इंडियाज गॉट पेशन्स?

15 Feb 2025 06:00:00
यंगिस्तान
- जयेश शत्रुघ्न मेस्त्री
'India's Got Patience' : इंडियाज गॉट या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला विचारलेल्या अश्लील प्रश्नावरून खूप मोठा वाद निर्माण झाला आहे. मुळात हा प्रश्न अश्लीलही नव्हता. सध्याच्या युगात अश्लील कशाला म्हणायचं हा एक मोठा प्रश्न आहे. जसजसं जग बदलतं तसतशा गोष्टी, भाषाशैली, जीवनशैली बदलते. त्यामुळे एखादी गोष्ट २० वर्षांपूर्वी वर्ज्य मानली गेली असेल ती आता स्वीकार्य होऊ शकते. कारण काळ बदलतो आणि त्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनही बदलतो. मात्र रणवीरने केलेली टिप्पणी ही अश्लीलतेच्याही पलीकडची आहे. केवळ अश्लील म्हणत या प्रश्नावर पडदा टाकता येत नाही. पहिली गोष्ट रणवीर आणि त्याच्या सहकार्‍यांवर कारवाई होत आहे आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने नोटीस पाठवल्यानंतर कार्यक्रमाचा तो भाग टाकला आहे. तसेच रणवीर आणि समय रैनाने याबाबत माफी देखील मागितली आहे. ज्यांच्यावर जी कायदेशीर कारवाई व्हायची ती होईल. त्यांचे अनेक फॉलोवर्स त्यांना अनफॉलो करून जातील. पण हा विषय या सर्व कारवाईच्या पलीकडचा आहे. हा विषय चिंतेचा आहे, भारताच्या भविष्याचा आहे.
 
 
samay raina
 
रणवीरची बाजू घेणार्‍या लोकांनी असं म्हटलं की जे रणवीरवर टीका करतात ते आई-वडिलांवरून शिव्या नाही का देत? किंवा टीका करणार्‍या लोकांची ब्राऊजर हिस्ट्री तपासायला हवी. मला या महाभागांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला लोकांच्या बेडरुममध्ये शिरायचंच का आहे? अनेक लोक शिव्या देत असतील, पण शिव्या देणं वाईट असतं हे समाजाने स्वीकारलं आहे ना? कुणीही घरात शिव्या देतं आणि जे देत असतील ते सगळीकडेच शिव्या देत बसतील का? सोशल मीडियावर काही गाढवं असतात. जे शिव्या दिल्याशिवाय बोलतंच नाहीत. तुमचे विचार पटले नाहीत तर लगेच घाणेरड्या शिव्या द्यायला सुरुवात करतात. म्हणे आम्ही असेच आहोत रांगडे. मग तुम्ही जिथे नोकरी करता, तिथे सहकार्‍यांशी, बॉसशी अशाच भाषेत बोलता का? नाही म्हणजे कुठे कोणती भाषा वापरायची याचं भान असावं लागतं. तुमच्या वाह्यात बोलण्यावरून तुम्ही स्वतःला कूल असल्याचे दाखवत असलात तरी समाजाच्या दृष्टिकोनातून तुम्ही वाह्यातच असता. दुसरी गोष्ट लोकांचे ब्राऊजर का तपासायचे आहेत. समजा लोक अश्लील चित्रपट पाहत असतील. पण अश्लील चित्रपट पाहणं वाईट असतं हे समाजाने मान्य केलेलं आहे ना? सर्वांसमोर लोक असे चित्रपट पाहतात का? नाही ना? मग रणवीरच्या वक्तव्याचा आणि कुणाच्या वैयक्तिक आयुष्याचा संबंध जोडता कामा नये. रणवीरने जे म्हटलं ते अत्यंत घृणास्पद होतं हे मान्य करूनच चर्चा पुढे जायला हवी. रणवीर जे म्हणाला ते अश्लीलतेच्या पलीकडचं आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे.
 
 
'India's Got Patience' : रणवीरचे वैयक्तिक पॉडकास्ट तुम्ही असतील तर त्याने अनेकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. काही आध्यात्मिक साधक व गुरूंच्या मुलाखती देखील त्याने घेतल्या आहेत आणि या पॉडकास्टमधून तो स्वतः साधना करत असल्याचे त्याने कबूल केले आहे. जी भाषा त्याने इंडियाज गॉट लेटेंटमध्ये वापरली, तशी भाषा त्याने स्वतःच्या पॉडकास्टवर कधीच वापरली नव्हती. पण तो कार्यक्रमच इतका वाह्यात की त्याच्यातला वाह्यातपणा बाहेर आला. मला प्रश्न पडतो की रणवीरच्या आई-वडिलांना काय वाटलं असेल? त्याच्या घरच्यांची यावर काय प्रतिक्रिया असेल? असो, तर या विषयावर अनेकांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. रणवीर किंवा आणखी अनेक इन्फ्युएंसर यांचे अनेक फॉलोवर्स असतील, पण आपल्या देशात असे अनेक लोक आहेत ज्यांना हे इन्फ्युएंसर आहेत, हे माहितीच नसेल. दुसरी गोष्ट हा कंटेंट किंवा ही चर्चा वयात न आलेली किंवा नुकतीच वयात आलेली मुलं ऐकत व पाहत असतील. कारण त्यांच्या हातात मोबाईल आलेला आहे. मग त्यांना काय वाटत असेल? आपण कितीही आधुनिक झालो, कितीही मोकळ्या गप्पा मारल्या तरी आपण भारतीय आहोत हे आपल्याला कधीही येणार नाही. आपल्याला अत्यंत आधुनिकीकरण स्वीकारायचं आहे आणि हे करत असताना आपल्याला आपलं भारतीयत्व, आपलं हिंदुत्व सोडायचं नाही. कारण धर्मवेड्या ख्रिस्ती आणि इस्लामी शक्तीने अर्ध जग पादाक्रांत केलं असलं तरी हिंदू संस्कृती अजूनही तग धरून आहे. नव्हे आज जगात हिंदुत्वाचा डंका वाजत आहे. कुंभमेळ्यात इथल्या इन्फ्युएंसर्सना मोनालिसाचे डोळे आवडले तरी विदेशातील लोकांना इथल्या संस्कृतीचं आकर्षण वाटत आहे. कारण ज्या उपभोगाच्या गोष्टी इथले इन्फ्युएंसर्स करतात, त्या उपभोगाची परिसीमा पाश्चात्त्य जगाने गाठलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या संस्कृतीची प्रचंड हानी सुद्धा झालेली आहे. म्हणूनच त्यांना आता भोगऐवजी भारतातला योग खुणावत आहे.
 
 
भारतीय हिंदू संस्कृतीचं आणखी एक वैशिष्ट्य असं की इथल्या साधू-संतांनी हिंदू व्हावं म्हणजेच धर्मांतरण करावं अशी इच्छा न ठेवता जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितलेलं आहे. जगातल्या दोन मोठ्या धार्मिक सत्ता यासाठी परवानगी देत नाहीत. त्यांच्या दृष्टिकोनातून तुमचं कल्याण करून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्यांचा धर्म स्वीकारावा लागतो. तुम्ही त्यांच्या धर्माचे नसाल तर तुमचं कल्याण व्हावं अशी इच्छा बाळगणे ही त्यांच्या शिकवण नाही. इतकंच काय तर सर्व जगाने त्यांचा धर्म स्वीकारावा असा त्यांचा हिंसक अट्टहास देखील असतो. सांगायचे तात्पर्य मूळ हिंदू संस्कृती जगाच्या कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. एकीकडे जगभरातील दिग्गज कुंभमेळ्याला हजेरी लावत आहेत आणि दुसरीकडे आपल्या देशातील तरुण आई-वडिलांच्या लैंगिक जीवनावर टिप्पणी करत आहेत, खिल्ली उडवत आहेत. तर कुणी साठे नावाची व्यक्ती मंदिर वही बनाएंगे स्टॅण्ड अप कॉमेडीचा विषय म्हणून फालतू विनोद करत आहे. ज्या मंदिराच्या निर्माणासाठी अनेकांनी प्रणांची आहुती दिली, आपलाच हक्क आपल्याच देशात मिळवण्यासाठी सनदशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने प्रतिकार करून मंदिर निर्माण केलं. अशा विषयावर विनोद करता येत नाही हे पुण्यातल्या साठेला का कळत नसावं? भारताचं आजही ज्ञानेश्वर माउली करतात, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज करतात, हिंदुसंघटक स्वा. सावरकर करतात, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर करतात आणि या महापुरुषांच्या मार्गावर चालणारे नमस्ते सदा वत्सले मातृभूमी ही प्रार्थना म्हणणारे प्रत्येक जण करतात...
 
 
कला, मनोरंजन अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्याचा जीवनाचा हा भाग आहे. नव्हे ही तर आपली आहे. कला आणि हिंदुत्व हातात हात घालून अनादी काळापासून सुखाने नांदत आहेत. आता काळाला अनुसरून त्यात बर्‍याचदा खट्याळपणा, खोडकरपणा येतोच. ज्यास वर्ज्य म्हणले जाते तेही कधीकधी डोकावते. पण प्रत्येक कलाकाराने आपली सीमा आखली पाहिजे. इंडियाज गॉट लेटेंट हा केवळ एक कार्यक्रम नाही तर ही संस्कृती (खरे तर विकृती) आहे. केवळ या एका कार्यक्रमापुरती मर्यादित नाही. तर हा वोक कल्चरचा एक छोटासा भाग आहे. तर या विकृत संस्कृतीच्या पाठीराख्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की 'India's Got Patience' ‘इंडियाज गॉट पेशन्स’... पण पेशन्सलाही मर्यादा आहेत बरं का!
 
आंगिकम भुवनम यस्य, वाचिकं सर्व वाङ्ग्मयम
आहार्यं चन्द्र ताराधि, तं नुमः सात्विकं शिवम् 
Powered By Sangraha 9.0