तभा वृत्तसेवा
वर्धा,
Sandeep Deshmukh : वडील सुरेश देशमुख भाऊ समिर दोघेही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना माजी आमदार देशमुख यांचे धाकटे चिरंजिव संदीप यांनी आज रविवार 19 रोजी शिर्डी येथे आयोजित अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राकाँत प्रवेश घेतला. ते राजकारणात सक्रीय होऊ शकतात, असा अंदाज तरुण भारतने व्यक्त केला होता.
वर्धा जिल्ह्यात शरद पवार आणि अजित पवार यांची पार्टी वेगवेगळी झाल्यानंतर शरद पवार गटाकडेच बहुमत होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत हिंगणघाटात राजकीय भूकंप झाला. वर्धेतही समीर देशमुख यांनी शरद पवार गटाकडेे विधानसभेची त्यापूर्वी लोकसभेकरिताही मोर्चे बांधणी केली होती. गेल्या पंचवार्षिकमध्ये समीर यांनी देवळीत महायुतीत शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. दरम्यान, यशवंत शिक्षण संस्थेतील वाद चव्हाट्यावर येणे, जिल्हा मध्यवर्ती बँक डबघाईस येणे, बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांचे वेतन रखडणे आदी विषय कायम चर्चेत राहत गेले. यशवंत शिक्षण संस्थेतील वाद बाहेर येत असल्याने काही ज्येष्ठ संचालकांनी अध्यक्षपद सुरेश देशमुख यांनी घेण्याचा आग्रह केला होता.
दरम्यान, सुरेश देेशमुख यांचे धाकटे चिरंजिव संदीप यांचाही राजकारणात प्रवेश होण्याची चर्चा सुरू असताना आज संदीप देशमुख यांनी राकाँत प्रवेश घेतला. त्यांच्यासोबत यशवंत शिक्षण संस्थेचे संचालक शशांक घोरमाडे यांनीही प्रवेश घेतला. संदीप देशमुख हे बापुरावजी देेशमुख सहकारी सुतगिरणीचे अध्यक्ष होते तसेच रमाबाई देशमुख पब्लिक स्कूलची सक्रीय जबाबदारी त्यांच्याकडे असुन ते निर्णयक्षम म्हणून यशवंतच्या शैक्षणिक वर्तुळात ओळखले जातात.