राहुल गांधींचे डोके फिरले तर नाही...!

23 Jan 2025 06:06:00
दिल्ली वार्तापत्र
 
श्यामकांत जहागीरदार
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते Rahul Gandhi राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या नव्या मुख्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणावरून नवा निर्माण झाला आहे. वादग्रस्त विधाने करत स्वत:सोबत पक्षालाही अडचणीत आणण्याची आता राहुल गांधी यांना सवय झाली; नव्हे आधीच अडचणीत असलेल्या पक्षाला आणखी अडचणीत आणण्यासाठीच राहुल गांधी यांचा जन्म झाला की काय, असे वाटण्यासारखी स्थिती आहे. राहुल गांधी अशी वादग्रस्त विधाने अनावधानाने करतात की जाणीवपूर्वक हे समजत नाही. मात्र काहीही तरी त्यामुळे ते स्वत: अडचणीत येतात आणि पक्षालाही वारंवार अडचणीत आणत असतात.
 
 
rahul gandhi
 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांचे ताजे विधान अतिशय धक्कादायक आहे. यातून त्यांनी देशाविरुद्ध लढण्याचे आवाहन जनतेला केले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते असलेल्या राहुल गांधी यांनी प्रतिस्पर्धी पक्ष म्हणून भाजपावर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणे समजण्यासारखे आहे. पण स्व. संघावर टीका करताना त्यात देशाला ओढणे अनाकलनीय आहे. आपण भाजपा, रा. स्व. संघ आणि भारत राष्ट्राशी लढत आहे; हा राजकीय संघर्ष नाही, असे विधान राहुल गांधी यांनी केले. राहुल गांधी यांना नेमके म्हणायचे काय हे त्यांनाही समजले की नाही, ते समजायला मार्ग नाही. भाजपा आणि रा. स्व. संघाविरुद्ध गांधी आणि काँग्रेस लढत आहे, हे एकवेळ समजून घेता येईल, पण ‘भारत राष्ट्राविरुद्ध आपल्याला लढायचे आहे’ या वाक्याचा अर्थ त्यांनी स्पष्ट करून सांगितला पाहिजे. आपण काय बोलतो, त्याचा अर्थ काय निघू शकतो आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो, याचा विचार बोलायच्या आधी राहुल गांधी करत नाही असे दिसते किंवा करण्याची क्षमताच त्यांच्यात नाही, असे म्हणायचे का? राहुल गांधी आता फक्त खासदार वा काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते अशा घटनात्मक पदावर आहेत. घटनात्मक पदावरील व्यक्तीने कसे वागावे, कसे बोलावे याचे काही निकष तसेच संकेत आणि मर्यादा असतात, पण राहुल गांधी यांनी सर्व संकेत आणि मर्यादा धाब्यावर बसवल्या राहुल गांधी देशाविरुद्ध लढण्याची भाषा कशी काय करू शकतात, याचे आश्चर्य वाटते. त्यांची भाषणे कोण लिहितात, लिहिलेली ही भाषणे नंतर पक्षातील वरिष्ठ नेते वा माध्यम विभागातील कर्तेधर्ते तपासत नाही का, अशा प्रश्न पडतो. व्यासपीठावर भाषणाला उभे होण्याच्या आधी राहुल गांधी आपले भाषण तपासत नाही का? त्यात स्वत:चे (असेलच तर) वापरून त्यात सुधारणा करत नाही का, असाही प्रश्न आहे.
 
 
विशेष म्हणजे यावेळी काँग्रेस पक्षाच्या नव्या मुख्यालयाच्या उद्घाटनाचा मुहूर्त त्यांनी पाहिला. आधीच्या जुन्या २४, अकबर रोड या काँग्रेस मुख्यालयातूनही राहुल गांधी यांनी पक्षाला वारंवार अडचणीत आणले होते. आता नवीन मुख्यालयातूनही त्यांनी पक्षाला अडचणीत आणण्याचा पहिल्याच दिवशी श्रीगणेशा केला. राहुल गांधी आपल्या वर्तनाने आणि शब्दांनी काँग्रेस पक्षाचे जेवढे नुकसान केले, तेवढे आजपर्यंत एकाही अध्यक्षाने अगदी सीताराम केसरी यांनीही केले नाही. देशाविरुद्ध लढण्यासाठी देशवासीयांना चिथावण्याची भाषा करत राहुल गांधी यांनी आपला राष्ट्रद्रोहीपणा सिद्ध केला आहे. राहुल गांधी यावेळी जी भाषा बोलले ती माओवादी, नक्षलवादी आणि अतिरेक्यांची भाषा आहे, असे म्हटले तर चूक ठरू नये. आपल्या या विधानाने राहुल गांधी यांनी स्वत:ला माओवादी, नक्षलवादी आणि अतिरेक्यांच्या लाईनमध्ये उभे केले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी आतापर्यंत केलेले सर्व माफ करण्यासारखे असले, तरी यावेळचा त्यांचा गुन्हा माफ करण्यासारखा नाही. देशाविरुद्ध लढण्याचे आवाहन करणारा, मग तो कोणीही असो, त्याची कृती ही राष्ट्रद्रोहाची आहे, यात नाही. त्यामुळे आज रामशास्त्री प्रभुणेंसारखे न्यायाधीश असते, तर त्यांनी राहुल गांधींच्या या गुन्ह्यासाठी त्यांना देहांत प्रायश्चित्ताची सजा निश्चितच सुनावली असती, यात शंका नाही. राहुल गांधी यांच्यामुळे आतापर्यंत काँग्रेस पक्षाचा एक पैशाचाही फायदा झाला नाही.
 
 
Rahul Gandhi : आपल्या नेतृत्वात आतापर्यंत एकही निवडणूक ते पक्षाला जिंकून देऊ शकले नाही. राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष एकाही राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष विजयी झाला नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा तर प्रश्नच उद्भवत नाही. राहुुल गांधी यांच्या नेतृत्वात सलग तीन लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा नुसता नाही तर दारुण पराभव झाला. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सत्ता तर सोडा; पण विरोधी पक्षनेतेपद मिळेल, एवढ्याही जागा काँग्रेस पक्षाला नाहीत. तरीसुद्धा राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे डोळे उघडत नाही, याचे आश्चर्य वाटते. काँग्रेस पक्षाचे डोळे मिटवल्याशिवाय राहुल गांधींना शहाणपण येणार नाही, असे म्हटले तर ते चूक ठरू नये. भाजपा आतापर्यंत काँग्रेसमुक्त भारताच्या गोष्टी करीत होती, पण भाजपाचे हे विधान राहुल गांधी यांनी फारच मनावर घेतलेले दिसते. भाजपाचे काँग्रेसमुक्त स्वप्न साकारण्यासाठी भाजपा नेत्यांनी जेवढा पुढाकार घेतला नाही, त्यापेक्षा जास्त पुढाकार राहुल गांधी घेत आहेत, याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. राहुल गांधींनी आपल्या कर्तृत्वाने काँग्रेस पक्षाचेच नाही तर समस्त इंडिया आघाडीचेही नुसते नुकसान नाही तर वाटोळे केले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षात तसेच इंडिया आघाडीतही राहुल गांधींचे नेतृत्व कोणाची तयारी नाही. इंडिया आघाडीतून एक एक पक्ष बाहेर पडत आहे. याला राहुल गांधी यांचा स्वभाव आणि नेतृत्व कारणीभूत आहे. राहुल गांधी यांना पक्षातील आपले मित्र टिकवता आले नाही, ते मित्रपक्ष कसे टिकवू शकतील? निवडणूक मग ती विधानसभेची असो की लोकसभेची आपला पक्ष पराभूत कसा होत नाही, याची चिंता गांधींना लागली असते. भाजपाला विजयी करण्यात भाजपा नेत्यांचे जेवढे योगदान आहे, त्यापेक्षा जास्त योगदान एकट्या राहुल गांधींचे आहे. राहुल गांधींमुळे काँग्रेस पक्षाचा जेवढा फायदा झाला, त्यापेक्षा जास्त फायदा भाजपाचा होत आहे. त्यामुळे भाजपाने त्यांचे आभार मानले पाहिजे. 
 
- ९८८१७१७८१७
Powered By Sangraha 9.0