स्मशानात श्रद्धांजली अन् स्मशानातच रस्त्याची चिरफाड

15 Jan 2025 14:44:26
सतिश वखरे
हिंगणघाट
Pimpalgaon Cemetery शंभर जातात आणि परत मात्र 99 येतात... इथे जाण्याची सर्वांनाच भीती वाटते... जायचे प्रत्येकालाच हे माहिती असतानाही आज कसे वाचू यासाठी प्रयत्न केले जातात. पण, तालुक्यातील एक गाव वेगळेच म्हणावे. येथे त्याला अखरेचा निरोप द्यायला जाण्यासाठीही भीतात. 10-15 वर्षात अखेरच्या मार्गावर लाखो खर्च झाले. कशावर असा प्रश्‍न आजही उपस्थित होतो... काल स्मशानात प्रेत जळत होते. दुसरीकडे श्रद्धांजली सभा सुरू होती आणि या मार्गाचा प्रश्‍न उपस्थित करून रस्त्याची दुरुस्ती हीच श्रद्धांजली ठरेल अशी गुगली थेट खासदारांवर टाकल्या गेली!
 
 
Pimpalgaon Cemetery, MP, Hinganghat, Cemetery
 
हिंगणघाट शहरापासून केवळ 3 किमी अंतरावरील पिपळगाव या गावातील स्मशानभूमीकडे जाणार्‍या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली असून खाद्यावर अंतिम प्रवासाला निघणारा तिरडीवर पहूडलेला असतो. परंतु, खांदेकरूंसह निरोप देण्याकरिता जाणार्‍या आप्तस्वकियांची चांगलीच दमछाक होते. विशेष म्हणजे मागील सात ते आठ वर्षात या पिंपळगावच्या स्मशान भूमीकडे जाणार्‍या या दीड किमी अंतरावरील रस्त्यावर लाखो रुपये खर्च झाले आणि पुन्हा त्याच रस्त्यासाठी अजून काही लाख मंजूर झाल्याची माहिती आहे. हा मार्ग स्मशानभूमी व काही शेतकर्‍यांच्या शेतात जातो. Pimpalgaon Cemetery हा रस्ता माती व गिट्टीने तयार केला असून जागोजागी जमिनीतून वर आलेले दगडं असलेल्या या मार्गावर दुचाकीवरून जाणे म्हणजे दिव्यच! पावसाळ्यात तर शेवटचा निरोप देण्यासाठी जाणार्‍यांचे हाल बेहाल होतात. खांद्यावर तिरडी सांभाळत रस्त्यावर झालेल्या चिखलातून वाट काढण्याचे कसब गावकर्‍यांनी शिकुन घेतले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून हीच अवस्था कायम आहे असे गावकरी सांगतात. 14 रोजी हिंगणघाट येथील जुन्या पिढीतील काँग्रेस नेत्या रजनी वानखेडे यांच्या अंतिम यात्रेत आलेल्या खा. अमर काळे यांच्या समोर गावकर्‍यांनी श्रद्धांजली सभेतच या रस्त्याबाबत व्यथा मांडल्या. त्यावर खा. काळे यांनी हा मार्ग तयार करून देण्याचे आश्‍वासन दिले. हा मार्ग दुरुस्त व्हावा यासाठी गावकर्‍यांनी अनेकदा अनेकांना निवेदनं दिले. परंतु, त्याचा उपयोग शून्य. हा रस्ता दुरुस्त होणे म्हणजे रजनी वानखेडे यांना त्यांच्याच सहविचारी पक्षाकडून खरी श्रद्धांजली ठरेल अशी चर्चा सुरू झाली.
Powered By Sangraha 9.0