कारंजा लाड,
Mahakumbh-Car accident : प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू असल्याने गेल्या महिन्याभरापासून प्रयागराज येथे जाण्यासाठी समृद्धी महामार्गाने भाविक मोठ्या संख्येने प्रवास करीत आहेत. अशातच १८ फेब्रुवारी रोजीही समृद्धी महामार्गावर वेगवेगळ्े दोन कार अपघात घडले. त्यामध्ये ३ जण गंभीर जखमी झाले.
पहिला अपघात प्रयागराजला जात असताना तर दुसरा अपघात प्रयागराज येथून घरी परतताना झाला. अपघाताची पहिली घटना नागपूर कॉरिडोर चॅनल १६४ वर १८ फेब्रुवारीला घडली. यावेळी एमएच ०२ डीआय ५८७८ क्रमांकाच्या कारने चार जण संभाजीनगर येथून प्रयागराज येथे जात असताना मार्गातील अपघातस्थळी कारचे समोरील अॅक्सेल तुटल्याने कार रस्ता दुभाजकाला धडकली. त्यामुळे अपघात झाला. त्यामध्ये एक जण जखमी झाला. जखमीवर जागेवरच उपचार करण्यात आल्याने जखमीचे नाव कळू शकले नाही. तर अपघाताची दुसरी घटना मुंबई कॉरिडोर चॅनल १७३ वर घडली. यावेळी २२ बीएच ३३५७ ए क्रमांकाच्या कारने प्रयागराजहून पुणे येथे परतत असताना एक नीलगाय अचानकपणे कारच्या आडवी आली.
त्यामुळे कारला अपघात घडला. त्यामध्ये दोन जण जखमी झाले. संकल्प कल्याणकर (वय ३२) व मयुरी कल्याणकर (वय ३०) अशी जखमींची नावे असून ते पुणे येथील रहिवासी आहे. घटनेची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिकेचे पायलट आतिश चव्हाण व डॉ. मुदस्सिर शेख घटनास्थळी दाखल झाले आणि यातील एका रुग्णावर जागीच उपचार केले. तर उर्वरित दोघांना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी फायर टीमचे अक्षय कांबळे सुमित डोणेकर व अक्षय चव्हाण यांच्यासह पोलिस उपस्थित होते. प्रयागराज येथे जाण्याकरिता आणि तेथून परत येण्याकरिता भाविक समृद्धी महामार्गाने प्रवास करीत असताना आतापर्यंत अनेक अपघाताच्या घटना घडल्या. या घटनेत अनेक जण जखमी झाले त्यामुळे समृद्धी महामार्गाने प्रवास करताना काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.