आजन्म बंदी; पण मानसिकतेचे काय?

08 Jan 2025 06:00:00
वेध
- विजय निचकवडे
Tiger Project Tourism : आम्ही प्रत्येक गोष्टीचा अतिरेक करीत सुटलो आहोत. आपल्या अतिरेकी वर्तणुकीचा काय परिणाम होऊ शकतो? याचा विचार करण्याची शक्तीही गमावून बसलो आहोत. अशाच अतिरेकी पर्यटनाचा अनुभव डिसेंबरच्या निमित्ताने आला आणि पर्यटकांवर पर्यटनाला आजन्म बंदीसारखी कारवाई पुढे आली. कदाचित हे एका अर्थाने योग्यही आहे. स्वतःच्या आनंदासाठी प्राण्यांना वेठीस धरून आसुरी आनंदाचा अनुभव घेणे म्हणजे पर्यटन असेल तर मग मात्र अशा पर्यटनाला चाप बसलाच पाहिजे. पण यासोबतच अगतिक मानसिकता बदलणेही तेवढेच महत्त्वाचे ठरेल.
 
 
TIGER
 
जंगलात जातो, म्हणजे आम्ही वाघ्रदर्शन करण्यासाठी! वाघ दिसला तर आमची पर्यटनवारी सफल झाल्याचा आनंद आमच्या चेहर्‍यावर दिसतो. याला काही अपवादही असतात, जे निसर्गाच्या सान्निध्यात निवांत वेळ घालून खर्‍या अर्थाने पर्यटन जगतात. पण सध्या पर्यटनाच्या नावाखाली घातला जाणारा गोंधळ नक्कीच चिंतेचा विषय! आज व्याघ्र संवर्धनासाठी नाना तर्‍हेचे उपक्रम शासन स्तरावर राबविले जात आहेत. तरीही डोळ्यात धूळ झोकून वाघांची शिकार केली जातच आहे. दोन दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात घनदाट जंगलात चार तुकड्यांमध्ये आढळून आलेला मादी वाघाचा मृतदेह प्रचंड क्लेशदायी असाच आहे. ही घटना पाहून खरंच, लोकांना कशाचेच भय राहिले नाही, याची खात्री पटते. कधी कधी यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांच्याविषयीसुद्धा आपसूकच शंकेची पाल मनात जाते.
 
 
Tiger Project Tourism : वाघांचे हल्ले, त्याचे मानवी वस्तीत येणे याचा कायमच गवगवा आम्ही करतो. मग वाघाच्या घरात म्हणजेच जंगलात जाऊन त्याला वेठीस धरीत पर्यटनाचा आनंद घेण्याच्या प्रकारावर कधीच वन्यप्रेमी का विचार करीत नाही. अशा पर्यटकांविषयी वन्यजीवांसाठी झटणार्‍या संस्थाही उदासीन दिसतात. ३१ डिसेंबर रोजी उमरेड कर्‍हांडला व्याघ्र प्रकल्पात पर्यटनाच्या निमित्ताने पुढे आलेला अत्यंत कीव यावा, असा आहे.
 
 
एक वाघीण आपल्या शावकांसह जात असताना पर्यटकांच्या गाड्यांपुढे आल्यानंतर तिला मार्ग मोकळा करून देणे हा धर्म असताना चारही बाजूने तिला घेऊन छायाचित्र, चित्रफीत काढण्याच्या मोहात ‘त्या’ पाचही जणांचा जीव धोक्यात टाकणे कितपत सयुक्तिक होते. वाघांचाच नव्हे, तर पर्यटकांच्या घेर्‍यात वाघ बिथरून एखाद्या पर्यटकावर हल्ला असता तर? पर्यटकांना वाघ दिसल्याने ते भान विसरले असतील; मात्र वन विभागाचे प्रतिनिधी असलेल्या जिप्सीचालक आणि गाईड यांचे काय? त्यांना नियमांचे भान नसावे, याचे नवल वाटते. आज कारवाई झाली. जिप्सीमध्ये जे पर्यटक होते, त्यांच्यावर उमरेड-कर्‍हांडला अभयारण्यात पर्यटनाला आजन्म बंदी घालण्यात आली. नक्कीच ही कारवाई योग्य असेल. पण कारवाई करून मानसिकता बदलणार आहे का, हा प्रश्न आहे. त्यासाठी कारवाईपेक्षा स्वतःच्या कर्तव्याची जाणीव होणे अधिक गरजेचे आहे. हा प्रकार आजचा नाही. यापूर्वीही अनेकदा असे उतावीळ पर्यटक लोकांपुढे आले आहेत.
 
 
Tiger Project Tourism : आम्ही जंगलात जातो, म्हणजे जणू काही प्राण्यांवर उपकार करतो, अशीच भावना त्यांची असावी. पण आम्ही त्यांच्याच अधिवासात जाऊन त्यांना वेठीस धरतो, न बदलणारे सत्य आहे. नक्कीच पर्यटनाने अर्थचक्र गतिमान राहण्यास मदत होते, पण ते करताना आपण काय करतो? याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी. पर्यटक म्हणून नियमांचे पालन करण्याची जबाबदारी येणार्‍या प्रत्येकाची आहे. मग अशावेळी पर्यटक जबाबदारी विसरत असतील, तर जाणीव करून देण्याचे काम गाईडचे नक्कीच आहे. पण तोच जर त्यांच्या सूर मिसळत असेल तर मात्र पालथ्या घड्यावर पाणीच म्हणावे लागेल. आज जिप्सीचालक, गाईड आणि पर्यटकांवर कारवाई झाली. जिप्सीचालक, गाईड यांच्या रोजीरोटीचा विषय तीन महिन्यांसाठी गोठविला गेला. पण पर्यटक तर दुसरीकडे जाऊन पुन्हा आणखी कुठल्या वाघाला वेठीस धरून आनंद घेऊ शकतील ना? अशावेळी पर्यटक कोण? यापेक्षा त्याची मानसिकता कशी बदलेल, प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी ज्यांच्या भरवशावर जंगलात सोडले जाते, त्या गाईडला सर्वार्थाने प्रशिक्षित करून त्याचे कर्तव्य आणि नियमांचे जाणीव करून देण्याची गरज आहे. ज्यावेळी पर्यटकांचा अतिउत्साह आपल्यासाठीही अडचणीचा ठरू शकतो, हे माहिती असेल, तेव्हा कदाचित अशा पद्धतीने कुठल्या वाघाच्या परिवाराला वेठीस धरण्याची आणि नियम मोडण्याची हिंमत कुणाची होणार नाहीतर आज एका व्याघ्र प्रकल्पात आजन्म बंदी घातली तरी दुसर्‍या ठिकाणी हे घडणार नाही? याची शाश्वती कोण देणार? 
 
- ९७६३७१३४१७
Powered By Sangraha 9.0