धर्म-संस्कृती
- प्रा. दिलीप जोशी
Yama and Nachiketa : आपल्या भारतीय तत्त्वज्ञानात साधारणतः वेदांच्या एक लाख श्रुती असून त्या १) कर्मकांड २) उपासनाकांड ३) ज्ञानकांड अशा तीन भागांत विभागल्या आहेत. ज्ञानकांड केवळ चार हजार श्रुतींचे असून हे ज्ञानकांड अंतिम असल्यामुळे याला ‘वेदांतशास्त्र’ म्हटले आहे. वेदांतामध्ये ब्रह्मविद्येचे गुह्यज्ञान आहे. उपनिषद हे वेदांतावरील भाष्य असून त्यात आत्मस्वरूपाचे चिंतन आहे. उपनिषदे अनेक म्हणजे ज्यांची १०८ नावे उपलब्ध आहेत. परंतु श्रीमद्भगवत्पूज्यपाद आद्य शंकराचार्यांनी दशोपनिषदावर भाष्य केले असल्यामुळे दहा उपनिषद प्रमुख मानले जातात. या आदिशंकराचार्यांनी प्रस्थानत्रयीमध्ये स्थान दिले आहे. इतर उपनिषदांचेही महत्त्व आहेच; त्यांना ‘गौण उपनिषद’ असे म्हणतात.
दशोपनिषदात १) ईशोपनिषद, २) कठोपनिषद, ३) केनोपनिषद, ४) प्रश्नोपनिषद, ५) मुंडकोपनिषद, ६) मांडुक्योपनिषद, ७) ऐतरेयोपनिषद, ८) तैत्तरीयोपनिषद, ९) छांदोग्योपनिषद, १०) बृहदारण्यक उपनिषद. अशी ही १० उपनिषदे असून ते चार वेदांतील वेदांतशास्त्रानुसार आहेत. ज्यामध्ये- १) ऋग्वेदीय ऐतरेय उपनिषद २) यजुर्वेदापासून कठोपनिषद, तैत्तरीय, बृहदारण्यक, ईशावास्य उपनिषद ३) सामवेदातून केन आणि छांदोग्य उपनिषद ४) अथर्वेदापासून प्रश्न, मुंडक आणि मांडुक्य उपनिषद निर्माण झालेत. तसे तर ‘उपनिषद’ या शब्दाचे अनेक अर्थ विद्वानांनी लावले, पण त्यातल्या त्यात सर्वांत सोपा अर्थ म्हणजे गुरूजवळ बसून संक्रमित केलेला, समजून घेतलेला वेदांचा गूढार्थ होय. म्हणजे सान्निध्य आणि नि म्हणजे निश्चित आणि षत् म्हणजे यथार्थ. आचार्यांच्या सान्निध्यात बसून मिळविलेले यथार्थ ज्ञान म्हणजे उपनिषद होय.
Yama and Nachiketa : कठोपनिषद हा तिसरा उपनिषद आहे. वेदव्यासांच्या चार शिष्यांपैकी ऋषी वैशंपायन होते. या वैशंपायन ऋषींचे शिष्य होते आचार्य कठऋषी. कठोपनिषदाचे कर्तेऋषी आचार्य कठ असल्यामुळे नाव पडले कठोपनिषद. कठोपनिषदाची सुरुवात कथेने झालेली ब्रह्मविद्या जड वाटू नये, सहज समजावी म्हणून कथा प्रयोजन असते. आपल्या पूर्वजांमध्ये वाजश्रवा नावाचे ऋषी होते. त्यांच्या पुत्राचे नाव वाजश्रवस ऋषी. या वाजश्रवस ऋषींनी विश्वजित यज्ञ केला. या यज्ञात दानधर्माचे महत्त्व असल्याने त्यांनी गोदान संकल्प केला. गाई दान करताना त्या गाई पीतोदका, जग्धतृणा, दुग्धदोहा आणि नीरिंद्रिया होत्या.
पीतोदका जग्धतृणा, नीरिंद्रियाः |
अनंदा नाम ते लोकस्तान्स, गच्छति ता ददत् ॥
म्हणजे त्या गाई शेवटचे पाणी आणि गवत खाल्लेल्या, ज्यांनी दूध देणे बंद केले, ज्या वांझ झालेल्या आहेत. ज्या गाई गलितगात्र, मरणोन्मुख होत्या.
या वाजश्रवस ऋषींना एक पुत्र होता त्याचे नाव नचिकेता होते. हा कुमारावस्थेतील नचिकेता हे सर्व पाहत होता. पित्याकडून अशा गाई दिल्या जात असल्याने पुण्यकर्म घडणार नाही म्हणून तो आपल्या पिताश्रीजवळ जाऊन ‘मला कोणाला दान देता?’ असा प्रश्न पित्याला करू लागला. पित्याने पहिल्यांदा दुर्लक्ष केले, पण हाच प्रश्न त्याने तीन-तीनदा विचारल्यावर रागाने चिडून ते वाजश्रवस ऋषी आपल्या पुत्राला म्हणजे नचिकेत्याला म्हणाले, ‘‘जा! तुला यमाला दान केले!’’
नचिकेत्याने आज्ञा प्रमाण मानून यमाकडे जाण्याची परवानगी मागितली. तेव्हा ‘मी रागाच्या भरात बोललो’ असे वडिलांनी प्रतिपादन केले. नचिकेता आणि पिता वाजश्रवस यांचा शास्त्रोक्त संवाद झाल्यावर त्यानंतर अंतिमतः वडिलांची आज्ञा घेऊन नचिकेता यमाच्या द्वारावर येतात. यावेळी यम बाहेर गेलेले होते. तीन दिवस-रात्र नचिकेता यमसदनी उपवास करून राहिले. यमधर्म परत आल्यावर अतिथी यमांनी नचिकेत्याचे पाद्यपूजन, वस्त्रालंकार देऊन अतिथी भोजन केले. ‘माझ्यामुळे तुम्हाला तीन दिवस प्रतीक्षा करावी लागली म्हणून मी तुम्हाला तीन वर देतो’ असे यमांनी नचिकेत्याला म्हटल्यावर नचिकेत्याने तीन वर मागितले.
शांतसंकल्पः सुमना यथा स्यात वीतमन्यु गौतमो माऽभि मृत्यो |
त्वत्प्रसृष्टम् माऽभिवदेत्प्रतीत एतत् त्रयाणाम् प्रथमं वरं वृणे ॥
१) माझे वडील रागावले आहेत, त्यांचा माझ्यावरील राग कमी करून त्यांना शांतसंकल्प करा.
स्वर्गलोका अमृतत्त्वं भजंते एतद् द्वितीयेन वृणे वरेण ॥
२) ज्या तत्त्वाने अमृतत्त्व प्राप्ती होते, ते तत्त्व माझ्यात संक्रमित करा.
येयं प्रेते विचिकित्सा मनुष्ये अस्तीत्येके नायमस्तीति चैके |
एतद्विद्यामनुशिष्टस्त्वयाऽहं वराणामेष वरस्तृतीयः ॥
३) मला मृत्युरहस्यविषयक ज्ञान द्या.
Yama and Nachiketa : सूर्यपुत्र यमधर्म आणि यांचा संवाद कठोपनिषदात असून यमाने सुरुवातीला तिसर्या प्रश्नाचे उत्तर देण्यास असमर्थता दर्शवत दुसरा एखादा वर मागण्याची नचिकेत्याला विनंती केली. यमराजांनी त्याला अनेक प्रलोभनेही दाखविली. इतर काहीही माग, पण मृत्यूविषयक ही ब्रह्मविद्या मागू नको; पण नचिकेता ठाम होता.
जीविष्यामो यावदीशिष्यसि त्वं वरस्तु मे वरणीयः स एव ॥
‘मला मी मागितलेलाच दे’ यावर तो अडीग राहिला. त्यामुळे यमाने नचिकेत्याला जी ब्रह्मविद्या सांगितली ती कठोपनिषदात आहे.
- ९८२२२६२७३५