भारतीय खेळांना आंतरराष्ट्रीय मान्यता

18 Jan 2025 06:00:00
वेध
- हेमंत सालोडकर
Indian sports : सध्या भारताची राजधानी नवी दिल्लीत पहिला खो-खो विश्वचषक-२०२५ सुरू आहे. या स्पर्धेला सर्व स्तरांतून भरभरून पाठिंबा आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळत आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे यशस्वी आयोजन पुढील कार्यक्रमांसाठी प्रेरक आणि खेळाडूंच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरेल, यात शंका नाही. सध्या जगात आणि भारतातही फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन, बास्केटबॉल, हॅण्डबॉल, कुस्ती आणि अन्य आंतरराष्ट्रीय खेळांचा दबदबा असताना आपला भारतीय खेळ म्हणवला जाणारा खो-खो हा क्रीडा प्रकार चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
 
 
kho-kho
 
Indian sports : आपल्याकडे खेळ म्हणजे फक्त क्रिकेट, फुटबॉल आणि हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या इतर खेळांनाच प्राधान्य दिले जाते. भारतीय खेळ कबड्डी, खो-खो याकडे दुर्लक्ष होत होते. पण तरुण क्रिकेट, फुटबॉल खेळतील तर अन्य क्रीडा प्रकाराकडे जाणार कोण, असा प्रश्न निर्माण होतो. पण आजचा युवा चोखंदळ असल्याने त्याने कबड्डी व खो-खो या खेळातही करीअर करण्याचे धाडस दाखवले आहे. त्यातूनच तालुका स्तरापासून तर थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डी आणि खो-खोने सर्वांना लक्ष वेधून घेण्यास भाग पाडले. याचाच परिणाम म्हणून दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत पुरुषांचे २० आणि महिलांचे १९ संघ खेळत आहेत. २०३० मध्ये होणार्‍या एशियन अजिंक्यपद आणि २०३२ मध्ये होणार्‍या ऑलिम्पिक या प्रमुख स्पर्धांमध्ये खो-खोचा समावेश करण्याचा भारतीय खो-खो महासंघाचा प्रयत्न असल्याचे महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी सांगितले. खो-खो सध्या देशांमध्ये खेळला जातो. मात्र, ऑलिम्पिकमध्ये समावेशासाठी हा खेळ ७५ देशांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. पण ९० देशांमध्ये हा खेळ पोहोचवून त्याचा अधिकाधिक विस्तार करण्याचा आणि ऑलिम्पिकमध्ये दिमाखदार प्रवेश मिळण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सर्वाधिक देश सहभागी असलेला हा पहिलाच विश्वचषक आहे. यापूर्वी कोणत्याही विश्वचषकात १४ पेक्षा अधिक देशांचा सहभाग नव्हता. खेळाने एक नवीन विश्वविक्रम करत या पहिल्याच विश्वचषकात २३ देशांचा सहभाग झाला आहे. यावरून खो-खोला भविष्यात भरभराटीचे आणि खेळाडूंच्या उत्कर्षाचे दिवस येतील, असा सर्व चाहत्यांना विश्वास आहे.
 
 
 आता आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होणार म्हणजे नियमांची कठोर अंमलबजावणी आली आणि स्पर्धा अधिक रंगतदार, रोमांचक करण्यासाठी ते आवश्यक आहे. जसे टी-२० क्रिकेट संथ खेळून चालत नाही तसेच खो-खोकडे चाहत्यांना आणि खेळाडूंना आकर्षित करण्यासाठी काही नियम करावे लागतील. खो-खोमध्ये डाईव्ह हा प्रकार चांगला रुजला आहे. त्यामुळे समोरच्या गड्याला बाद करताना या तंत्रात कसब पणाला लावावे लागणार आहे. यात अनेक खेळाडूंनी कौशल्य प्राप्त केले आहे. यात मुंबई उपनगरचा अनिकेत पोटे याने ‘डाईव्ह किंग’ नावलौकिक मिळविला आहे. अनिकेतने पेरूविरुद्धच्या सामन्यात सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा मान मिळविला. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक खेळाडूंनी ते कसब शिकण्याचा प्रयत्न केला. खो-खो स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील खेळाडूंना चांगली संधी मिळाली आहे. या खेळात कौशल्य प्राप्त करून ते आपल्या कुटुंबासह शहराचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवतील. अधिकाधिक मुली खो-खो स्पर्धा खेळल्याने या क्रीडा प्रकाराची आयपीएल, केपीएलसारखी स्पर्धा घेता येईल. क्रिकेट, कबड्डीसारखे मोठ्या प्रमाणात फ्रेंच्याईझी खेळाडूंवर बोली लावतील आणि खेळाडूंच्या आयुष्याला कलाटणी मिळू शकते.
 
 
Indian sports : आतापर्यंत केवळ मातीत खेळला जाणारा हा खेळ मॅटवर खेळल्यास खेळाडू जखमी होण्याचे प्रमाण कमी होईल आणि त्याला अधिकाधिक स्पर्धांमध्ये भाग घेता येईल. यामुळे अधिक रोमांचक आणि थरारक होतील. चाहत्यांनाही सामन्याचा आनंद लुटता येईल. सोबतच खेळाडू आपले कौशल्य कायम राखू शकतो. इतर खेळांप्रमाणे यांनाही चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे हे सरकारचे काम आहे. मागील काही वर्षांपासून खेलो इंडिया, खेलो इंडिया युथ गेम्स, विद्यापीठस्तरीय स्पर्धांमुळे युवांचा खेळाकडे कल वाढला आहे. यात ते स्वदेशी खेळाला महत्त्व देत आहेत. ही ओढ अशीच कायम राहिली आणि कबड्डी, खो-खो, मल्लखांबसारख्या खेळांना प्रोत्साहन मिळाले तर भारतीय खेळांची दखल जागतिक क्रीडा समुदायाला घ्यावी लागेल. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा मानाने फडकेल. पहिल्या खो-खो विश्वचषकावर भारतीय महिला आणि पुरुषांनी आपल्या नावाची अमिट मुद्रा उमटवावी, यासाठी शुभेच्छा. 
 
- ९८५०७५३२८१
Powered By Sangraha 9.0