अग्रलेख...
'India-US' friendship : जगातील सर्वांत मोठी लोकशाही तसेच सर्वांत जुनी लोकशाही असलेल्या देशांच्या प्रमुखांची बहुचर्चित भेट नुकतीच झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीकडे या दोन देशांतील लोकांचेच नाही तर जगातील सगळ्या देशांचे लक्ष लागले ही फक्त दोन देशांतील राष्ट्रप्रमुख वा सरकारप्रमुखांची भेट नव्हती, तर दोन सख्ख्या मित्रांची पण भेट होती. मोदी आणि ट्रम्प यांच्यात एक विशेष असा मैत्रिभाव आहे. त्यामुळे हे दोन नेते जेव्हा भेटतात, तेव्हा त्यात फक्त औपचारिकता आणि शिष्टाचार नसतो, तर आपुलकीची आणि आत्मीयतेची भावना असते. एक मित्र दुसर्या मित्राला भेटताना जो मनमोकळेपणा असतो, तसा मनमोकळेपणा या दोन नेत्यांच्या भेटीत असतो. त्यामुळे या दोन नेत्यांच्या भेटीत आणि बैठकीत फक्त चर्चा होत नाही तर गुजगोष्टी होतात, त्यामुळे दोन देशांतील अनेक मुद्यांवर अतिशय सहजतेने मार्ग निघून जातो.
नरेंद्र मोदी यांनी सलग तिसर्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली, तर डोनाल्ड ट्रम्प दुसर्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष लोकप्रियतेत या दोन्ही नेत्यांचा हात जगात कोणी धरू शकत नाही. या दोन नेत्यांमधील आणख़ी एक साम्य म्हणजे दोन्ही नेत्यांनी आपल्या देशातील जनतेत राष्ट्रवादाची भावना जागवली. आधी देश, मग पक्ष आणि सर्वांत शेवटी मी म्हणजे व्यक्ती अशी मोदी यांची पर्यायाने भाजपाची भूमिका असताना ट्रम्पही अमेरिका फर्स्ट या धोरणाचे कट्टर पुरस्कर्ते हे त्यांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीवरून स्पष्ट झाले. अमेरिकेत बेकायदेशीररीत्या घुसलेल्यांविरुद्ध ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर कारवाईही सुरू केली आहे. याच मालिकेत १०४ भारतीयांना अमेरिकेच्या लष्करी विमानाने अमृतसरला आणण्यात आले. हाताला बेड्या बांधलेल्या स्थितीत या भारतीयांना अमेरिकेने परत पाठवल्याच्या मुद्यावरून गदारोळही झाला होता. विरोधी पक्षांनी यावर आक्षेप घेतला होता. भारत घुसखोरांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. आपल्या देशातील जनतेच्या भावनाही घुसखोरीच्या मुद्यावरून तीव्र आहेत. त्यामुळे अवैध मार्गाने घुसलेल्यांवर कारवाई करण्याचा अमेरिकेचा अधिकार कोणी नाकारणार नाही, अमेरिकेला तसा अधिकार आहे, पण भारतात परत पाठवणार्या भारतीयांना यापुढे तरी बेड्या बांधून अमेरिकेने परत पाठवू नये, अशी सगळ्यांची स्वाभाविक अपेक्षा राहू शकते. या मुद्यावरही आणि ट्रम्प यांच्यात चर्चा झाली असू शकते.
'India-US' friendship : मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीनंतर दोन देशांनी एक संयुक्त निवेदन जारी करत दोन देशांच्या दृढमैत्रीचा दाखला देताना दहशतवादाविरुद्ध एकत्र लढण्याचा निर्धारही व्यक्त केला. दहशतवादाच्या वैश्विक संकटाविरुद्ध लढण्याची तसेच जगाच्या कानाकोपर्यात दहशतवाद्यांचे लपण्याचे जे अड्डे आहेत, ते नष्ट करण्याची आवश्यकता यातून व्यक्त करण्यात भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांना दहशतवादाचे जेवढे चटके बसले तेवढे खचीत जगातील अन्य देशांना बसले असतील. दोन्ही देशांनी आपल्या संयुक्त निवेदनात पाकिस्तानचे स्पष्ट नाव घेतले नसले तरी त्यांचा निवेदनातून असलेला रोख लपून राहिलेला नाही. पाकिस्तान दहशतवादाचे समर्थन करतो, आपल्या भूमीचा वापर दहशतवादी संघटनांना दुसर्या देशाविरुद्ध दहशतवादी कारवायासाठी करू असा आरोप करत पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्याचा इशाराही संयुक्त निवेदनातून देण्यात आला. २६/११ तसेच पठाणकोटच्या दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना पाकिस्तानने न्यायालयासमोर खेचून आणले पाहिजे, असे या निवेदनात म्हटले आहे. याचा अर्थ २६/११ तसेच पठाणकोटवरील दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगार पाकिस्तानला माहिती आहे, पाकिस्तान त्यांना पाठीशी घालत आहे, असा अप्रत्यक्ष आरोप या निवेदनातून करण्यात अल कायदा, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि इसिस यांच्यासह जगातील सर्व दहशतवादी संघटनांविरुद्ध एकत्रित लढवण्याचे आवाहन या निवेदनातून करण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानला मिरची लागणे स्वाभाविक होते. चोराच्या उलट्या बोंबा याप्रमाणे पाकिस्तानने भारतावरव आरोप केला. दहशतवादी घटनांना भारताचा छुपा पाठिंबा असल्याचा कोणाचाही विश्वास बसणार नाही, असा आरोप करत त्या देशाने आपलेच हसे घेतले. पाकिस्तानने या निवेदनावरून आपल्या सवयीप्रमाणे आगपाखड केली असली तरी यातून फारसे काही साध्य होणार नाही. दहशतवादी संघटनांशी आपले लागेबांधे असल्याचे पाकिस्तान नाकारू शकणार नाही, तसेच आपले निरपराधित्वही सिद्ध करू शकणार नाही. पाकिस्तान आणि दहशतवाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. वा दोन्ही समानार्थी शब्द आहेत, असे म्हटले तरी चूक ठरू नये.
भारत आणि चीन यांचे संबंध काहीसे तणावपूर्ण आहे. सीमावाद हा दोन देशांतील तणावाचे कारण आहे. चीनचे सैनिक नेहमीच भारताच्या हद्दीत घुसखोरी करत असतात. त्यामुळे भारत-चीन सीमावादात मध्यस्थी करण्याचा प्रस्तावही या भेटीत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासमोर ठेवला होता. पण द्विपक्षीय चर्चेवर विश्वास दाखवत भारताने तो सविनय फेटाळून आहे. भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या मुद्यावर आम्ही द्विपक्षीय चर्चेतून मार्ग काढू, असा जो विश्वास भारताने व्यक्त केला, तो भारताच्या आतापर्यंतच्या भूमिकेशी सुसंगत असाच आहे. अमेरिकेने भारतासमोर असा प्रस्ताव ठेवण्याची ही पहिलीच वेळ नाही. आपल्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळातही ट्रम्प यांनी भारतासमोर असा प्रस्ताव ठेवला होता. यामागचा ट्रप यांचा छुपा काय असू शकतो, याची आपल्याला कल्पना नसली तरी त्यांची भूमिका प्रामाणिकपणाची आणि भारताच्या हिताची असावी, असे आपण समजू शकतो.
'India-US' friendship : चीनशी मैत्रीचे संबंध कायम ठेवण्याची ग्वाही ट्रम्प यांनी दिली आहे. चीन हा आमच्यासाठी महत्त्वपूर्ण देश आहे. त्या देशासोबतचे संबंध पुन्हा सुरळीत झालेले असतील, असे ट्रम्प यांनी सांगितले. कोरोना आधीपर्यंत चीनचे शी जिनपिंग यांच्याशी आपली चांगली मैत्री होती, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले. याचाच अर्थ कोरोना काळानंतर चीनचे अमेरिकेसोबत वा ट्रम्प यांच्यासोबत जे संबंध होते, ते तसे राहिले नाहीत, त्यात तणाव आला, हे स्पष्ट होते. याची कारणमीमांसा त्यांनी केली नसली तरी भारत आणि चीन यांचे संबंध आता जसे होते वा तसेच ते अमेरिकेसोबतही आहे, असे म्हटले तर ते चूक ठरू नये. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपवण्यात चीनची भूमिका महत्त्वपूर्ण राहू शकते, असा विश्वासही ट्रम्प यांनी व्यक्त केला तो अनाठायी म्हणता येणार नाही. अध्यक्षपदाच्या लढतीत असताना ट्रम्प यांनी, मी अमेरिकेचा अध्यक्ष झाल्यावर लगेच रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवतो, म्हटले होते. ट्रम्प यांचे ताजे विधान पाहिले तर रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आपण थांबवू शकत नसल्याची एकप्रकारची असहायता त्यांनी व्यक्त केली असे म्हटले तर ते चूक ठरू नये.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्री स्वीकारल्यानंतर निवडणूक प्रचारात दिलेल्या अनेक आश्वासनांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने त्यांनी पावले उचलली आहेत, असे दिसते. पण ट्रम्प अनेक निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ट्रम्प यांच्या कोणत्याही निर्णयाचा बरावाईट परिणाम हा फक्त अमेरिकेपुरता मर्यादित राहात नाही, तर सार्या जगावर त्याचा परिणाम होत असतो. मात्र काहीही असले तरी भारत आणि अमेरिका यांची मैत्री जगाच्या इतिहासात मैलाचा नवा टप्पा ठरणार यात शंका नाही. कारण ही मैत्री फक्त देशांची नाही तर लोकशाहीवर विश्वास ठेवणार्या जगातील दोन प्रमुख देशांची आहे. अमेरिका हा आधीपासून महाशक्ती असला तरी भारताची वाटचालही आता विश्वगुरूच्या दिशेने सुरू झाली आहे. जगातील अनेक देशांना भारताकडून मोठ्या अपेक्षा आहे. त्यामुळे त्याच भूूमिकेतून आपण याकडे पाहिले पाहिजे.