विकृतीला उच्च न्यायालयाची चपराक

    दिनांक :20-Feb-2025
Total Views |
वेध
- नीलेश जोशी
‘Live in Relationship’ : भारतीय अर्थात हिंदू संस्कृती सर्वांगसुंदर आहे. विज्ञानावर आधारित रूढी-परंपरांचा दैनंदिन जीवनात समावेश हे तर आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्यच. वेदांमध्ये व्यक्तीवर सोळा संस्कारांचा आग्रह केला व्यक्तीचे जीवन चांगले, संस्कारयुक्त व्हावे जेणेकरून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा पायर्‍या चढत व्यक्तीला जीवनातील मर्म सापडून जीवन धन्य व्हावे, अशी अपेक्षा भारतीय जीवन पद्धतीत आहे. विवाह हा देखील हिंदू धर्मशास्त्रानुसार संस्कारच. विवाह हा पंधरावा संस्कार. विवाह म्हणजे विवाह असे म्हटले जाते. अर्थात विशिष्ट मार्गाने जीवन, कुळ, वाहून नेणे असा होतो. शास्त्राला अनुसरून सहधर्माचरण, सहनशीलता, संयम, सहकार्य, निष्ठा व कर्तव्यदक्षतेचे जीवनाचरण म्हणजे विवाह, अशी मान्यता आहे. यातून उत्तम समाजधारणा आणि त्यातून राष्ट्रधारणा अनुस्यूत आहे.
 
 
Live in
 
संस्कार आणि परंपरा ही भारतीय संस्कृतीची ओळख. नीती आणि धर्माच्या बंधनात राहून कुटुंब, समाज आणि पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण करणार्‍या आमच्या रूढी-परंपरा आहेत. व निकोप समाज व्यवस्थेसाठी जी आदर्श, जीवनमूल्ये भारतीयांना परंपरेने मिळाली आहेत, त्यात विवाह व्यवस्था आहे. भारतीयांनी विवाहाला केवळ करार अथवा उपभोगाचे साधन न मानता धर्म आणि कर्तव्य करण्यासाठीचा संस्कार मानले आहे. या संस्कारांच्या आधारावरच भारतीय समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था भक्कम उभी आहे. नीतिमत्ताहीन, संस्कारहीन व्यक्ती, कुटुंब वा समाज हे अधःपतन करतात आणि पर्यायाने राष्ट्र्राचीही हानी करतात. नवीन पिढीत जे जे पाश्चात्त्य ते ते उत्तम ही विकृत धारणा वाढत असल्याचे दिसून येते. ही एक विकृतीच आहे. पाश्चात्त्य विचारसरणी ही स्वकेंद्रित विचारसरणी आहे. वैचारिक स्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, अभिरुची स्वातंत्र्य अशा मोठ्या शब्दांंआड स्वकेंद्रित जीवनशैलीचा अतिरेक पाश्चात्त्य देशात होत असल्याचे दिसून येते. अर्थाने हा स्वैराचारच नव्हे का? आणि असे होत असेल तर मानव आणि पशूत अंतर तरी कोणते? खरं म्हणजे भौतिकतेच्या अतिरेकातून पुढे आलेल्या अशा समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी सर्व जग भारताकडे अपेक्षेने पाहात आहे. पण पाश्चात्त्यांच्या अवगुणाची लागण झालेले काही जण येथेही आढळतात हे दुर्दैवच.
 
 
‘Live in Relationship’ : उत्तराखंड उच्च न्यायालयाने अवगुणांची लागण झालेल्या एका याचिकाकर्त्याला बेशरम म्हणून फटकारले. उत्तराखंड येथे समान नागरी कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार समाजहितासाठी आवश्यक असलेले विविध निर्बंधांची अंमलबजावणी देखील करण्यात येत आहे. त्या अंतर्गतच ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणार्‍या जोडप्यांना आता शासनाकडे नोंदणी करावी लागणार आहे. ‘लिव्ह इन’मध्ये एकत्रित राहिल्यानंतर त्यातून उद्भवणार्‍या समस्यांबाबत दोघांपैकी कुणीही जबाबदारी तयार नसल्याची अनेक उदाहरणे देशात आहेत. त्यामुळे समस्या निर्माण होऊ नये आणि झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित करता यावी. थोडक्यात लिव्ह इनमधील जोडप्यांना कायद्याच्या कक्षेत आणणे हा मुख्य हेतू या नोंदणीचा आहे. पण अनिर्बंध, समाजहिताची पर्वा नसलेल्या कथित स्वातंत्र्याचा हव्यास असलेली पाश्चात्त्य मानसिकतेला ही कुठलीच बंधने नको असतात. म्हणूनच जेव्हा येथे समान नागरी कायदा लागू होऊन अशा पद्धतीने नोंद करण्याचा आदेश शासनाना दिला तेव्हा या निर्णयाविरोधात एकाने उत्तराखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यात त्याने ही माहिती शासनाला दिल्यास माझे खाजगी आयुष्य बाधित होते, असे म्हटले. त्यावर उच्च न्यायालयाने ‘तुम्ही जंगलामधील कुठल्या दुर्गम गुहेमध्ये नाही तर समाजामध्ये राहत आहात. समाजातील विविध घटकांना तुमचे नाते संबंध माहीत आहेत. तुम्ही विवाहाशिवाय राहत आहात. मग लिव्ह इनच्या नोंदणीमुळे तुमच्या गोपनीयतेचे कसे काय उल्लंघन होऊ शकते’.
 
 
‘जर लग्न न करता निर्लज्जपणे एकत्र राहता तर नोंदणीमुळे खाजगी आयुष्याचे उल्लंघन कसे’, असेही न्यायालयाने फटकारले. आता यासंदर्भातील पुढील सुनावणी १ एप्रिल रोजी होणार आहे. पण जे आक्षेप नोंदविले, ज्या भावना व्यक्त केल्या त्या देशातील सामान्यजनांच्या मनातील भावना आहेत. केवळ उपभोग हीच वृत्ती असणारे, पाश्चात्त्य विचारसरणीचे अंधानुकरण करणारी जमात समाजासमोर नानाविध प्रश्न उभे करीत आहेत. पण आता त्यांना देखील कायद्याच्या कक्षेत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जे निश्चितच अभिनंदनीय आहेत. सोबतच अनादीकाळापासून होत असलेल्या संस्काराची घट्ट वीण आणखी मजबूत करण्यासाठी समाजाने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. 
 
- ९४२२८६२४८४