काँग्रेसची विचारधारा सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर

    दिनांक :15-Jan-2025
Total Views |
- मल्लिकार्जुन खडगे यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली, 
काँग्रेसचे नवे मुख्यालय लोकशाही, सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्षतेच्या पायावर उभे आहे. सतत समावेशी विकासाचे प्रतिक असून, ते काँग्रेसच्या विचारधारेचे दर्शन घडवणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेस अध्यक्ष Mallikarjun Kharge मल्लिकार्जुन खडगे यांनी आज केले. इंदिरा भवन नव्या काँग्रेस मुख्यालयाचे उद्घाटन झाल्यावर उपस्थितांना संबोधित करताना खडगे म्हणाले की, नवीन मुख्यालयाच्या भिंती काँग्रेसच्या १४० वर्षांच्या जुन्या आणि गौरवशाली इतिहासाचे प्रतिक असून, त्या सत्य, अंहिंसा, त्याग, संघर्ष आणि देशभक्तीचे स्मरण करून देणार्‍या आहेत.
 
 
Mallikarjun Kharge
 
Mallikarjun Kharge : ही काही साधारण इमारत नाही. ती या देशाच्या मातीतून तयार झालेली असून, लाखो लोकांच्या कठोर आणि बलिदानाचे फळ आहे. ही इमारत नेहमीच विशेष मूल्यांसाठी उभी आहे. स्वातंत्र्य आंदोलनाचे फळ म्हणजे आपल्या देशाचे संविधान आहे. नवीन इमारत काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांच्या रक्तातून उभी झाली आहे, असे खडगे म्हणाले. काँग्रेसच्या विचारधारेवर विशिष्ट विचारधारेच्या लोकांकडून सातत्याने हल्ले सुरू असताना या विचारधारेसमोर आत्मसमर्पण न करता काँग्रेसच्या विचारधारेचे संरक्षण तुम्ही करीत असलेला संघर्ष कौतुकास्पद आहे. काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास असणारे लोक कधीच कोणाला घाबरत नसतात. काँग्रेस मुख्यालयातून निघालेली विचारधारा देशाच्या कानाकोपर्‍यात तुम्हाला पोहोचवायची आहे, असे ते म्हणाले.
 
 
Mallikarjun Kharge : रा. स्व. संघावर हल्ला चढवताना खडगे म्हणाले की, आपली विचारधारा हजारो वर्षे जुनी आहे. ती त्यांच्या विचारधारेसारखी कालची नाही. आमच्या जवळ शिव बुद्ध आहे, गुरू नानक आहे, कबीर आहे आणि महात्मा गांधी आहे. त्यामुळे आमची विचारधारा कोणी संपवू शकत नाही. या सर्वांनी आपल्याला योग्य मार्ग दाखवला आहे. या देशाची जडणघडण, सद्भावना, शांती आणि एकतेच्या पायावर झाली आहे. तिला कोणी छेद देऊ शकत नाही.