वांना शाश्वत सुख मिळावे व ईश्वरप्राप्ती यासाठी संतांनी कर्तव्यकर्माचा जो उपदेश केला आहे, सर्वांसाठी जो अनुकरणीय असा आचारधर्म सांगितला आहे, तो पूर्णपणे समाजबद्ध आहे. ‘भक्तिरस म्हणजे ब्रह्मरस’ हा देवाचा प्रसाद त्यांनी सर्वांना वाटला. संसार दुःखरूप आहे. परंतु, मनात सदैव श्रीहरीचे चिंतन असेल तर संसारिक आपत्तीचे भय वाटत नाही. संसार सुखाचा होतो. हा भक्तिरस सेवन करण्याचा अधिकार आहे. तेथे उच्च-नीच कोणी नाही.
ब्राह्मण क्षेत्री वैश्य शूद्र, चांडाळा आहे अधिकार |
बाळे नारीनर आदि करोनि वेश्या ही ॥
(तु. गा. ११३७)
Saints Sermons  : अशा प्रकारे मनुष्यमात्रांनी जीवन जगत असताना वेदनीतीचा अंगीकार करावा, वेदमार्गाने जावे, असा आदर्श आचाराचा मोलाचा संदेश संत आपल्या अभंग वाङ्मयातून देतात. विहित कर्माचे आचरण करणे आहे. कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे केव्हाही श्रेष्ठ आहे. कर्म केल्याविना कोणत्याही जीवाचा निर्वाह होणे अशक्य आहे. संतांनी भक्तांसाठी त्यांचा भक्तिभाव व संपन्न आचाराचा जीवनक्रमच त्यांच्या अभंग वाङ्मयातून मांडला आहे. त्यांनी प्रपंच टाळला नाही. जनसामान्यांनाही तो टाळणे शक्य नाही. हे जाणून त्यांनी जो उपदेश केला, जे शाश्वत नीतिशास्त्र सांगितले, मानवी जीवनावरची त्यांची निष्ठा व आस्था दिसून येते.
 
-७५८८५६६४००
Powered By Sangraha 9.0