सर्व काही शांत हीच अशांतता!

    दिनांक :01-Feb-2025
Total Views |
मुंबई वार्तापत्र
- नागेश दाचेवार
केंद्रात वाटा नाही, उलट केंद्र सरकार विरोधात, राज्यात वाटा नाही, उलट राज्य सरकार विरोधात, मुंबई महापालिकेत कधीचेच बाहेर आहेत. आता निवडणुका कधी होतील याची शाश्वती देखील नाही. झाल्यातरी उबाठा सत्तेत याचीही शक्यता धूसरच आहे. त्यामुळे Uddhav Thackeray उद्धव ठाकरेंना आता आपले उरलेले ९ खासदार आणि २० आमदार कसे टिकवायचे याची चिंता लागली आहे. या हताशेतून, उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे विश्वप्रवक्ते संजय राऊत या दोघांची अलिकडल्या काळात जाहीर होत चाललेली घालमेल, कालवाकालव यातून त्यांची अस्वस्थता लक्षात येते. मुळात ही आणि अस्वस्थता केवळ सत्तेत सहभागी होण्यासाठीची आहे. सतत प्रयत्न करून देखील भाजपा मात्र, यांना ताकास तूर लागू देत नसून, सरकार शांत आणि संयमाने अग्रेसर होताना दिसत आहे. सरकारचं कामकाज शांततेत चाललं असल्यामुळे ‘‘सर्व काही शांत शांत त्यामुळेच ठाकरेंचं मन अशांत’’, अशी ठाकरे अ‍ॅण्ड कंपनीची परिस्थिती झालेली आहे.
 
 
Thakary-raukt
 
२०१९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपाची २५ वर्षांची युती तुटली, नव्हे मुख्यमंत्रिपदाच्या मोहापोटी उद्धव ठाकरेंनी निवडणुकीपश्चात तोडली. भाजपासोबत निवडणूक युतीत लढली आणि गद्दारी करत युती तोडून Uddhav Thackeray उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली. रडत रडत अडीच वर्षे कशीबशी निघाली आणि एकेदिवशी एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय शिवसेनेत उभी फूट पडल्याने महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. परिणामी नाईलाजाने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पदावरून पायउतार करण्यात भाजपाचाच हात असल्याचा समज करत, उद्धव ठाकरे यांनी सातत्याने भाजपाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करण्याचा धंदा चालवला. तसं तर, हा प्रकार ठाकरे कंपनीने २०१९ मध्ये भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून युती तोडत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्यानंतर लगेचच सुरू केला होता. पण तेव्हा तो विजयाचा उन्माद होता. त्यानंतर २०२२ मध्ये सत्ता असताना, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या नाका खालून आमदार पळवून, उद्धव ठाकरेंना खुर्चीतून अपमानास्पदरीत्या खाली खेचत सत्तेतून बेदखल केले आणि भाजपासोबत सरकार स्थापन त्यामुळे एक आपला नोकर, चपला उचलायचा सोडून, माझी अर्थात मालकाची सत्ता उलथवून गेला. या धक्क्यातून ठाकरे सावरले नाहीत. त्यांना झोंबलेली मिरची बदल्याच्या भावनेतील उत्युच्च शिखरावर घेऊन गेली. मग काय सूड सूड आणि सूड उगवायचा... अशीच यांची बोल भाषा नेहमी राहिली. त्यानंतर गद्दारांना धडा शिकवायला निघालेल्या ठाकरेंना लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर तर हे कुठेच मावेनासे झाले होते. तरीही तो विजय केवळ ०.४२ टक्के मतांच्याच फरकाचा होता.
 
 
 
मात्र, मोठा विजय असल्याने आता निवडणूक लागण्यापूर्वीच राज्यात आपली सत्ता येणारच, नव्हे आलीच आहे अशा भावनेतून, दिल्लीपासून, गल्लीपर्यंत उद्धवसाहेबांनी मुख्यमंत्री मला करा, यासाठी चपला झिजवल्या. जणू निकाल लागले, बहुमत आलं आता केवळ सरकार करायचं तेवढं राहिलं असल्याच्या नंदनवनात वावरताना ते दिसत होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांचा अहंकार महाराष्ट्राच्या जनतेने चक्काचूर केला. केवळ २० जागा कशाबशा त्यांच्या वाट्याला आल्या. त्याचवेळी धडा शिकवायला निघालेल्या, ठाकरेंच्या लेखी गद्दार असलेल्यांना ५७ जागा देत भक्कम पाठिंबा महाराष्ट्राच्या जनतेने एकनाथ शिंदेंना दिला. आता शिंदेंचं राजकीय भविष्य भाजपासोबत उज्ज्वल आहे. दुसरीकडे शरद पवारांनी १९७८ मध्ये केलेल्या गद्दारीचा कित्ता उद्धव ठाकरेंकडून २०१९ मध्ये गिरवून घेत, महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत येण्याचा डाव यशस्वी केला. मात्र, शरद पवारांच्या या खेळीने उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या जीवावर बेतेल याची किंचिंतही कल्पना ठाकरेंना आली नाही. ते खुर्ची आणि पुत्र मोहात गेले. ठाकरेंची हीच नस पकडत अर्थात घेत पवारांनी स्वतः सत्तेत येण्याचा डाव रचला आणि तो यशस्वी देखील झाला. हे करत असताना पवारांनी मात्र, ‘बॅक डोअर डिप्लोमसी’ सुरूच ठेवली. त्यांनी भाजपासोबत चर्चेसाठीचा एक दरवाजा सुरू ठेवला. मात्र, त्याचवेळी पवारांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या ठाकरेंनी भाजपासोबत थेट दुश्मनी घेतली. आता शरद पवार, सुप्रिया सुळे आणि त्यांचे नेते भाजपा नेत्यांसोबत भेटतात संवाद साधतात. मात्र, त्याचवेळी ठाकरे अ‍ॅण्ड कंपनीला भाजपानेते फाट्यावर मारत असल्याचे चित्र दिसते. अशा परिस्थितीत आता सत्तेत नव्हे तर किमान राज्याच्या राजकारणात टिकून राहायचे असेल तर, भाजपासोबत जुळवून घेतले पाहिजे असे आता उद्धव ठाकरेंना कळून चुकले आहे. त्यामुळे आता भाजपासोबत जाण्यासाठी, ज्या मुखपत्रातून टीका करता करता दिवसं लोटली कौतुक केलं जात आहे. एका भाजपा आमदाराच्या लेकीच्या लग्नात चंद्रकांत पाटलांनी शिष्टाचार म्हणून दोन शब्द गोड बोलले काय तर, यांच्या आशा एकदम पल्लवित झाल्या. पण भाजपाला शिंदेंची गरज नसली तरी, युतीत दिलेला शब्द आणि बांधिलकी जपणार आणि शिंदेंना कधीही सोडणार नाही असेच संकेत ते देत आहेत.
 
 
Uddhav Thackeray : बरं ठाकरेपेक्षा माध्यमांनाच भाजपासोबत सूत जुळविण्याचा अतिउत्साह आहे. फडणवीस, ठाकरे लिफ्टमध्ये भेट, लगेच भाजपा-उबाठा एकत्र येणारच्या बातम्या सुरू, ठाकरे, फडणवीसांच्या भेटीला... भाजपा-उबाठा छुपी युती, बातम्या सुरू, चंद्रकांत पाटील हसून बोलले, अनेकांच्या भुवया उंचावल्या... बातम्या सुरू. पण वस्तुस्थिती, अमित शाहांनी शिर्डीच्या आपल्या भाषणातून स्पष्ट केली. कितीही लाईन लावा, यांचा नंबर लागणार नाही, हीच आहे. 
 
- ९२७०३३३८८६