प्रयागराज,
Mahakumbh 2025 : महाकुंभाचा अखेरचा टप्पा सुरू असूनही दररोज सरासरी कोटीहून अधिक भाविक त्रिवेणी संगमावर स्नानासाठी येत आहेत. यात स्थानिकांनी अर्थकारणदेखील साधले आहे. विशेषत: प्रचंड वाहतूककोंडीमुळे मोठ्या वाहनांना शहरात प्रवेश बंद असल्याने कोट्यवधी भाविकांसाठी स्थानिक दुचाकीस्वार तरुण सारथी झाले. अनेकांनी महिनाभरात यातून लाखोंची कमाई केली आहे. पवित्र संगमावर जाण्यासाठी नाव चालविणाऱ्या नावाड्यांनाही अच्छे दिन आले आहेत.
बहुतांश भाविक हे सरासरी 15 ते 20 किलोमीटर पायीच चालत आहेत. महाशिवरात्रीच्या अगोदर पवित्र स्नान व्हावे यासाठी मिळेल त्या साधनाने भाविक प्रयागराजला पोहोचत आहेत. पवित्र संगमावर पोहोचण्यासाठी स्थानिक वाहतूक व्यवस्थाच नसल्याने अडचण होत आहे. दुचाकीस्वार चारशे ते हजार रुपये भाडे आकारतात. यातून दिवसभरात तीन ते चार हजार रुपये कमाई होते. यासाठी अनेक महाविद्यालयीन तरुण पुढे सरसावले असून, त्यांना या निमित्ताने चांगला रोजगार मिळाला आहे. एवढेच नाही तर, नोकरी करणारेसुद्धा आपली दुचाकी या कामी वापरून पैसे कमवत आहेत.
बोटिंगचे दर दहापटमहाकुंभ प्रशासनाकडून बोटिंगसाठी 45 रुपये ते 125 रुपये इतके दर निश्चित करण्यात आले. मात्र, गर्दी लक्षात घेता नावाडी व बोट कंत्राटदारांकडून तब्बल दहा पट दर आकारण्यात येत आहेत. ताज्या पाहणीत एका व्यक्तीकडून 1300 ते 1600 रुपये घेण्यात येत असल्याचे समोर आले.