संतांचा हितोपदेश

    दिनांक :19-Jan-2025
Total Views |
संत प्रबोधन
Saint Updesh  : संतांचे सहज बोलणे हे हितोपदेश करण्यासारखे असते. संतांची वाणी ही नेहमीच लोक कल्याणाकरिता झिजलेली आहे. संत जे त्यामध्ये कुणाचेही अहित नसते तर लोकहितासाठीच त्यांच्या कर्म वाणीचा संकल्प असतो. संतांनी लोकांना त्यांच्या जीवन जगण्यामध्ये कोणकोणत्या जीवनमूल्यांचा अंगीकार केला तर मानवी जीवन अधिक सुखमय व निरामय होऊ शकते, असा संदेश त्यांनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून व कीर्तनाच्या माध्यमांद्वारे समाजाला दिला. त्यांनी समाजाचे प्रबोधन करता करता समाजाला एक डोळस दृष्टी काम केले.
 
 
sant-tukaram
 
समाजातील सर्व जाती-धर्माचे संत या लोकोद्धाराच्या कार्यामध्ये सहभागी झाले होते. प्रत्येक प्राणिमात्राविषयी भूतदया, मानवता व लोककल्याणाचा दृष्टिकोन त्यांच्याकडे होता. लोकोद्धाराच्या या कार्य मंदिर उभारणीमध्ये संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची रचना व हरिपाठाचे अभंग रचून या मंदिराचा पाया रचण्याचे महत्त्वाचे कार्य केले. तर, नामदेवांनी त्या मंदिराच्या भिंती बांधण्याचे कार्य म्हणजे कार्याचा महाराष्ट्राबाहेरही विस्तार केला. त्यानंतर एकनाथांनी त्यावर घुमट चढविण्याचे कार्य ‘एकनाथी भागवत’ रचून व आपल्या वागणुकीतून केले. तुकारामांनी लोकशिक्षणाच्या या मंदिराचा कळस चढविण्याचे महत्त्वाचे कार्य अभंगवाणीच्या व कीर्तनाच्या निमित्ताने कार्य केले.
संत बहिणाबाई यांनी लोकशिक्षणाच्या या कार्याचे वर्णन खालील अभंगात केले आहे-
संतकृपा झाली | इमारत फळा आली ॥
रचिला पाया | उभारिले देवालया ॥
नामा तयाचा किंकर | जेणे केला हा विस्तार ॥
नाथ दिला भागवत | तोचि मुख्य आधार ॥
तुका झालासे कळस | भजन करा सावकाश ॥
 
 
लोकशिक्षण, लोककल्याण मानवता, भूतदया, ईश्वरभक्ती, विचारशैली, कर्मकांड, मूठमाती
Saint Updesh : संतांचे लोकोद्धाराचे व लोकशिक्षणाचे कार्य अलौकिक आहे. संतांनी सर्व समाजाला शिकवण दिली, त्यांनी प्रत्येक व्यक्तीमध्ये भगवंत पाहण्याचे काम केले. तो कोणत्या समाजाचा आहे. शिक्षणाने फक्त शिक्षित होऊन चंगळवाद, भोगवादाकडे आकृष्ट होणारी फार मोठी जनसंख्या आज प्रत्ययास येत आहे. शिक्षण वाढले, पण संस्कार नासले. नुसत्या शिक्षणाने माणूस फक्त शिक्षित होतो. सु-शिक्षित होत नाही. मूल्याधिष्ठित शिक्षणाची आज गरज आहे. संतश्रेष्ठांनी आपल्या जीवनमूल्यांना स्थान दिले. अनुभूतीतून विचार निवेदन केला. संस्कृतिसंपन्न अभंग रचना हे महाराष्ट्र देशीचे संतवैभव आहे. तुकोबांनी एक वेगळी दृष्टी जीवन जगण्याची व्यक्त केली. व्यक्तिगत आत्मविष्कार निवेदन करणारा हा आगळावेगळा संतकवी मानवी मनाची उत्तुंगता सदैव प्रकट करतो. चांगले पेरले तर चांगलेच उगवते, ही त्यांची मोलाची शिकवण होती. महाराष्ट्र ही संताची वीरांची भूमी आहे. ज्याप्रमाणे या भूमीत वीरांनी आपल्या तेजोपताका फडकवून महाराष्ट्राची आण, बाण आणि शान कायम राखली. त्याचप्रमाणे येथील संतांनी दया, क्षमा, शांतीचा संदेश देऊन समाजात मानवता रुजविण्याचे कार्य केले. संतांनी अद्वैताचा अंगीकार करून प्राणिमात्रात देव शोधण्याचा प्रयत्न केला. शिवाय ‘जे जे भेटे भूत | ते ते मानिजे भगवंत’ दृढ संकल्प धरून त्याप्रमाणे आचरण केले. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे धर्ममंदिर उभारण्यात ज्ञानदेवापासून तर तुकारामांपर्यंत सर्वच संतांचे कर्तृत्व महत्त्वाचे ठरले आहे. संत तुकाराम शिष्या बहिणाबाई हिचा ‘संतकृपा झाली’ हा भागवत मंदिराविषयीचा अभंग प्रसिद्ध आहे. एका अर्थाने संत बहिणाबाईने एकूनच भागवत संप्रदायातील संतांचे कार्य आणि कर्तृत्व यांचा आलेखच आपल्या अभंगातून साकार आहे. भागवत मंदिराचा पाया रचण्याचे काम ज्ञानदेवांनी केले तर या मंदिराचा कळस होण्याचे भाग्य तुकारामांना लाभले; आणि त्यावरील फडकती ध्वजा होण्याचा बहुमान बहिणाईला प्राप्त झाला, असे स्पष्ट रचून तिने त्यातून भागवत परंपरेचा सर्व तपशील प्रभावीपणे मांडला आहे.
 
 
संतांची सामाजिक एकात्मता गरजेची
संत ज्ञानेश्वरांनी उपासना व ज्ञानसाधनेची कर्मयुक्त प्रेमभक्तीचा, ज्ञानभक्तीचा करून स्त्री शूद्रांना भक्तिमार्ग दाखविला. शिवाय तळागाळापर्यंत ‘गीतार्थ’ पोहोचविण्याचे अतुलनीय कार्य केले. विशेष म्हणजे या धर्ममंदिराची पायाभरणी त्यांनी मातृभाषेने केली. ज्ञानेश्वरांच्या पश्चात नामदेवांनी ज्ञानेश्वरांच्या चिद्विलासाचा आणि भगवद्भक्तीचा विस्तार करून भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत नेली. तर, संत एकनाथांनी गुरू जनार्दन स्वामींकडून दत्त परंपरा आणि ज्ञानेश्वरांपासून वारकरी परंपरा यांचा सुरेख मेळ भागवत मंदिराला आधार दिला. त्यामुळेच समाजाच्या अठरापगड जातीतील संतांना त्यात आपली भावपुष्पे समर्पित करता येऊ शकली. अशा समृद्ध मंदिरावर तुकारामांनी सुवर्णकळस चढविला, तोही आपल्या सौंदर्यपूर्ण आणि आशयघन असणार्‍या अभंगगाथेने. ज्ञानेश्वरांनी मांडलेला तत्त्वविचार आणि केलेला भक्तिमार्गाचा पुरस्कार असा एखाद्या रजत प्रपाताप्रमाणे संत तुकारामांपर्यंत येऊन ठेपला आणि भागवत मंदिराचे कार्य पूर्णत्वास गेले.
 
 
संतांचा भक्तिसंदेश समजून घेणे गरजेचे
Saint Updesh : संत तुकारामांनी आपल्या वाङ्मयाचा ‘अभंग’ कळस भागवत धर्माच्या इमारतीप्रमाणे दिला. तो कळस शतकनुशतके उन्हा-पावसाला आणि वादळ-वार्‍याला पुरून डौलाने ठामपणे आजही उभा आहे. तुकारामांनी बहुजनाला प्रेमभक्तीत एकवटलेले तत्त्वज्ञान दिले. नामस्मरणाची उपासना शिकविली आणि प्रपंच करतानाच परमार्थ कसा साधावा याची साक्ष पटवून दिली. त्यामुळे भागवत मंदिराचा अधिकच दृढमूल झाला. संत तुकाराम जसे भक्तिसागरात तरून निघाले, त्याचप्रमाणे त्यांनी इतरांना तरण्याचे कार्य केले. केवळ मानवांविषयीच नव्हे, तर समस्त प्राणिमात्रांविषयी त्यांच्या ठिकाणी करुणा होती. त्यामुळेच सन्मार्ग सोडून कुमार्गात लागणार्‍या, आपले हित न जाणणार्‍या अज्ञ जनांना ते मोठ्या कळवळ्याने उपदेश करतात.
नका धरू कोणी | राग वचनाचा मनी ॥
बहूतांचे हित |
शुद्ध करोनि राखा चित्त ॥
नाही केली निंदा |
आम्ही दूषिलेंसे भेदा॥
तुका म्हणे मज |
येणे विण काय काज ॥३॥
यात त्यांचा स्वतःचा कोणताच स्वार्थ नाही. त्यांचे स्वतःचे कोणतेच कार्य त्यांना साधायचे नाही तर समस्त जगाला नीतीची शिकवण द्यावी, याची तळमळ तुकारामांना लागलेली आहे. परंतु उपदेश करताना ज्याचा जसा अधिकार आहे. त्याप्रमाणेच तो करायला पाहिजे याचाही ते कटाक्ष पाळतात. उपदेशच काय, कुठलीही गोष्ट अधिकारानुरूपच प्राप्त होत असते. भारतीय तत्त्वचिंतकाच्या तसेच सर्व संतांच्या विचारसरणीचा हा विशेष आहे.
अधिकार तैसा करू उपदेश |
साहे ओझे त्यास तेची द्यावे |
मुंगीवर भार गजाचे पालाण |
घालितां ते कार्यसिद्धि |
तुका म्हणे फांसे वाघुरा कुर्‍हाडी |
प्रसंगी तों काढी पारधी तो |
 
 
अधिकार न पाहता केलेला उपदेश निरर्थक ठरणारा असतो. त्यामुळे त्याचे उत्थान होण्याऐवजी सर्वनाशच संभवतो. यामुळे उपदेश करणारा व उपदेश घेणारा या दोघांचेही श्रम वाया जातात. संत तुकारामांनी आपल्या जन्म घेण्यामागील काय उद्देश होता हे जसे तसेच त्यांनी आपले कर्तव्यदेखील कथन केले आहे.
आम्ही वैकुंठवासी | आलो याच कारणासी |
बोलिले जे ऋषी | भावे साच वर्ताया ॥
Saint Updesh : ऋषिमुनींनी जो धर्म सांगितला, जी नीती सांगितली आणि जो आचार सांगितला, त्यातील यथार्थ भाव जाणून त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी आम्ही या मृत्युलोकात आलो आहोत, याची जाणीव ते करून इतकी स्पष्ट भूमिका ते घेतात. ज्याप्रमाणे संत तुकाराम आपल्या आचरणाचा आदर्श समाजापुढे ठेवतात, त्याचप्रमाणे ते वाणीने मार्गदर्शन करतात. अशा उक्ती आणि कृतीचा संगम त्यांच्या व्यक्तित्वात आढळतो. त्यांनी संसारसागरात बुडणार्‍या लोकांना, मोठ्या कळवळ्याने सावध करून उद्धराचा सुलभ भक्तिमार्ग दाखविला. प्रसंगी कठोर वाणीने लोकांना कुमार्गापासून दूर केले, दुर्जनांना अपमानित केले, परंतु सर्व त्यांच्यावरील प्रेमापोटी केले. त्यांचे हित साधणे हाच यामागे तुकारामांचा हेतू होता. त्यासाठी भक्तीचा डांगोरा पिटून लहान-थोर, नारी-नर या सर्वांनाच आवाहन केले.
‘फुकाचे ते लुटा सार | व्हावे अमर सदैव ॥
असे सांगून भवसागरात बुडणार्‍यांसाठी नामाचे तारू सज्ज केले. त्यामुळेच आज ४०० वर्षांनंतरही त्यांच्या कवितेचे अभंगत्व टिकून आहे. इतकेच तर तुकारामांची कविता मराठी माणसाच्या अंतःकरणात घर करून बसली आहे, हे त्यांच्या अभंगवाणीचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे.
 
 
सSaint Updesh : र्व व्यक्ती माझीच रूपे असल्याने मी त्यांच्यापासून भिन्न नाही, त्यांची सर्व दुःखे माझी आहेत. सभोवतालच्या लोकांमध्येच ईश्वर वास करीत असतो, अशी भावना ठेवून, मानवसेवा हीच ईश्वरसेवा त्यांनी मानली. ‘सेवा’ या नवीन जीवनमूल्याचा त्यांनी खर्‍या अर्थाने समाजाला करून दिला. कर्मकांडाच्या, भोंदूगिरीच्या, भविष्यकाराच्या, अंधश्रद्धेच्या नादी न लागता खरे संत ओळखून सत्य भक्ती करावी, अशी शिकवण त्यांनी समाजाला दिली. माणुसकी हाच खरा धर्म आहे. त्यामुळे धर्ममार्तंडांनी सांगितलेल्या धर्माच्या व्याख्या, त्यांची व्रतेवैकल्ये, तीर्थाटने, नवस, अंगारे-धुपारे, भगवी वस्त्रे, केश वाढविणे या सर्व बाह्य बाबींना अंतःकरण शुद्ध काहीही अर्थ उरत नाही. अनुभवावीन सर्व काही व्यर्थ आहे. आत्मज्ञान हेच सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. त्यामुळे आत्मखूण असल्याशिवाय ईश्वर भेटत नाही, हे तत्त्वज्ञान त्यांनी जगासमोर मांडले. संत साहित्याने अध्यात्मासोबतच विज्ञानवादी दृष्टिकोन समाजाला पटवून दिला. अवघ्या जगाचे कल्याण व्हावे, हाच विशुद्ध हेतू संतांच्या अंतःकरणात आहे.
 
प्रा. डॉ. हरिदास आखरे
७५८८५६६४००
••