दारव्हा,
Gold theft : पोलिसांची तपासणी सुरू असल्याचे सांगत तोतया पोलिसांनी एक दाम्पत्यास गंडवून १ लाख ६२ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना दारव्हा-दिग्रस मार्गावर घडली. हा प्रकार शुक्रवारी साडेनऊच्या सुमारास एका हॉटेलजवळ घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदा भगवंत कानकिरड (वय ५२) आणि त्यांचे पती भगवंत कानकिरड, दोघेही (शेलोडी, ता. दारव्हा) हे मोटारसायकलने दारव्ह्याहून दिग्रसकडे जात होते. दारव्हा-दिग्रस मार्गावरील हॉटेलजवळ तीनजणांनी त्यांची दुचाकी अडवली. संशयितांनी पोलिसांचे बनावट आयकार्ड दाखवून, कालच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे. अंगावरील दागिने सुरक्षित ठेवा, असे सांगितले.
Gold theft : अचानक समोर आलेल्या पोलिसांच्या वेशातील व्यक्तींच्या सांगण्यावर विश्वास ठेवून चंदा कानकिरड यांनी दोन तोळ्यांची सोनसाखळी आणि सात ग्रॅमची अंगठी कापडात बांधली. संशयितांनी सफाईदारपणे दागिने हाताळले आणि काही वेळाने ते तेथून निघून गेले. काही क्षणातच ही बाब पतीपत्नीच्या लक्षात आली. त्यांनी बांधलेले दागिने गायब झाल्याचे लक्षात आले. प्रकारानंतर चंदा कानकिरड यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिवा कायंदे करीत आहेत.