वर्धेत दारू विक्रेत्याच्या नावानेच चौक!

    दिनांक :18-Jan-2025
Total Views |
फिरता फिरता,
प्रफुल्ल व्यास,
 
 
वर्धा, 
Wardha News : राज्यातील पहिल्या दारू‘बंदी’ जिल्ह्यात आजही मागाल तिथे आणि पाहिजे ती दारू ‘खुलेआम’ मिळते. आता तर दारूबंदी उठवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. वर्धा नगर पालिकेला आपल्या हक्काच्या जागांची माहिती नाही. एवढी अनास्था असलेल्या नपच्या हद्दीत सर्वात मोठा अवैध दारू विक्रेता म्हणून ओळख असलेल्याच्या नावाने चौकाची पाटी लागली आहे.
 
 

WARDHA 
 
 
वर्धेत आरती टॉकीज असल्याने आरती चौक, वंजारी आडनाव असलेले राहणार्‍यांची संख्या जास्त असल्याने वंजारी चौक, गजानन सायकल स्टोअर्स असल्याने गजानन चौक, शिवाजी चौक, आर्वी नाका, धुनिवाले, बजाज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक त्या त्या ठिकाणाच्या महात्माने ओळखले जातात. काही वर्षांपूर्वी आप्पाजी जोशी चौक आणि रामधाम चौकाची निर्मिती झाली. पाषण चौक त्या परिसरात राहणार्‍यांनाच माहिती आहे. सोशालिस्ट चौक हा जुन्या काळात जाहीर सभांसाठी प्रसिद्ध आहे. बढे चौकही बढेच्या पानठेल्याने प्रसिद्ध आहे. शिवाय पत्रावळी, अंबिका हे चौकही आहेत. जवळपास 8 वर्षांपुर्वी वर्धेत रेमण्ड शो रूम सुरू झाले त्यावेळी बढे चौक ऐवजी रेमण्ड चौक असे निमंत्रण पत्रिकांमध्ये नमुद केले होते.
 
 
या बाबत ‘तरुण भारत’ने उद्घाटनापूर्वीच वृत्त प्रकाशीत केल्याने तो बढे चौक कायम राहिला. आता वर्धेत स्व. रामप्रसाद साहू या नावाने चौकाची निर्मिती झाल्याचे फिरता फिरता कळले. या नावाचा मोठा महिमा आहे. रामप्रसाद साहू शहरातील काही वर्षांपूर्वी सर्वात मोठा दारू विक्रेता होता. 20-22 वर्षांपूर्वी पोलिस अधीक्षकाने या दारूविक्रेत्याच्या डोक्यावर दारूची पेटी ठेऊन गावातून ढिंड काढल्याची वर्धेकरांना आठवण आहे. त्याच्या घरात पोलिसांनी छापा मारल्यास पोलिसांचे दोन डग्गे भरतील एवढी दारू सापडत होती.
 
 
त्याच्यानंतर त्याच्या मुलांनीही हा व्यवसाय सांभाळला. आज ‘स्व. रामप्रसाद साहू चौक’ अशी पाटी लागली आहे. रस्ता किंवा चौकाला नावं देण्यासाठी नपकडे परवानगी घ्यावी लागते. मात्र, या चौकाची नोंद वर्धा नपकडे नाही. या संदर्भात नपचे मोटघरे यांच्यासोबत संपर्क साधला असता वर्धेतील चौकांसंदर्भात माहिती उपलब्ध नसल्याचे तरुण भारत सोबत बोलताना सांगितले. नप प्रशासन या दारू विक्रेत्याच्या नावाने असलेल्या चौकाच्या पाटीविषयी किती गांभीर्यान घेते, हे बघावे लागेल.