नवी दिल्ली,
Delhi CM : भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे नाव अंतिम करण्यात आले आहे. रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री होतील. मुख्यमंत्रीपदाची घोषणा झाल्यानंतर रेखा गुप्ता यांचेही विधान समोर आले. पक्षाने त्यांना आशीर्वाद दिल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आणि आशीर्वादाबद्दल मी खूप आभारी आहे.

दिल्ली भाजपाच्या महासचिव असलेल्या ५० वर्षीय रेखा गुप्ता उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्या शालीमार बाग मतदारसंघातून निवडून आल्या असून, राजधानीच्या चाैथ्या महिला मुख्यमंत्री आहेत. याआधी शीला दीक्षित, सुषमा स्वराज आणि आतिशी मारलेना यांच्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आरूढ हाेणाऱ्या त्या चाैथ्या महिला ठरल्या आहेत. भारतीय जनता युवा माेर्च्यात काम करण्याचा अनुभव असणाऱ्या रेखा या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेल्या आहेत.
भाजपने एक्स हँडलवर अभिनंदन पोस्ट केले
भाजपनेही त्यांच्या एक्स हँडलवर ही माहिती दिली आहे आणि रेखा गुप्ता यांचे अभिनंदन केले आहे. भाजपने ट्विटरवर पोस्ट करत म्हटले आहे की, 'दिल्ली भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल रेखा गुप्ता जी यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. तुमच्या नेतृत्वाखाली राज्य प्रगती करेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
रेखा गुप्ता कोण आहेत?
रेखा गुप्ता ५० वर्षांच्या आहेत आणि त्यांचे जन्मस्थान हरियाणातील जिंद जिल्ह्यातील नंदगड गाव आहे. त्यांचा जन्म १९७४ मध्ये येथे झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रेखा गुप्ता यांचे कुटुंब १९७६ मध्ये दिल्लीला स्थलांतरित झाले होते. त्यांच्या पतीचे नाव मनीष गुप्ता आहे. रेखा गुप्ता यांनी एलएलबी केले आहे आणि त्या व्यवसायाने वकील देखील आहेत.
रेखा गुप्ता या दिल्लीच्या शालीमार बाग विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्या भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा देखील आहेत. २०२५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत रेखा गुप्ता यांनी शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांचा २९५९५ मतांनी पराभव केला.
नितीन गडकरी यांनी केले अभिनंद
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून ट्विट करून रेखा गुप्ता यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा रेखा गुप्ता यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.