हाती काम मुखी राम...!

05 Jan 2025 05:45:00
संत प्रबोधन
Saint prabodhana : संतांनी राम मानले आहे. कामामध्येच राम मानण्याची संतांची वृत्ती त्यांच्या अभंग वाङ्मयात पदोपदी आढळते. संतांनी प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुवतीप्रमाणे कार्य करण्याचा उपदेश केला आहे.
अधिकार तैसा करू उपदेश |
साहे ओझे त्यास ते चि द्यावे ॥
मुंगीवर भार गजाचे पालाण |
घालिता ते कोण कार्यसिद्धी ॥
तुका म्हणे फासे वाघुरा |
प्रसंगी ते काढी पारधी तो ॥
(तु. गा. ३३०५)
 
 
pot-maker
 
आपल्या सवयीप्रमाणे, कष्टाप्रमाणे आपल्याला यश मिळत असते. अभ्यासाने कोणतेही कार्य साध्य होऊ शकते. श्रम, अभ्यासाला काहीही अशक्य नाही. श्रमाला संत तुकारामांनी देव मानले आहे.
साधूनी बचनाग खाती तोळा तोळा |
आणिकाते डोळा न पाहवे ॥
साधूनी भुजंग धरितील हाती
आणिके कांपती देखोनिया ॥
असाध्य ते साध्य करिता सायास |
कारण अभ्यास तुका म्हणे ॥
(तु. गा. २९८)
 
 
 
Saint prabodhana  : कर्म किंवा श्रम कुणालाही चुकलेले नाहीत. कर्माचा त्याग करणार्‍याला कधीही कर्मफल मिळत नाही.
अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलम् |
भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु सन्यासिनां क्वचित ॥
(गीता १८/१२)
आपले कार्य ईश्वराचे चिंतन करण्याने जे मानसिक समाधान मिळते, त्याला कशाचीच जोड नाही. संत जनाबाईने काम करता करताच भगवंताची भक्ती केली आहे. श्रमालाच अधिक महत्त्व दिले आहे. संत नामदेवांच्या घरी दळणकांडणाचे, झाडलोटीसारखे सामान्य काम करणार्‍या जनाबाईने कामामध्येच आपली ईश्वरसेवा घडत असल्याचे महत्त्वपूर्ण मत मांडले आहे.
दळितां कांडिता | तुज गाईन अनंता
न विसंबे क्षणभरी | तुझे नाम गा मुरारी ॥
नित्य हाची कारभार | मुखी हरी निरंतर ॥
लक्ष लागले चरणासी | म्हणे नामयाची दासी ॥
(सकल संतगाथा-संत जनाबाई, अभंग-२०४)
संत जनाबाईंनी आपले दैनंदिन कार्य करतानाच श्रीविठ्ठलाला आळविण्याचा सल्ला दिलेला आहे. त्यामुळे श्रमपरिहार तर होईलच; सोबत ईशचिंतनही घडेल. कामातच राम संदेश सर्व संत-विभूतींनी दिलेला आहे. संत एकनाथांनी सहेतुक श्रम करण्याचा उपदेश केला आहे. अन्यथा व्यक्तीला कर्मबंधाची बाधा होऊ शकते. निष्काम कर्म करणे हेच मानव हिताचे आहे.
तेवी जे कर्म स्वाधिकारें | सुखाचे दे अत्यादरे ॥
तिची कर्म अन्यायाधिकारे | दुःखे दुर्धरे भोगवी ॥
मेघ वर्षे निर्मळ जळ | परी बीज तैसे फळ ॥
एक भोगी पीक सकळ | एका सबळ साळी केले ॥
तेवी सकामी कर्म घडे | ते बाधक होय गाढे ॥
तेचि गा निष्कामा कडे | मोक्ष सुरवाडे सुखवी ॥
(ए. भा. २१/३८, ४०, ४२)
 
 
मोक्षप्राप्तीकरिता ज्ञानमार्गाएवढाच कर्ममार्गसुद्धा जीवनामध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे. उचित कर्माशिवाय ज्ञानाला मोल म्हणून कर्मयोग ज्ञानयोगापेक्षाही श्रेष्ठ आहे, असे भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात.
तो म्हणे गा कुंतीसुता | हे संन्यास योग विचारिता ॥
मोक्षकर तत्त्वता | दोनीहि होती ॥
तरी जाणां नेणां सकळा | हा कर्मयोगु कीर प्रांजळा ॥
जैसी नाव स्त्रियां बाळां | तोयतरणी ॥
तैसे सारासार पाहिजे | तरी सोहपा देखिजे ॥
येणे संन्यासफळ लाहिजे | अनायासें ॥
(ज्ञाने.-५/१५-१७ )
 
 
Saint prabodhana  : ईश्वराला भक्ताचे काम करताना कोणतीही लाज वाटत नाही तर माणसाला का लाज वाटावी, असा प्रतिप्रश्न संत तुकाराम करतात. कोणताही भक्त संकटात असताना ईश्वर एका क्षणात धावून जातो. म्हणून माणसाने आपले नियत कर्म करावेच. नियत कर्मच माणसाचे संचित असते.
करिता ही काज | नाही लाज देवासी ॥
बरे करावे हे काम | धरिले नाम दीनबंधु ॥
करूनी अराणूक पाहे | भलत्या साह्य व्हावया ॥
बोले तैसी करणी करी | तुका म्हणे एक हरी ॥
(तु. गा. २०६७)
संसारामध्ये पुष्कळ कामे असली, तरी मुखाने राम-राम म्हणण्यास विसरू नका. त्यामुळे जन्म-मरणाचे नाहीसे होतील व दुःखाने भरलेला संसार सुखरूप झाल्याशिवाय राहणार नाही. अंतकाळी, प्राणोत्क्रमणाच्या वेळी जेव्हा तुमच्याजवळ कुणीही नसेल, तेव्हा तुमचे कर्म व तुम्ही केलेले नामस्मरणच तुम्हाला मोक्षपदाला पोहोचवेल. म्हणून प्रत्येक कर्म करताना प्रभुनामस्मरण करावे. त्याने तुम्हाला सत्कर्म करण्याचे बळ प्राप्त होईल.
कामामध्ये काम | काही म्हणा रामराम ॥
जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे ॥
(तु. गा. ३९७९)
 
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे
Saint prabodhana  : तुमच्या उत्तम कर्माने व सचोटीच्या व्यवहाराने तुम्ही धन, मान, प्रतिष्ठा मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचे कर्म मात्र उत्तम ठेवावे लागतील. सत्कर्माने तुम्ही हवे ते मिळवू शकता. तुमचे कर्मच तुमचा आरसा आहे. नीतिमत्तायुक्त कर्म, परोपकारी धर्म व भूतदया या मनुष्य यशस्वी व समाधानी जीवन जगू शकतो, असे संत तुकाराम सांगतात.
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे |
उदास विचारे वेच करी ॥
उत्तम चि गती तो एक पावेल |
उत्तम भोगील जीव खाणी ॥
परउपकारी नेणे परनिंदा |
परस्त्रिया सदा बहिणी माय ॥
भूतदया गायी पशुंचे पाळण |
तान्हेल्या जीवन ॥
शांतीरूपे नव्हे कोणाचा वाईट |
वाढवी महत्त्व वडिलांचे ॥
तुका म्हणे हे चि आश्रमाचे फळ |
परमपद बळ वैराग्याचे ॥
प्रा. डॉ. हरिदास आखरे
 
- ७५८८५६६४००
Powered By Sangraha 9.0