हिंदीनंतर आता देववाणी संस्कृतचा द्वेष

21 Feb 2025 18:53:49
प्रहार
- सोनाली मिश्रा
Tamil Nadu Politics : तामिळनाडूमध्ये फुटीरवादाचे भाषिक राजकारण करणार्‍या द्रविड मुनेत्र कळघम या पक्षाने हिंदीच्या वापराबाबत सातत्याने द्वेष पसरवला आहे. द्रमुकचे नेते केवळ हिंदी भाषाच नव्हे तर सनातन हिंदू धर्माचाही अपमान करीत आहेत. आता तर त्यांनी देववाणी संस्कृतवर देखील हल्लाबोल केला आहे.
 
 
Dayanidhi-1
 
जी संस्कृत भाषा ज्ञानाचा खजिना आहे आणि ज्या अभ्यास करण्यास व तिच्याबद्दल अधिक जाणून घेण्यास विदेशी नागरिकही उत्सुक असतात त्या संस्कृत भाषेचा द्वेष द्रमुकसारखे पक्ष करतात ही मोठीच विडंबना आहे. द्रमुक नेत्यांचा संस्कृत व सनातन धर्माविषयीचा द्वेष एवढ्या टोकाला गेला आहे की संसदेच्या कामकाजाचे संस्कृतमध्ये भाषांतर करणे हा रा. स्व. संघाचा अजेंडा आहे असे म्हणण्यापर्यंत या पक्षाची गेली आहे. ज्या भाषेत कोणी बोलत नाही, अशा भाषेवर करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी केली जात आहे, असा आरोप द्रमुक नेते दयानिधी मारन यांनी संसदेत केला. २०११ च्या जनगणनेच्या सर्वेक्षणाचा संदर्भ देत दयानिधी मारन यांनी दावा केला की, केवळ ७३,००० लोक संस्कृत बोलतात.
 
 
प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान, मारन यांनी संस्कृत भाषांतराच्या औचित्याचा प्रश्न केला आणि सांगितले की, आपल्याला इतर कोणत्याही अधिकृत राज्य भाषांवर आक्षेप नाही, परंतु संस्कृतमध्ये कामकाजाचे भाषांतर करण्यात काय औचित्य आहे हे समजत नाही. दयानिधी मारन यांचे हे विधान म्हणजे सनातन हिंदू धर्माचा द्वेषच आहे. द्रमुकचे नेते नेहमीच आपल्या भाषणांमध्ये हिंदू धर्माविषयी नकारात्मक व द्वेषमूलक विधाने करीत असतात. दयानिधी मारन संसदेमधील संस्कृतविरोधी विधान याच द्वेषमूलक परंपरेचा भाग आहे.
 
 
Tamil Nadu Politics : दयानिधी मारन यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नावर लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी त्यांना चांगलेच फटकारले. तुम्ही कोणत्या देशात राहता. संसदेत विविध विषयांवर होणारी चर्चा आणि कामकाजाचे २२ भाषांमध्ये भाषांतर केले जाते. पण तुम्हाला केवळ संस्कृत आणि हिंदीचीच अडचण आहे. भारताची मूळ संस्कृतच आहे. तुमचा केवळ संस्कृतवर आणि हिंदीवर आक्षेप आहे. संसदेच्या कामकाजाचा संस्कृत आणि हिंदीसह २२ भाषांमध्ये अनुवाद होईल, असे सभापती ओम बिर्ला यांनी ठणकावून सांगितले.
 
 
दयानिधी मारन हे विसरतात की, संस्कृत भाषेनेच रामायण, महाभारतासारखा महान ग्रंथ जगाला दिला आहे. संस्कृतनेच जगाला भगवद्गीतेचे ज्ञान दिले आहे. संस्कृत भाषेनेच जगाला वेदांसारखे दिले आहेत. भारतातील लोक, भारताचा इतिहास आणि भारतीय जीवमूल्यांवर विश्वास ठेवणारी कोणतीही व्यक्ती संस्कृतचा अपमान करू शकत नाही.
 
 
द्रमुकचे धोरण नेहमीच तामिळनाडूला भाषिक आधारावर उत्तर भारतापासून वेगळे करण्याचे राहिले आहे. यामुळेच कधी हा पक्ष हिंदीला विरोध करतो तर कधी संस्कृतला. दयानिधी मारन यांनी आणखी एक खोटारडेपणा केला. संस्कृत ही राज्याची अधिकृत भाषा नाही, असे साफ खोटे विधान त्यांनी केले. दयानिधी मारन यांना या विषयात देखील आपले सामान्य ज्ञान सुधारण्याची गरज आहे. कारण वस्तुस्थिती ही आहे की भारतामध्ये उत्तराखंड आणि हिमाचल अशी दोन राज्ये आहेत, जिथे संस्कृत ही दुसरी अधिकृत भाषा आहे. २०१० मध्ये, उत्तराखंड संस्कृतला दुसरी अधिकृत भाषा स्वीकारणारे पहिले राज्य ठरले. तर २०१९ मध्ये हिमाचल प्रदेशात संस्कृत ही दुसरी अधिकृत भाषा म्हणूनही स्वीकारण्यात आली. प्रत्येक भाषेचा स्वत:चा समृद्ध इतिहास, व्याकरण, साहित्य आणि विचार असतो. संस्कृतसारख्या भाषेचे वाङ्मय, साहित्य अजून अर्धेही अवगत झालेले नाही. संस्कृत भाषेचे ज्ञान संपादन करण्यास अभ्यासक व विद्यार्थी नेहमीच उत्सुक असतात. शतकानुशतके लोक ज्ञानपिपासा शमविण्यासाठी संस्कृतच्या आश्रयाला येत आहेत. पण संस्कृत व संस्कृतीशी जोडलेला देशाचा समृद्ध वारसा आणि इतिहासाशी द्रमुकला स्वतःला जोडून घ्यायचे नाही, असे दिसून येते.
 
 
Tamil Nadu Politics : जवळजवळ प्रत्येक भाषेतील शब्दांचे मूळ संस्कृतमध्ये आढळून येते. संस्कृत ही भारतातील दोन राज्यांची दुसरी अधिकृत भाषा आहे हे तर दयानिधी मारन यांना माहीत नाहीच. शिवाय भाषेचा इतिहास कोणत्या ना कोणत्या प्रकारे संस्कृतशी जोडला गेला आहे, हेही देखील या खासदाराला माहीत नाही. पण द्रमुकला त्या राष्ट?ाभिमानाच्या मुद्याशी स्वत:ला जोडून घेता येत नसल्याने दयानिधी मारन यांच्यासारखे उथळ नेते संसदेच्या कामकाजाचे संस्कृतमध्ये भाषांतर करणे म्हणजे करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी म्हणतात, तर त्यांच्याच पक्षातील इतर नेते सनातन हिंदूधर्मावर हल्लाबोल करतात.
 
 
Tamil Nadu Politics : आता या प्रकरणावरून राजकारणही सुरू झाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेच्या कामकाजाचे संस्कृतमध्ये भाषांतर करण्यासंदर्भात दयानिधी मारन यांनी केलेली टिप्पणी अयोग्य असल्याचे म्हटले आहे. दयानिधी मारन यांचा तो व्हिडीओ एक्स वर पोस्ट करताना त्यांनी लिहिले की, ‘फुटीरतावादी राजकारण करणे म्हणजे करदात्यांच्या पैशाची खरी उधळपट्टी आहे. एका भाषेच्या दुसरी भाषा नष्ट करणे आवश्यक नाही.’ लोकसभा सभापतींचे कौतुक करताना ते म्हणाले की, द्वेष पसरवण्याच्या आणि भारतीय भाषांमध्ये बनावट फूट निर्माण करण्याच्या या दुष्ट प्रयत्नाचा त्यांनी तीव्र निषेध केला आहे. द्रमुकच्या राजकारणाचा गाभा हा हिंदू अस्मितेचा अपमान किंवा हिंदूंची मुळे असलेल्या भारताचा आणि त्याच्या सर्व प्रतीकांचा अपमान आहे. 
 
(पांचजन्यवरून साभार)
Powered By Sangraha 9.0