वेध
- विजय निचकवडे
Saif Ali Khan गरिबाचं कितीही मोठं दुःख असलं ना, ते नगण्य असं छोटेसं असतं. पण तेच एखाद्या श्रीमंत व्यक्तीला साधं खरचटलं तरी अनेकांच्या काळजाचे ठोके चुकतात. राजकारण्यांना कंठ फुटतो आणि मीडिया तर किंकाळ्या मारत सुटते. कारण ‘ती’ व्यक्ती सेलिब्रेटी असते! एका सेलिब्रेटीवरील हायप्रोफाईल हल्ल्याच्या निमित्ताने चार दिवस जे वातावरण ढवळून निघाले, कदाचितच सामान्यांसाठी हे झाले नसते! म्हणूनच तर ‘तो सैफ होता म्हणुनी ’ असं कुठेतरी वाटून जातं. खरं तर दुःख, वेदना आणि कुणावर आलेली संकटे ही गरीब-श्रीमंत अशी मापदंड लावून मोजणे म्हणजे माणुसकीला तिलांजली दिल्यासारखे होईल. मात्र आज वास्तव हेच आहे. जिथे नाते पैशात मोजले जाते. पैशासाठी रक्ताच्या नात्याचा विसर आम्हाला पडतो, तिथे दुःख, वेदनाही अशाच गरीब-श्रीमंतीच्या तराजूत मोजल्या जाऊ लागल्या आणि लोकांचे व्यवहार त्याच दृष्टीने बदलू लागले. खरं तर दुःख हे गरीब श्रीमंत किंवा संबंधित व्यक्तीची पत-प्रतिष्ठा पाहून ठरविले जायला नको, पण आज तेच होत आहे.
चार दिवसांपूर्वी सिने अभिनेता Saif Ali Khan सैफ अली खान यांच्या घरी चोरीच्या मानसिकतेने शिरलेला चोर, खान यांच्यावर झालेला चाकूहल्ला आणि त्यानंतर ज्या पद्धतीने राजकीय नेते, माध्यमे विशेषत्वाने इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रशासन आभाळ कोसळल्यागत वागू लागले; यातून लोकांचे दुःख आता वाटल्या गेल्याचाच भास होतो. एरवी एखाद्याच्या घरी हीच घटना घडली असती तर खरंच मुंबईत बसून राजकीय नेत्यांनी अशा झालेल्या घटनेला घेऊन गळे काढले असते का? माध्यमांनीही खरंच एका चोरीच्या घटनेला अशा पद्धतीने जिव्हाळ्याचा विषय बनवून लावून धरले असते का? आणि पोलिस यंत्रणा इतक्या सजगतेने कामाला लागून जीवाचे रान करून चोरट्याला पकडण्यासाठी धावली असती का? कदाचित सामान्य माणूस या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्कीच नाही असे देईल. पण या ‘तो सैफ होता म्हणूनी’ सर्वकाही झाले.
सैफ यांच्यावरील झालेला हल्ला नक्कीच समर्थनार्थ किंवा दुर्लक्षित करण्यासारखा नाही, पण तो सैफ होता म्हणून जे काही झाले, ते सामान्य नागरिकांना त्यांची लायकी दाखवून देणारे आहे. पोलिसांची ३५ पथके हल्लेखोराला शोधण्यासाठी तैनात होतात. २०० पोलिस गराडा घालून एका झिलपट हल्लेखोराला पकडतात. आमचे नेते काढू लागतात. कायदा सुव्यवस्था ढासळल्याचे छाती पिटून शांततात. काही जण सैफचे समर्थन करण्याच्या नादात विषयाला धार्मिक रंग देण्याच्या नादात हा हल्ला तैमूरवर तर नव्हता, असे बोलून प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करतात. तर दुसरीकडे माध्यमं जणू काही आभाळ कोसळल्यागत या विषयाचा किस काढू लागतात. मग सैफ ऑटोने दवाखान्यात गेल्यापासून काही त्यांना दाखवावेसे वाटते. या सर्व गोष्टी कधी सामान्य लोकांच्या बाबतीत झाल्या आहेत का हो? १० वर्षांपूर्वी भंडार्यात पटेल आणि शिंदे या दोन कुटुंंबावर अशाच चोरीच्या हेतूने हल्ला झाला.
Saif Ali Khan पटेल कुटुंबाने आपली सून गमावली तर शिंदे कुटुंबातील लेकीचे आयुष्य कायमस्वरूपी अपंगत्वामुळे उद्ध्वस्त झाले. पण त्याचे दुःख ना राजकारण्यांना झाले, गळे काढणार्या मीडियाला आणि पोलिस यंत्रणेलाही फारसे महत्त्व वाटले नाही? कदाचित ज्यांचे जीव गेले ते सेलिब्रेटी नव्हते म्हणून किंवा त्यांचे आडनाव ‘खान’ नसल्याने असावे! पालघरमध्ये दोन साधूंना ठेचून मारण्यात आले, तेव्हाही हे दुःख कुणाला मोठे वाटले नाही. गुन्हे अनेक घडतात. जे सैफ सोबत झाले, ते रोज कित्येकांसोबत होत असावे, त्याची तीव्रता कुणालाही जाणवत नसावी. आज ज्या पद्धतीने सैफचा विषय डोक्यावर घेतला गेला, नव्हे याला इव्हेंट बनवून मांडण्याचा प्रयत्न केला गेला, त्यात राजकारण्यांचे ढोंग, माध्यमांची अतिशयोक्ती आणि पोलिसांची सेलिब्रेटीप्रती असलेली सजगता दिसून आली. सगळ्यांची ही तळमळ खरंच सामान्यांच्या प्रती दिसली तर कदाचित सैफसारख्या व्यक्तींवर होणारे हल्ले चर्चेचा आणि उपहासाचा होणार नाही. सैफचे घर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यापासून चाकूचा तुकडा प्रदर्शनीत जतन करून ठेवण्याचा सल्ला देण्यापर्यंत जर लोकांच्या मनात सगळ्यांच्या वागण्याचे नकारात्मक भाव उमटत असतील तर ‘तो सैफ होता म्हणुनीच’ हा सर्व खटाटोप झाला, असेच म्हणावे लागेल.
- ९७६३७१३४१७