मुंबई वार्तापत्र
- नागेश दाचेवार
शरद पवारांच्या नादी संजय राऊत लागले आणि संजय राऊतांच्या नादी उद्धव ठाकरे लागले. ना संजय राऊतांना शरद पवार कळले, ना उद्धव ठाकरेंना संजय राऊत... एकमेकांच्या नादी लागून, वैयक्तिक स्वार्थापोटी निष्ठा, श्रद्धा आणि दैवतं बदलून ही मंडळी होत्याचं नव्हतं करून बसली. तेलही गेलं आणि अशी यांची आजची अवस्था आहे. महाराष्ट्र आणि देशातील मोठमोठे पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना अफूची गोळी देत महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशपातळीवर इंडिया आघाडी करणारे महामहिम Sharad Chandra Pawar शरदचंद्र पवार साहेब होते. यांच्या नादी लागून काही लोकांनी अर्थात दिल्लीत अरविंद केजरीवाल, राहुल गांधी, उत्तर प्रदेशात अखिलेश यादव, बिहारमध्ये लालू प्रसाद यादव, पश्चिम ममता बॅनर्जी अशा सगळ्या मंडळींनी आणि महाराष्ट्राचंच सांगायचं झालं तर, उद्धव ठाकरे अॅण्ड कंपनीने केंद्र सरकार, पंतप्रधान, मोदी-शाह यांच्या नावानं शिमगा केला, प्रचंड अकांडतांडव केला. पण अफूची गोळी देणारे ‘वशीकरण बाबा’ने मात्र, आपली ‘बॅकडोअर डिप्लोमसी’ व्यवस्थित सुरू ठेवली.
‘वशीकरण बाबा’च्या गोळीचा प्रभाव उद्धव ठाकरे अॅण्ड कंपनीवर थोडा जास्त झाला. भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याविषयी पातळी तर सोडलीच मात्र, आता तर ज्यांनी २०१४ मध्ये यांची लाज वाचविली त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी वाळवीसारखा शब्दप्रयोग करून सीमाच ओलांडली. पक्ष गेला, चिन्ह गेलं, महाराष्ट्राने नाकारलं अशी परिस्थिती असताना, ‘सुंभ जळला तरी पीळ’ मात्र कायम असल्यागत यांचं झालं आहे. प्रत्यक्षात भाजपाने मारले असले तरी, थोड्याअधिक प्रमाणात पुनर्वसन होण्यासाठी चुंचू प्रवेशाची शक्यता संघाच्या मध्यस्थीने कायम होती. पण काहीही बरळून स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेणार्या ठाकरे अॅण्ड कंपनीची ‘बुडत्याचे पाय खोलात’ अशी अवस्था आजघडीला झाली आहे.
मुळात राज्यात एकमेव प्रादेशिक पक्ष आपलाच असला पाहिजे यासाठी गेली ३४ वर्षे प्रयत्नात असणार्या Sharad Chandra Pawar शरद पवारांनी मध्ये खेळी खेळली आणि शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचं हाडूक दाखवून, त्यांच्या अधःपतनाची पक्की व्यवस्था केली. शिवसेना संपली तर, केवळ महाराष्ट्रात एकमेव आपलाच पक्ष असेल, असा त्यामागचा पवारांचा कुटिल डाव होता. या सापळ्यात शिवसेना अर्थात उद्धव ठाकरे अलगद अडकले. त्यासाठी शरद पवारांनी संजय राऊत नावाच्या प्याद्याचा योग्य प्रकारे वापर केला. सगळे फासे पडत होते. मात्र, पवारांनी पडद्यामागे भाजपालाही खेळवत ठेवून, ऐनवेळी दगा दिल्यानं सारा खेळ फसला. आता काय शिवसेना संपविण्याच्या नादात साहेब आपलाही पक्ष, चिन्ह, नेते, कार्यकर्ते गमावून बसले आणि राष्ट्रीय पक्षाची मान्यता देखील हातची गेली. असे असले तरी, साहेब मात्र, मुत्सद्दी राजकारणी आहेत. त्यांनी पुन्हा कमबॅक करण्याच्या हालचाली सुरू ठेवल्या त्यांचे दरवाजे उघडे आहेत. पण त्याचवेळी साहेबांनी ठाकरेंसाठी सर्व दरवाजे आणि मार्ग बंद होण्याची पुरेपूर व्यवस्था करून ठेवली आहे.
आता जुन्या घडामोडींचा ऊहापोह आज का? तर, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत मराठा पातशाहीचे धुरंधर नेतृत्व महादजी शिंदे यांच्या नावाने राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. आणि महत्त्वाची, लोकांना मिरची झोंबणारी घटना म्हणजे, शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर ठाकरे अॅण्ड कंपनीचा झालेला जळफळाट अवघ्या महाराष्ट्राने बघितला. ज्यांच्या जिवावर मुख्यमंत्रिपद उपभोगले आता त्यांच्यावरही विश्वासघातकीसारखे शब्द वापरून तोंडसुख घेण्यात जगातील बेस्ट सीएमचा घरगडी असलेल्या विश्वप्रवक्त्याने तसूभरही वेळ घालवला नाही. त्यामुळे ठाकरे अॅण्ड कंपनी ‘ज्याचं खाईल, गाईल...’ हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
Sharad Chandra Pawar : काहीही असले तरी, एकनाथ शिंदेंच्या या सत्काराच्या निमित्ताने राज्यातील राजकारण तापले. विशेष म्हणजे महाविकास आघाडीत ठिणगी पडली. आणि त्यावरून पुन्हा शाब्दिक युद्ध रंगले. मग काय बोलघेवडे केवळ राऊतच आहेत अशातला भाग थोडी आहे. त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे असलेले बोलघेवडे शरद पवारांकडेदेखील आहेत. मग एका, अर्थात जितेंद्र आव्हाड नावाच्या बोलघेवड्याने संजय राऊतांना खडेबोल सुनावले. शब्द जरा जपून वापरा... विश्वासघातकी वगैरे खपवून घेणार नाही, अशा शब्दांत खडसावले. बरं पवारांच्या शिलेदाराने राऊतांचा समाचार घेतला तो घेतलाच. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईकांनी देखील राऊतांचा क्लास घेतला. शरद पवार हे चार वेळा झाले. कसे झाले, काय झाले, हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांचा राजकीय प्रवास, पृष्ठभूमी, राजकीय खेळ्या सर्वश्रुत आहेत. हे काय महाविकास आघाडी तयार करण्याआधी माहिती नव्हतं? आता थयथयाट करून काय उपयोग आहे? अशा शब्दांत नाईकांनी संजय राऊतांना घरचा आहेर दिला. आता ‘ना घर का ना घाटका’ अशी अवस्था असणार्या ठाकरेंना भाजपाशी फारकत घेण्याची वेळ आणणार्या शरद पवारांशी वाकडं घेऊन राजकारणात एकटे पडण्याची वेळ राऊतांमुळे आली आहे. भाजपाशी तुटलं, संघाशी स्वतःहून खाजवलं, पवारांना खिजवलं आणि काँग्रेससोबत वाजलं, ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला कारणीभूत उद्धव ठाकरे स्वतः असून, त्यांना खतपाणी घालणारे राऊत आहेत.
कोण, कोण कोणाला टोप्या घालत आणि टोप्या उडवत आहे, हेच काही कळेनासं झालं आहे. कोण गुगली टाकत आहे, हेदेखील कळत नाही आहे. हे उद्विग्न विधान आहे विश्वप्रवक्ते राऊत साहेबांचे... यांच्या खुर्चीला सुरुंग लावून, लंका पेटविणार्याचा सन्मान करून, उलट महाराष्ट्राला समोर नेण्याचं उत्तम कार्य केल्याचे गौरवोद्गार काढल्यानंतर, २०१९ मध्ये टाकलेली टोपी, गुगली आदीचं स्मरण आता दिसत आहे. मात्र, राऊतांच्या टोप्या घालण्याच्या विधानाला उद्धव ठाकरेंनी गंभीरतेने घेतल्यास पुढील प्रवास सुखाचा होईल.
- ९२७०३३३८८६