हिंदू संस्कृतीत अर्थशास्त्राची बीजे

22 Jan 2025 06:00:00
चिंतन
- गुरुदत्त दिनकर वाकदेकर
Mahakumbh Mela : सध्या उत्तरप्रदेशातील प्रयागराज शहरात गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगमावर जगातील सर्वात मोठे तात्पुरते स्थापन झाले आहे. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत या तात्पुरत्या शहरात जगातील सर्वात मोठा मेळा ‘महाकुंभ’ आयोजित असून ४२०० हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या महाकुंभ मेळ्याच्या परिसरात केवळ भारतातीलच नाही तर जगभरातून भाविक आणि पर्यटक येऊ लागले आहेत. यावेळी महाकुंभ मेळ्यात ४०-४५ कोटी भाविक आणि पर्यटक येतील, असा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. यामुळेच महाकुंभ मेळ्यावर लहान-मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे लक्ष आहे. महाकुंभ मेळ्याच्या तयारीसाठी केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकारनेही मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले असून महाकुंभ मेळा केवळ उत्तरप्रदेशच नव्हे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेला नवीन चालना देईल, असा अंदाज आहे. भारतातील जवळजवळ सर्व राज्यांमध्ये अनेक प्रमुख धार्मिक स्थळे आहेत, राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आत्ताच अयोध्या आणि काशीमध्ये हे दिसून आले की, उत्तरप्रदेशच्या अर्थव्यवस्थेला येथून अचानक बूस्टर डोस कसा मिळाला आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या काळात १३.५६ कोटी लोकांनी अयोध्येत दर्शनासाठी भेट दिली होती, याच काळात १२.५१ कोटी लोकांनी ताजमहाल पाहण्यासाठी आग्र्याला भेट होती. यावेळी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ८ लाख लोक काशी विश्वनाथ कॉरिडॉरवर दर्शनासाठी पोहोचले. गुजरात, ओडिशा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू यांसारख्या राज्यांमध्ये मंदिरांमधून मिळणारे उत्पन्न राज्य सरकारला आधार देत आहे. राजस्थान, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि मध्यप्रदेश यासह इतर राज्यांमध्ये मोठे मेळे भरतात. प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यासाठी केंद्र व राज्य सरकारने १५ हजार कोटी रुपयांचे बजेट वाटप केले आहे. ५६६ प्रकल्प राबविण्यात आले आहेत.
 
 
Mahakumbh Mela
 
Mahakumbh Mela : मेळा परिसर उभारण्यात २१ विभागांनी सहभाग घेतला आहे. यावेळी मेळा क्षेत्रही वाढविण्यात आले आहे. २०१९ च्या अर्धकुंभात मेळा क्षेत्र ३२०० हेक्टरमध्ये पसरलेले होते, जे यावेळी ४२०० हेक्टरमध्ये पसरलेले आहे, यावेळी लांबी ८ किलोमीटरवरून १२ किलोमीटरपर्यंत वाढली भाविक आणि पर्यटकांसाठी १८५० हेक्टरमध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पुलांची संख्या २२ वरून ३० करण्यात आली आहे. दीड लाख तात्पुरती आणि दीड लाख कायमस्वरूपी शौचालये बांधण्यात आली आहेत. मेळा परिसरात १.७५ लाखांहून अधिक तंबू उभारण्यात आले असून २५ हजार लोकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. मेळा परिसर ६७ एलईडी दिवे, फ्लडलाईटनी प्रकाशमान करण्यात आला आहे. उत्तरप्रदेश सरकारने ७२६०.४५ कोटी रुपयांचे बजेट पारित केले आहे; ज्याद्वारे ४४१ प्रकल्प आणि १२५ विभागीय प्रकल्प पूर्ण झाले आहेत. यापैकी ७५ टक्के इमारतींमध्ये कायमस्वरूपी संरचना आहेत. यातील जास्तीत जास्त ४२ टक्के रक्कम पूल आणि रस्त्यांच्या विकासावर खर्च करण्यात आली आहे.
 
 
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी दावा केला आहे की, महाकुंभ मेळ्यामुळे राज्यात २ लाख कोटी रुपयांची आर्थिक वाढ होईल. २०१९ च्या कुंभमेळ्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेत १.२ लाख कोटी रुपयांचे योगदान दिले. उत्तरप्रदेश सरकारला भाडे, सेवा शुल्क आणि करांच्या स्वरूपात महसूल मिळेल. परिसरातील टेंट सिटीमध्ये २००० रुपयांपासून ते ८० हजार रुपयांपर्यंतचे आलिशान तंबू उपलब्ध महाकुंभ मेळ्याच्या तयारीतूनच ४५ हजारांहून अधिक कुटुंबांना रोजगार मिळाला आहे. मेळ्यातून देशभरातील लोकांना रोजगार आणि आर्थिक लाभ मिळत आहे. इतिहासावर नजर टाकली तर, १८८२ मध्ये ब्रिटिश राजवटीत प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याच्या आयोजनावर सरकारी तिजोरीतून २०,२२८ रुपये खर्च झाले होते, तर सरकारला २९,६१२ रुपये नफा झाला होता आणि त्यातून ४९,८४० रुपये उत्पन्न होते. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार २०२१ मध्ये देशात ६७.७ कोटी लोक धार्मिक पर्यटनासाठी बाहेर पडले होते. २०२२ मध्ये ही संख्या १४३.९ कोटींवर पोहोचली. २०२२ मध्ये धार्मिक पर्यटनातून मिळालेले उत्पन्न ७.९ अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून १६.२ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढले होते.
 
 
२०२३ मध्ये भारतातील धार्मिक पर्यटन बाजारपेठ ११७२.१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची होती. ते २०३२ दरम्यान १७.७५ टक्के चक्रवाढ वार्षिक वाढीच्या दराने ५१०२.३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. धार्मिक स्थळांकडे भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी सुरू केल्या जात आहेत. रिटेल स्टेट कन्सल्टंट सीबीआरआयने त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, रिटेल ब्रँड्सनी तिरुपती, पुरी, अमृतसर, अजमेर यांसारख्या मध्यम आकाराच्या शहरांमध्ये उत्पादने लाँच केली आहेत. अमृतसर, अजमेर, कटरा, सोमनाथ, वाराणसी, शिर्डी, पुरी, अयोध्या, मथुरा, तिरुपती, द्वारका, बोधगया, गुरुवायूर आणि मदुराई येथे आध्यात्मिक पर्यटनाच्या वाढीचा फायदा किरकोळ ब्रँड घेत आहेत. जगातील सर्व मोठे अन्न उद्योग भारतातील धार्मिक पर्यटन स्थळांकडे वळले आहेत.
 
 
Mahakumbh Mela : २०१४ मध्ये देशात सत्ता हाती घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थळांच्या विकासावर विशेष भर दिला आहे. सरकार धार्मिक स्थळांच्या पुनरुज्जीवन आणि दळणवळणावर खूप वेगाने काम करत आहेत. स्वदेश दर्शन आणि प्रसादसारख्या विविध योजनांच्या माध्यमातून १२० प्रकल्प राबविण्यात आले आहेत; ज्यावर ६,८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. देशात १.५ लाख किलोमीटरचे रस्त्यांचे जाळे पसरले आहे. ५०० हून अधिक नवीन मार्ग आणि १५० हून अधिक नवीन विमानतळांमुळे हवाई संपर्क वाढला आहे. केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकार भारतासह जगभरात महाकुंभाचा प्रचार करीत आहेत; जेणेकरून अधिकाधिक लोकांना प्रयागराजमध्ये आणता येईल. महाकुंभात प्रथमच उच्च तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. डिजिटल एक्सपिरीयन्स सेंटरपासून ते कुंभ सहायक चॅटबॉटपर्यंत, जे ११ भारतीय भाषांमध्ये संवाद साधण्यास सक्षम सुरू करण्यात आले आहे. चेहरा वाचणारे कृत्रिम बुद्धिमत्तेसह सुसज्ज कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ड्रोन विरोधी यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. शौचालय स्वच्छतेपासून ते पोलिस यंत्रणेपर्यंत सर्व गोष्टींसाठी अ‍ॅप्स बनवण्यात आले आहेत. जगात पहिल्यांदाच, गुगल मॅप्स एका तात्पुरत्या शहरात नेव्हिगेशन सुविधा प्रदान करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभाला ‘महापर्व’ या काळात जगातील सर्वात मोठा मानवांचा मेळावा होत असून गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या पवित्र संगमावर कोट्यवधी लोक सहा मोठ्या स्नान पात्रांवर स्नान करतील आणि हे स्नान देशाच्या अर्थव्यवस्थेला एक नवीन मार्ग दाखवेल; जे देशाला आध्यात्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या आणखी पुढे घेऊन जाईल. महाकुंभ हा केवळ स्नान आणि पुण्य मिळविण्याचा उत्सव तर तो उत्तरप्रदेश आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला एक नवीन दिशा आणि गती देईल. प्रयागराज मेळा प्राधिकरणाला महाकुंभातून सुमारे २००० कोटी रुपये मिळतील. जाहिरातींमधून ३० कोटी रुपये आणि अंदाजे १०० दुकानांमधून विक्रीतून ६० कोटी रुपये उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. याशिवाय, विविध हॉटेल, रेस्टॉरंट्स, व्यापार क्षेत्र आणि प्रदर्शनांमधील उत्पादनांच्या विक्रीतून २५० कोटी उत्पन्न अपेक्षित आहे. 
 
- ९९८७७४६७७६
Powered By Sangraha 9.0