मुख्याधिकार्‍याच्या भूमिकेने भेदभावाच्या आरोपांना पूर्णविराम

    दिनांक :22-Feb-2025
Total Views |
- शहरात अतिक्रमणाला वेग

दारव्हा, 
Darva encroachment : गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेमुळे अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही नागरिकांनी प्रशासनावर भेदभाव केल्याचे आरोप केला होता. तसेच राजकीय दबावामुळे काही अतिक्रमणे कायम राहिल्याचीही चर्चा होती. मात्र नगरपरिषद मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांच्या कठोर भूमिकेमुळे ही मोहिम निष्पक्षपणे राबविली जात असल्याचे सध्या शहरात दिसून येत आहे.
 
 
Darva encroachment
 
शहरातील अतिक्रमणधारकांत भीतीचे वातावरण असून सर्वसामान्य नागरिक प्रशासनाच्या कठोर निर्णयाचे स्वागत करीत आहेत. पालिकेच्या या कठोर भूमिकेमुळे शहरातील सार्वजनिक रस्ते आणि जागा मोकळ्या होत असून, वाहतुकीला मोठा दिलासा मिळत आहे. भविष्यातही अशीच कारवाई सुरू राहील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
 
 
Darva encroachment : शहरातील अनेक राजकीय तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिकांच्या अतिक्रमणांवरही बुलडोझर चालविण्यात आला. विशेष म्हणजे, त्यांनी या मोहीमेसाठी मोठ्या मनाने प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत करीत सहकार्य केले. यामुळे अतिक्रमण मोहिमेबाबत होत असलेल्या भेदभावाच्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे. मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी कुणालाही सवलत न देता कठोर पावले उचलल्याने नागरिकांत नप प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण आहे. आता कुणाच्याही दबावाला बळी न पडता अतिक्रमण हटवले जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

अतिक्रमण असलेल्या जागेवर पुन्हा अतिक्रमण होणार नाही, अशी दक्षता प्रशासनाच्या वतीने घेण्यात येईल. या मोहीमेकरीता अतिक्रमणधारकांनी प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले आहे.
 
- विठ्ठल केदारे, मुख्याधिकारी
.