सतर्क राहा!

22 Feb 2025 06:00:00
- विजय पांढरीपांडे
Mobile, social platform : सोळावे वरीस धोक्याचं असं आधी म्हटलं जायचं. तसे एक गाणे देखील होते. आता ही धोक्याच्या वयाची मर्यादा सहा सात वर्षांनी खाली घसरली आहे की काय अशी परिस्थिती दिसते. शाळेत जाणारी सहा सात वर्षाची मुलं देखील हातात मोबाईल आल्यापासून, सोशल मीडिया अन् विविध अ‍ॅपला नादावल्यापासून त्यांचे आई-वडील त्रस्त आहेत. हा संसर्गजन्य रोग एका गावापुरता, शहरापुरता, राज्यापुरता मर्यादित राहिला नाही. तो देशभर व्हायरल झाला आहे.
 
 
Mobile
 
आता लहान, तरुण मुलांना ना आई-वडिलांचा धाक राहिला, ना शाळेतल्या शिक्षकाचा. पूर्वी शाळेतल्या शिक्षकाचा दरारा होता. वेळ पडल्यास कान उपटणे, छडीचा प्रसाद देणे हा अधिकार पालकांनीच त्यांना दिला होता. आता लाखो फी आकारणार्‍या शाळेत शिस्तीची व्याख्याच बदलली आहे. शिक्षक, प्राचार्य कुणाचेच या मुलांवर नियंत्रण राहिले नाही. आपल्या कामात व्यस्त असलेल्या पालकांनाही शाळेतल्या शिस्तीची फिकीर नाही. उलट आज जमाना बदलला आहे हे पालुपद उगाळत ते शिक्षकांना, प्राचार्यांना दुर्लक्ष करायला सांगताहेत. दोन्ही कमावत्या पालकांच्या हातात लाखोंचे पॅकेज खेळत असल्याने महागड्या बर्थ डे विमानाने प्रवास अन् आलिशान रिसॉर्टयुक्त हॉलिडेजची सवय या मुलांना लहानपणातच झाली आहे. अर्थात या गोष्टी शहरी वातावरणापुरत्या मर्यादित असल्या तरी तारुण्यसुलभ आकर्षणापोटी जन्माला येणार्‍या भानगडी लहान गावात देखील कॉमन झाल्या आहेत. नवे तंत्रज्ञान फायद्याचे, सोयीचे असले तरी ज्या चक्रवेगाने त्यातील कन्टेन्ट, अ‍ॅप, व्हिडीओ, गेम्स वाढताहेत, अन्? लहान पोरांना नादी आहेत, ते बघता आता कुठेतरी यावर नियंत्रण हवे हा विचार पुढे यायला लागला आहे. कारण अवती भवतीचे वातावरण इतक्या वेगाने बदलते आहे की पालकांना देखील कुठे कसे नियंत्रण ठेवावे हे कळेनासे झाले आहे. विचारस्वातंत्र्य, व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य, खाण्यापिण्याचे, कपडे घालण्याचे फॅशन स्वातंत्र्य प्रत्येकाला हवे हा आधुनिक विचार एकीकडे बळावत असताना, दुसरीकडे आपली जुनी परंपरा, संस्कार, देव, धर्माच्या मर्यादा याचाही बोलबाला वाढतो आहे. पण Mobile, social platform मोबाईल, इंटरनेट, सोशल प्लॅटफॉर्म या सुखसोयींच्या तंत्रज्ञानाचा अजगर विळखा आता इतका घट्ट आवळला गेलाय की त्यातून कुणाचीच सुटका नाही. आता मुलांना पॉकेट मनी नव्हे तर थेट क्रेडिट-डेबिट कार्ड, ऑनलाईन पेमेंटची सवय झाली आहे.
 
 
Mobile, social platform : महागडे ड्रेसेस, गिफ्ट्स हे सवयीचे झाले आहेत. लहान मुलांच्या तोंडी घाणेरड्या शिव्या आल्या आहेत. डेटिंग, चॅटिंग, अफेअर्स आता आठ दहा वर्षांच्या वयात सुरू होतात. व्हॉट्स अ‍ॅप मेसेजेस, व्हिडीओ शेअरिंग हे खालच्या पातळीवर आले आहे. कशाचाच कुठे ताळतंत्र राहिला नाही. मुलांना पालक बोलले, रागावले तर ती चक्क उलट उत्तरे देताहेत. रागावून आत्महत्येचे पाऊल उचलण्याच्या घटना घडताहेत. एकूणच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताना दिसते आहे. हा पद्धतशीरपणे रचलेला सापळा आहे का? किंवा आजच्या राजकीय भाषेत हे नवे नॅरेटिव्ह आहे का कुठल्या बाह्य शक्तीचे किंवा अदृश्य हाताचे? तरुण पिढी बिघडली, शिक्षणापासून विचलित झाली की राष्ट्र डळमळते. आपली संस्कृती पोखरली जाते. फार पूर्वी मोगलांनी हेच केले. देखील तोच कित्ता गिरवला. आता आपण नव्या दिशेने, नव्या जोमाने वाटचाल सुरू केली आहे. नव्या उद्दिष्टांच्या दिशेने झेप घेतली आहे. पण हे नवे तंत्रज्ञान वरदान ठरण्याऐवजी शाप ठरू पाहते आहे. यामुळे आपले जीवन सुसह्य भलेही झाले असेल. पण आपला आनंद हिरावून घेतला गेला आहे. आपण इमोशनकडून इन्फॉर्मेशनकडे वाटचाल सुरू तेव्हाच या धोक्याच्या वळणाला सुरुवात झाली. गेल्या काही दशकांचा नीट अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल. भावनिक नात्याला घरघर लागली. कुटुंबातला लळा जिव्हाळा संपला. कोणे एके काळी जी घरे भरलेली होती ती विभक्त कुटुंब पद्धतीत रोडावली. स्वार्थ बोकाळला. दोन पिढ्यांतले अंतर वाढले. आजी-आजोबांच्या नशिबी एकटेपण आले. तरुण पिढी एकतर स्थिरावली किंवा याच देशात आई- वडिलांपासून विलग होत लाखोंच्या वार्षिक पॅकेजच्या नादी लागून आपल्या नव्या मृगजळातील महालात रममाण झालीत. हा बदल सर्वांनीच गुण्यागोविंदाने स्वीकारला. कारण दुसरा पर्यायच उरला नव्हता. असला तरी तो शोधायची गरज भासली नाही कुणाला. आपल्या कुटुंबव्यवस्थेचा तालत बिघडला. आता तर कृत्रिम बुद्धिमत्ता काय, मशीन लर्निंग काय नवी भुते आपल्या मानगुटीवर बसायला तत्पर झाली आहेत. माणसाला अधिकाधिक आळशी, निरुपयोगी करण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. आपली भावना, विचारशक्ती, विवेक जर या तंत्राने आपल्याकडे गहाण ठेवून घेतला तर आपले काय होईल याचा आपण वेळीच विचार केलेला बरा. 
 
- ७६५९०८४५५५
Powered By Sangraha 9.0