भारताला सामर्थ्यशाली करणारा प्राचीन चोल वंश

    दिनांक :09-Jan-2025
Total Views |
इतिहास
Chol Vansh : भारताला समृद्ध व सामर्थ्यशाली करण्यात व सांस्कृतिक श्रीमंती प्रदान करण्यात दक्षिण भारतातील प्रख्यात चोल वंशाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या वंशाचा इतिहास फार प्राचीन काळापर्यंत जातो. अशोकाच्या शिलालेखात चोलांचा स्वतंत्र देश म्हणून उल्लेख आहे. त्यानंतर इ. स.च्या प्रारंभीच्या सुमारास करिकाल चोलनामक अत्यंत विख्यात आणि थोर राजा होऊन त्याने पांड्य व चेर या दक्षिणेकडील राजांचा पराभव केला. श्रीलंकेवर स्वारी केली आणि तेथून बारा हजार बंदी आणून त्यांच्याकडून पुहारनामक बंदराची तटबंदी करविली. त्याची न्यायीपणाबद्दल आणि लोकोपयोगी कृत्यांबद्दलही ख्याती होती. त्याने श्रीरंगम येथे कावेरीला मोठा कालवा खणून बराच मोठा प्रदेश सुपीक केला. त्याची राजधानी तिरुशिरापल्लेेजवळ उरगपुर (उरैयूर) येथे होती. शतकाच्या अखेरीपर्यंत चोल वंशाचे सर्वसामान्य निर्देश मिळतात पण व्यक्तिनिर्देश आढळत नाहीत. सातव्या शतकातील एका ताम्रशासनात पुण्यकुमार चोल व त्याच्या पूर्वीच्या तीन पिढ्यांतील पूर्वजांची सुमारे शंभर वर्षांची माहिती मिळते. पुढे नवव्या शतकाच्या मध्यास विजयालय नामक चोल राजा पल्लवांचा मांडलिक म्हणून वावरत असल्याचे दिसते. त्याने दोन वेल्लार नद्यांमधील पांड्यांचा प्रदेश जिंकून येथे आपली राजधानी केली. त्याचा मुलगा आदित्य (सु. ८७१-९०७) हा महत्त्वाकांक्षी निघाला. त्याने पल्लव सम्राटाचा उच्छेद करून तोंड्डमंडल प्रदेश आपल्या राज्यास जोडला. त्याचा मुलगा परांतक याने भारताच्या अगदी दक्षिण टोकापर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला. पूर्वी पल्लवांचे आणि बादामीच्या चालुक्यांचे कित्येक पिढ्या वैर चालू होते, तसे आता त्यांचे उत्तराधिकारी चोल राष्ट्रकूट यांच्यामध्ये वैर चालू झाले. राष्ट्रकूट नृपती तिसर्‍या कृष्णाने ९४९ मध्ये परांतकाचा पूर्ण पराभव करून त्याचे साम्राज्य खिळखिळे केले.
 
 
Rajrajeshwar-Mandir
 
पुढे पहिला राजराज (९८५-१०१८) या चोल राजाच्या कारकीर्दीत चोलांना पुन्हा ऊर्जितावस्था आली. त्या वेळी राष्ट्रकूटांचा अस्त होऊन कल्याणीच्या चालुक्यांचा उदय झाला होता. राजराजाने केरळ (चेर) व पांड्य राजांचा पराभव केला, बेट जिंकले आणि श्रीलंकेवर स्वारी करून त्यांचा उत्तर भाग व्यापला. त्याने वेंगीच्या सिंहासनावर आपला हस्तक शक्तिवर्मा याला बसवून तेथेही आपली सत्ता पसरविली. त्याने राज्यकारभारात व जमाबंदी खात्यांत सुधारणा घडवून आणल्या. एकंदरीत त्याने पुढील चोल साम्राज्याचा भक्कम पाया घातला. त्याने कित्येक भव्य मंदिरे बांधली. तंजावरचे राजराजेश्वर (सध्याचे बृहदीश्वर) मंदिर त्याच्या स्थापत्य व शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
 
 
Chol Vansh : राजराजाने आपला पुत्र राजेन्द्र (१०१२-४४) याला युवराज म्हणून आपल्या हयातीतच नेमले होते. तो पित्याइतकाच थोर निघाला. त्याने उत्तरेत गंगानदीपर्यंत दिग्विजय केला आणि जाताना कलिंग, दक्षिण कोसल, बंगाल इत्यादी प्रदेशांच्या राजांचा पराजय करून त्यांना गंगेचे पवित्र जल वाहण्यास लावले. परत आल्यावर त्याने ‘गंगैकोंड’ (गंगाविजयी) धारण केली आणि आपल्या नावे गंगैकोंडचोळपुरमब नामक नगर स्थापून तेथे आपली राजधानी नेली. तेथे अनेक सुंदर देवालये व प्रासाद बांधले, वेदांच्या अध्ययनाकरिता मोठे विद्यालय स्थापन केले व शेतीकरिता सुमारे सव्वीस किमी. लांबीचा विशाल तलाव खोदून त्यास गंगासागर नाव दिले.
 
 
राजेन्द्र चोलाने याहीपेक्षा मोठा आणि अद्वितीय असा विक्रम केला. त्याने आरमाराच्या साहाय्याने जावा, सुमात्रा, मलाया द्वीपकल्प यांवर स्वारी करून तत्कालीन शैलेंद्रांचे साम्राज्य नष्ट केले. अशा रीतीने तो उत्तरेस गंगेपासून दक्षिणेत श्रीलंकेपर्यंत आणि पूर्वेस मलाया द्वीपकल्पापर्यंत पसरलेल्या विशाल साम्राज्याचा अधिपती झाला.
राजेन्द्राच्या १०४४ मध्ये झालेल्या निधनानंतर त्याचा पुत्र राजाधिराज गादीवर आला. त्याचे उत्तरकालीन चालुक्य नृपती पहिला सोमेश्वर याच्याशी १०५३-५४ मध्ये येथे घनघोर युद्ध होऊन त्यात तो मारला गेला. पण तेथेच रणभूमीवर त्याचा भाऊ दुसरा राजेन्द्र याने स्वत:स राज्याभिषेक करवून विजयश्री आपणाकडे खेचून घेतली.
 
 
Chol Vansh : यानंतर चोल व चालुक्य यांच्या अनेक चकमकी झाल्या. चोल नृपती वीर राजेन्द्र (१०६३-६९) याने आपली कन्या महाप्रतापी चालुक्य राजा सहावा विक्रमादित्य यास देऊन हे पिढीजात वैर प्रयत्न केला. पण तो यशस्वी झाला नाही. कारण त्याच्या मुलाला पदच्युत करून पहिला कुलोत्तुंग (१०७०-११२२) याने गादी बळकाविली, तेव्हा पुन्हा चोल-चालुक्यांचे युद्ध जुंपले. विक्रमादित्याने आपल्या मेहुण्याचा पक्ष घेऊन कुलोत्तुंगावर स्वार्‍या केल्या पण त्यांत त्याला यश आले नाही. हळूहळू चोलांची सत्ता निर्बळ झाली. कुलोत्तुंगाचे उत्तराधिकारी समर्थ न निघाल्यामुळे बाण, काडव सामंतांनी स्वातंत्र्य पुकारले. होयसळ, पूर्वेचे गंग, काकतीय, पांड्य इत्यादी राजवंश प्रबळ होऊ लागले. शेवटी पांड्य नृपती सुंदर पांड्य याने होयसळ, काकतीय इत्यादिकांचा पराभव करून शेवटचा चोल राजा तिसरा राजेन्द्र (१२४६-७९) याला आपला मांडलिक बनविले. नंतर १३१० मध्ये दक्षिणेतील इतर काही राज्यांप्रमाणे चोल राज्यावर अलाउद्दीनचा सेनापती मलिक काफूर याने स्वारी ते राज्य नष्ट केले.
 
 
चोल राजांनी विविध कलांना आणि विद्येला आश्रय दिला. त्यांनी अनेक भव्य व सुंदर देवालये बांधली. त्यांमध्ये तंजावर येथील राजराजेश्वर म्हणजेच बृहदीश्वर व गंगैकोंडचोळपुरम्?मधील गंगैकोंडचोळेश्वर ही प्रमुख आहेत. राजराजेश्वर देवालयाचे गोपूर सु. ६१ मी. उंच असून त्यात तेरा मजले आहेत. त्यावर सुंदर मूर्ती कोरल्या आहेत व वर अखंड लांबट डेरा आहे. गंगैकोंडचोळपुरमब येथील देवालय असेच भव्य असून जास्त सुंदर आहे. राजराजेश्वर देवालयात अजिंठ्याप्रमाणे अनेक सुंदर भित्तिचित्रे काढली होती पण त्यांवर नंतर दुसरी चित्रे काढल्यामुळे ती अदृश्य झाली होती. आता त्या आवरणातून त्यांना मुक्त करण्यात आले आहे.
चोलकालात पंचरसी धातूच्या अनेक सुंदर मूर्ती घडविण्यात आल्या. त्यांमध्ये मूर्ती प्रमुख आहे. ब्रह्मा,सप्तमातृका,विष्णूचे अवतार,भूदेवी इत्यादिकांच्या मूर्ती तत्कालीन चोल कलाकारांच्या ओतीव कामातील नैपुण्याची साक्ष देतात. चोल राजे शिवोपासक होते. त्यांच्या कारकीर्दीत पूर्वीच्या शैवाचार्यांच्या मूर्तीही देवालयांतून बसविण्यात येऊन त्यांची पूजाअर्चा सुरू झाली. त्यांच्या काळात रामानुजाचार्यांनी आपल्या विशिष्टाद्वैत मताची स्थापना केली. त्यांनी देवालयातील पूजापद्धतीत सुधारणा करून महत्त्वाची देवालये अंत्यजांना खुली करण्याचा पाडला.
 
 
Chol Vansh : चोलांच्या दरबारी विद्येलाही आश्रय मिळाला. केशवस्वामीचा नानार्थार्णवसंक्षेप हा संस्कृतातील विविधार्थ देणार्‍या शब्दांचा बृहत्तम कोश कुलोत्तुंगाचा पुत्र राजराज या चोलनृपतीच्या दरबारी रचला गेला. चोलांचा तमिळ वाङ्?मयाला विशेष आश्रय होता. त्यांच्या काळी जीवकचिंतामणि, कलिंगत्तुप्परणि, तक्कयागप्परणि अशी अनेक उत्कृष्ट तमिळ काव्ये रचली गेली. त्या सर्वांत कंबन कवीचे रामायण हे सर्वोकृष्ट आहे.
 
(संकलित)