मुण्डकोपनिषदातील अंगीरस-शौनक संवाद

22 Jan 2025 06:00:00
धर्म-संस्कृती
- प्रा. दिलीप जोशी
Angiras-Shaunak : दशोपनिषदातील अत्यंत महत्त्वाचा आणि आपला विज्ञानमय कोश पुष्ट करणारा उपनिषद म्हणजे ‘मुण्डकोपनिषद’ होय. हा उपनिषद अथर्ववेद अंतर्गत असल्यामुळे याला ‘अथर्वेदीय उपनिषद’ असेही म्हणतात. अथर्ववेदात प्रश्नोपनिषद, मुण्डकोपनिषद, माण्डुक्योपनिषद हे प्रमुख उपनिषद तर आहेतच; याशिवाय गर्भोपनिषद, ब्रह्मबिंदू, जलबिंदू, अमृतबिंदू, नारायण, तापिनी इत्यादी २४ गौण उपनिषदही आहेत. पण मुण्डकोपनिषद सर्व परिचित आणि संविधानात उल्लेखित उपनिषद आहे. मुण्डकोपनिषदाला ‘मुण्डक’ असे नामाभिधान का झाले ? या संबंधात विविध अभ्यासकांचे मत थोड्या फार भेदाने पाहावयास मिळते. ‘मुण्ड’ या शब्दावरूनच आपल्या लक्षात येईल की, मुण्ड म्हणजे आपले डोके. मुण्ड हे उत्तमांग आहे. त्यातही प्रमुख भाग आहे बुद्धी. बुद्धी तशी शांत राहू शकत नाही. म्हणजे बुद्धीला विषय हवाच हवा. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी आपल्या प्रसिद्ध अभंगात स्पष्ट केले-
भक्त ऐसे जाणा जे देही उदास | गेले आशापाश निवारोनी
विषय तो त्यांचा झाला नारायण | नावडे जन धन माता पिता ॥
 
 
angiras
 
त्यांनी देही उदास ज्यांना आशापाश जखडू शकत नाही, ज्यांना जन-धन, माता-पिता म्हणजे ऐहिक, संसारिक बाबी, नातेसंबंध, पैसा; इतकेच काय, माता-पित्यातही ज्यांचे मन आणि बुद्धी अडकत नाही, त्यांना ‘भक्त’ म्हटले आहे. पण बुद्धीला तर विषय लागतोच; बुद्धीचा विषय नारायणच असल्यावर बुद्धीचा विषयच संपतो. ज्यांच्या बुद्धीचा म्हणजे मुण्डक्याचा विषय भोग नसून बुद्धीचा विषयच नारायण असे जे साधक आहेत त्यांचे वर्णन संत तुकाराम महाराजांनी केले. म्हणजे ज्यांच्या डोक्यात म्हणजे मुण्डक्यात फक्त नारायण आहे. अशाच निरपेक्ष साधकांनी हा उपनिषद अभ्यासावा लागतो म्हणून हा मुण्डकोनिषद आहे. दुसरा अर्थ पाहू- मुण्डण करणे म्हणजे संन्यास दीक्षा घेताना मुंडण करण्याचा संस्कार असतो. म्हणजे हा उपनिषद अभ्यासताना संन्यस्त वृत्तीने म्हणजे वृत्तीने श्रवण करावा. ‘संन्यस्य श्रवणम् कुर्यात’ हे आपले तत्त्वच सांगते. म्हणून या उपनिषदाला ‘संन्यासोपनिषद’ असेही म्हणतात. पूर्वी हे उपनिषद अभ्यासण्यापूर्वी मुण्डणाची पद्धत होती. आपल्या संस्कृतीत केस हे भोगाचे लक्षण आहे. केशवपन म्हणजे भोगवासनेतून निवृत्ती होय. वासना, कामना, आसक्ती, ममत्व यांचा त्याग म्हणजे मुण्डण होय. हा त्याग करणाराच मुण्डकोपनिषदांचा अधिकारी हे नाव दिले आहे. उपनिषदात एक व्रत सांगितले आहे त्याला शिरोव्रत किंवा अग्निधारा व्रत म्हणतात. या व्रतात शिष्य गुरूंकडे जाताना संन्यस्थ होऊन डोक्यावर धगधगता अग्नी धारण करून जात असे. शिरोव्रताचे अनुष्ठान केल्याशिवाय ब्रह्मविद्या देऊ नये, हे मुण्डकोपनिषद सांगतो.
तदेतत्सत्यमृषिरंगिराः पुरोवाच नैतद्चीर्णव्रतोधीते ॥
 
  
Angiras-Shaunak : यामध्ये अग्नीप्रमाणे धगधगती जिज्ञासा, ओढ, तीव्रता मुण्डावर करून हा उपनिषद शिकावा. म्हणूनही याला मुण्डकोपनिषद म्हणतात. थोडक्यात हा उपनिषद संन्यस्त वृत्तीने अभ्यासावा. मुण्डकोपनिषदाचे एकूण ६५ मंत्र आहेत. ते तीन अध्यायात म्हणजे तीन मुण्डकात प्रश्नोत्तर स्वरूपात विभाजित केले आहेत. अध्याय म्हणजे मुण्डक होय. यात पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष आहेत, ज्याला शंका म्हणजे पूर्वपक्ष आणि निरसन म्हणजे उत्तर होय. या उपनिषदात ब्रह्मविद्या म्हणजे जन्ममृत्यू, वार्धक्य, रोगव्याधी यांनी व्याप्त असलेला संसार आणि यासाठी कारण असणारी अविद्याकामकर्मग्रंथी या सर्वांचा निरस करून परब्रह्म स्वरूपापर्यंत नेते; ती ब्रह्मविद्या होय. या ब्रह्मविद्येचा संक्रमण प्रवाह या उपनिषदात आहे. सर्वप्रथम चतुर्भुज ब्रह्माने ही ब्रह्मविद्या आपला ज्येष्ठ पुत्र अथर्व ऋषींना सांगितली. अथर्व ऋषींनी ती अंगीरा सांगितली. त्यांनी ती सत्यवह ऋषींना सांगितली. त्यांनी ती अंगीरस ऋषींना सांगितली. या अंगीरस ऋषींच्या जवळ शौनक ऋषी गेले. शौनकांनी ब्रह्मविद्येसंदर्भात उपस्थित केलेल्या शंकांचे अंगीरस ऋषींनी केलेले निरसन म्हणजे ‘मुण्डकोपनिषद’ होय.
ब्रह्म देवानां प्रथमः संबभूव विश्वस्यकर्ता भुवनस्य गोप्ता |
स ब्रह्मविद्या सर्वविद्याप्रतिष्ठाम् अथर्वाय ज्येष्ठपुत्राय प्राह ॥१॥
अथर्वणे यां प्रवादेत ब्रह्माथर्वा पुरोवाचांगिरे ब्रह्मविद्याम् |
दुसर्‍या शब्दात या उपनिषदात अंगीरस-शौनक संवाद आहे. शौनकांनी सुरुवातीलाच प्रश्न केला की-
कस्मिन्नु भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवतीति ॥३॥
कोणती अशी वस्तू आहे की, ज्या एकाच वस्तूचे ज्ञान प्राप्त केल्यावर विश्वातील सर्व वस्तू जाणल्या जातील? त्याचे उत्तर अंगीरस ऋषींनी खूपच यथार्थ दिले.
तस्मै स होवाच, द्वे वेदितव्ये इति ह |
स्म यद्ब्रह्मविदो वदंति परा चैव अपरा च ॥
या विश्वात दोनच विद्या जाणण्यास योग्य आहेत त्या म्हणजे पराविद्या आणि अपरा विद्या. यावर झालेला संवाद म्हणजे मुण्डकोपनिषद होय. ज्ञान आणि सत्य याचे विवेचन यात आहे. परब्रह्म स्वरूप अस्ती आणि नास्ती स्वरूपात असल्याचे हा उपनिषद सांगतो. प्रणवध्यानाचे आत्मज्ञान प्राप्ती, आत्मानुभूती अशा विविध बाबींवरची प्रश्नोत्तरी येथे आहे.
तपसा चीयते ब्रह्म, ततोन्नमभिजायते |
अन्नात्प्राणो मनः सत्यं लोकः कर्मसु चामृतम् ॥
 
 
ब्रह्मापासून सर्वप्रथम अन्न, त्यापासून प्राण, त्यानंतर अनुक्रमे मन, सत्य, लोक, कर्म निर्माण झालीत. त्यानंतर त्या कर्माची अमृतस्वरूपाची अविनाशी फळे निर्माण झालीत. शरीररूपी वृक्षावर जीव आणि आत्मा असे दोन राहतात. जीव आपल्या कर्मानुसार फळे चाखतो अथवा दुःखही भोगतो. आत्मा परमात्म्याशी तादात्म पावण्याचे सामर्थ्य ठेवतो. नदी जशी सागराला मिळाली की आपले नामरूपरहित होते तसेच आत्म्याचे होय. अजून एक महत्त्वाचे- ‘सत्यमेव जयते’ हे भारताचे राष्ट्रीय वाक्य मुण्डकोपनिषदातीलच आहे.
सत्यमेव जयति नानृतं, सत्येन पंथा विततो देवयानः ॥३|१॥६॥
सत्याचाच विजय होतो, असत्याचा भारतीय राज्यघटनेत भारतरत्न डॉ. आंबेडकरांनी जी राजमुद्रा स्वीकारली त्या खाली ‘सत्यमेव जयते’ अंकित केले आहे. हे भारताचे राष्ट्रीय घोषवाक्य मुण्डकोपनिषदातून घेतले आहे. ज्ञान संप्रदाय एखाद्या मर्त्य व्यक्तीपासून उद्भवला नसून ते अपौरुषेय, अद्भुत, गुह्य, अलौकिक अशा परब्रह्म परमात्म्याचे ब्रह्मरसाचे संतर्पण आहे. गुरू-शिष्य परंपरा आणि त्या मंथनातून प्राप्त झालेले नवनीत म्हणजे होय. 
 
- ९८२२२६२७३५
 
Powered By Sangraha 9.0