राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ऑलिम्पिकचा पाया

15 Feb 2025 06:00:00
वेध
हेमंत सालोडकर
National Sports Competition : उत्तरप्रदेशात महाकुंभ सुरू असतानाच त्याच्या शेजारी राज्यात उत्तराखंडमध्ये २८ जानेवारीपासून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरू आहे. यात भारतातील सर्वच राज्यांनी भाग घेत आपली छाप सोडली सुमारे १८ दिवस चाललेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप १४ फेब्रुवारी रोजी झाला. यात क्रीडा नियंत्रण मंडळाने सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकली असली तरी महाराष्ट्राने वेगळीच छाप या सोडली आहे. महाराष्ट्राने एकूण २०० पेक्षा जास्त पदके जिंकली आणि स्पर्धा संपेल तेव्हा महाराष्ट्राच्या आसपास कोणू पोहोचू शकणार नाही. इतकी पदकांची संख्या मोठी स्पर्धेच्या समारोपाला सुमारे दोन हजार व्हीआयपी आणि अडीच हजार व्हीव्हीआयपी उपस्थित होते. स्पर्धेचा यजमान उत्तराखंडने शेवटच्या दिवशी पदकांची शंभरी पूर्ण केली.
 
 
Sports
 
पूर्वीच्या काळात फक्त अभ्यास केल्याने आणि त्या आधारावर चांगली नोकरी मिळाली की मुलांचे आई-वडील धन्यता मानत होते. आमचा मुलगा बँकेत कॅशियर आहे, डॉक्टर, अभियंता आहे हे सांगताना पालकांची फुगून जायची. त्यावेळी क्रीडा क्षेत्र नगण्य होते. पण मागील काही वर्षांत क्रीडाला अच्छे दिन आले आहेत. केंद्रातील भाजपा प्रणीत रालोआ सरकारने क्रीडाकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली आणि मुलांसह पालकांचाही क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. मागील काही वर्षांत अगदी ग्रामपंचायत स्तरापासून, तालुका, नगर, विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना उधाण आले आहे. त्यात गावपातळीवरील खेळाडू चमकू लागले आहेत. पण यासाठी पालकांची मानसिकता बदलणे गरजेचे होते. ते काम केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी मागील दहा वर्षांत केले. गावखेड्यातील मुलगा किंवा मुलगी यांच्यातील कलाकौशल्य हेरून त्याला पैलू पाडण्याचे काम सुरू आहे. यातून खेळाडू चांगले कौशल्य दाखवत आहे. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी खासदार महोत्सव सुरू आहेत. नागपुरात तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संयोजनात असा महोत्सव मागील काही वर्षांपासून नियमित सुरू आहे. त्यात खेळाडू आपले कौशल्य दाखवतात. त्यांना मोठे बक्षीस देऊन प्रोत्साहन देण्यात येते. यामुळे खेळाडूंमध्ये क्रीडाविषयी सकारात्मक भावना निर्माण होऊन तो अजून परिश्रम करतो.
 
 
National Sports Competition : पूर्वी क्रीडा म्हणजे फक्त क्रिकेट हा समज पण त्या खेळात खेळाडूंना सामावून घेण्याच्या मर्यादा होत्या. मग इतर खेळांकडे मुलांना वळवण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जाऊ लागल्या. त्यात विजयी खेळाडूंना घसघशीत पारतोषिक देण्यात येऊ लागले. यामुळे विद्यार्थ्यांना खेळाबद्दल आवड निर्माण झाली. सरकारनेही गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या होतकरू खेळाडूंना हेरून त्यांना प्रोत्साहन देणे सुरू केले. आता तर कबड्डी, च्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात होत आहेत. यातून खेळाडूंचे आर्थिक उत्पन्न वाढल्याने त्यांच्या जीवनशैलीतही आमूलाग्र बदल झाला आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन इतरही विद्यार्थी खेळाकडे वळत आहेत. पालकांचाही पाठिंबा मुलांना मिळत आहे. यात फक्त शहरीच नव्हे तर अगदी वनवासी मुलांनाही प्रोत्साहन देण्यात येत आहे. धनुर्विद्या क्रीडा प्रकारात त्यांची जास्त रुची असल्याने त्यांचे शरीर काटक असल्याने त्यांचे गुण विकसित करण्यात येऊन त्यांना तशा प्रकारच्या क्रीडा प्रकारात घेतले जात आहे. त्यांना मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी करून त्यांचा आर्थिक विकास करण्यात येत आहे. यामुळे त्यांची आणि त्याच्या कुटुंबाची आर्थिक उन्नती साधली जात आहे. फक्त राजकारण करण्यापेक्षा इतरही क्षेत्रांचा विकास करण्याचे धोरण केंद्र सरकारने आखले अनेक जण क्रीडाकडे वळत आहेत. त्यासाठी लहानपापासून विद्यार्थ्यांना घडविण्यात येते. परंपरागत शिक्षणासोबतच कौशल्ययुक्त शिक्षणही देण्यात येत असल्याचे विद्यार्थी मानसिकरीत्या सुदृढ होत आहे. यातूनच काही वर्षांनी होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत हेच खेळाडू भारताचा तिरंगा मानाने फडकवतील. पण यासाठी आतापासूनच त्याचा भक्कम पाया रचला जात आहे, ही चांगली गोष्ट आहे. आता तर २०३६ च्या ऑलिम्पिकसाठी यजमान म्हणून दावा केला आहे. त्यासाठी केंद्र सरकार, क्रीडा मंत्रालयाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यासाठी तेथे येणार्‍या खेळाडूंना भौतिक सुविधा देता येतीलही, पण स्पर्धेत यजमान देश म्हणून भारताने पदकतालिकेत सन्मानजनक स्थान मिळवणे आवश्यक राहणार आहे. त्याचा मजबूत पाया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांतून रचला जात आहे. अशा स्पर्धांतून मुले समोर येतील आणि ऑलिम्पिकमध्ये आपला, आपल्या गावाचा, शहराचा आणि देशाचा नावलौकिक करतील. 
 
- ९८५०७५३२८१
Powered By Sangraha 9.0