- ट्रम्प यांची घोषणा, वायुसेनेला मिळणार बळ
वॉशिंग्टन,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. झालेल्या द्विपक्षीय बैठकीत दोन्ही देशांमध्ये अनेक करार झाले. यात ट्रम्प यांनी भारताला F-35 jet fighter एफ-३५ जेट फायटर विमाने देण्याची घोषणा केली. याशिवाय कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि लष्करी उपकरणांच्या खरेदीसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली.
दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर संयुक्त पत्रपरिषदेत ट्रम्प म्हणाले, अमेरिका भारताला अत्याधुनिक एफ-३५ जेट फायटर विमाने देणार आहे. ही जगातील सर्वांत घातक तसेच शत्रूकडून होणार्या हल्ल्याचा अंदाज घेऊन प्रतिघात करण्यासाठी सक्षम आहेत. याशिवाय कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि लष्करी उपकरणांच्या खरेदीसंदर्भात दोन्ही देशांत करार करण्यावर सहमती झाली. यापुढे भारत आणि अमेरिका जगभरातील कट्टरपंथी इस्लामिक अतिरेक्यांविरोधात एकत्र काम करणार आहे. यावेळी ट्रम्प यांनी २६/११ मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाच्या संदर्भ देत सांगितले की, अमेरिकेने राणाच्या प्रत्यार्पणास मान्यता दिल्याचा मला आनंद आहे. अतिरेकी डेव्हिड कोलमन हेडलीशी त्याचा संबंध होता. न्यायालयीन प्रक्रियेचा भाग म्हणून त्याला लवकरच भारताच्या स्वाधीने करणार आहे.
अमेरिकन वस्तूंवर कर लादणे अन्यायकारक
F-35 jet fighter : भारताकडून काही अमेरिकन वस्तूंवर लावण्यात येणारे करशुल्क अन्यायकारक आहे. परस्पर व्यवहाराचा भाग म्हणून भारत वस्तूंवर जितका कर लावेल, तितकाच कर अमेरिकादेखील भारतीय वस्तूंवर लावणार आहे. व्यापारी तूट ४५ अब्ज डॉलर्सपर्यंत कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
वसुधैव कुटुंबकम् भारताची संस्कृती : मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले, ट्रम्प ज्याप्रमाणे राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राधान्य देतात तसेच मी सुद्धा भारताच्या हिताला प्राधान्य देतो. भारत वसुधैव कुटुंबकम्वर ठेवणारा आहे, हीच आमची संस्कृती आहे. रशिया- युक्रेन युद्धावर बोलताना मोदी म्हणाले, भारत या युद्धावेळी कधीही तटस्थ नव्हता. शांततेने यावर तोडगा काढावा, हीच भूमिका भारताने घेतली.
एफ-३५ जेट फायटर विमानाची वैशिष्ट्ये
- शत्रूच्या रडारला सहज चकवा देण्याची क्षमता
- ध्वनीच्या १.६ पट वेगाने उड्डाण करण्यास सक्षम
- चालक सदस्यांना ३६० डिग्री दृश्य दाखविणारी प्रणाली
- एअर-टू-एअर, एअर-टू-ग्राऊंड आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरमध्ये कार्यक्षम
- हवेत आणि जमिनीवरून हल्ले करण्यासाठी उच्च दर्जाची क्षेपणास्त्रे