असा धक्का देऊ की...

22 Feb 2025 06:00:00
मुंबई वार्तापत्र
- नागेश दाचेवार
‘मच्छर तर, खाजवायचं कसं अशी परिस्थिती माझी होती’, अशी कबुली स्वतः देणारे आणि दसरा मेळाव्याप्रसंगी खाली बसल्यावर पुन्हा उभं राहायला दोन लोकं लागणारे, गणपतीची आरती करताना आरतीचं वजन हाताला न झेपणार्‍या उधोजींनी यावेळी ‘असा धक्का देऊ की ते पुन्हा उठणारच नाहीत’ असा इशारा दिलाय्? म्हणे... कुठे धक्का देणार तर, मुंबई निवडणुकीत!.. गद्दारांना धडा शिकवू, गद्दारांना गाडा... सूड सूड सूड आणि सूड उगवण्याच्या प्रचंड यशानंतर ‘आता असा धक्का देऊ की...’ हा एकपात्री हास्यप्रयोग घेऊन येत आहेत, आपले हास्यसम्राट Uddhav Thackeray उद्धव ठाकरे साहेब...
 
 

Uddhav-thakare 2
आजवर वाघ बनून फिरणारे यावेळी भिजलेल्या कोकरासारखे झालेले दिसत आहेत. यापेक्षा वस्तुस्थितिदर्शक वेगळं वर्णन उद्धव ठाकरेंच्या परिस्थितीत दुसरं काही शकत नाही. एकेकाळी राज्यात डरकाळी फोडणार्‍या वाघाचं अस्तित्व वाचविण्याची म्हणजेच आता राज्यात ‘वाघ वाचवा मोहीम’ उद्धव ठाकरेंनी हाती घेतली आहे. करणार तरी काय साहेबांवर परिस्थितीच तशी ओढवली आहे. आता सोबत असणारा नेता ‘पलक झपकतेही’ असे हिंदीत म्हणतात ना तसा सेकंदात एकनाथ शिंदेंसोबत दिसतो. आणि वर्षानुवर्षे सोबत असणारा, सेकंदापूर्वी दुसरीकडे की तोच प्रामाणिक नेता, कार्यकर्ता लगेच गद्दारही ठरतो. हे उद्धवजींच्या नेतृत्वाचं विशेष आहे, बरं का!... म्हणजे वषोन्वर्षे पक्षात खपविलेला नेता अचानक पक्ष सोडून जातो याचे श्रेय उद्धवजींच्या नेतृत्वालाच जाते. हे श्रेय कोणीही त्यांच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही.
 
 
Uddhav Thackeray : आता ५४ आमदारांपैकी ४० गद्दार, १८ खासदारांपैकी ११ गद्दार, आता नेते, उपनेते, मुंबईचे शाखा प्रमुख, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, नगरसेवक, अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य, सभापती, नगर पंचायत सदस्य, अध्यक्ष, ग्राम पंचायत सदस्य, सरपंच अशी सगळी मोठ्या संख्येने सोडून गेलेली नेते मंडळी सगळी गद्दार ठरविली गेली. आणि यातली महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या जुन्या मंडळींना बाळासाहेबांनी घडविले होते. आता बाळासाहेबांचे या बाळासाहेबांच्या शिलेदारांना गद्दारीचं प्रमाणपत्र वाटप करत फिरत आहेत. त्यामुळे प्रश्न असे निर्माण होतात की, बाळासाहेबांनी शिवसैनिक नव्हे तर, गद्दार घडविले का? बाळासाहेबांच्या नेतृत्वावर उद्धवजींना शंका उपस्थित करायची आहे का?, बाळासाहेबांना माणसांची परख नव्हती, असे उद्धवजींना सुचवायचे आहे का?, या प्रश्नांची उत्तरं आधी उद्धव साहेबांनी शिवसैनिकांना आणि महाराष्ट्राला देण्याची आहे. यावेळी बाळासाहेबांचं सोडा अधिक खोलात जाऊन विचार केला तर, मुळात गद्दार घडविण्याची फॅक्टरीच उद्धवजी चावलतात का? असा प्रश्न देखील निर्माण होतो. त्यामुळे उद्धवजी अ‍ॅण्ड कंपनीने ‘ह्याला गाड त्याला गाड’चे राजकारण करण्यापेक्षा गेल्या चार साडेचार वर्षांमध्ये घरी बसून अर्थात अख्खं राज्य घरी बसून चालविणार्‍यांना वेगळ्याने सांगण्याची गरज नाही, कारण घरी बसून दरबारी राजकारण करण्यात पारंगतच आहेत. तरीदेखील घरी बसून शांतपणे आत्मपरीक्षण केले असते तर, त्यांना ‘वाघ वाचवा मोहीम’ राबवावी लागली नसती. आणि आजवर मान खाली घालून बसणारे छाती फुगवून उघड माथ्याने तुमच्या छाताडावर पाय ठेवून, दणक्यात फिरताना दिसले नसते. महत्त्वाची, चिंतेची गंभीर बाब म्हणजे काल-परवापर्यंत एकनाथ शिंदेंना पाण्यात नोकर समजणार्‍या उद्धव ठाकरेंना शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ची भीती वाटली नसती. पण आजची परिस्थिती तर उद्धवजींसाठी भीतिदायकच आहे. अर्थात त्यांच्याच शब्दात सांगायचं झाल्यास त्यांच्या नोकरानेच त्यांची झोप उडवून ठेवली आहे. ही ‘शिवसेना’ आहे की, ‘शिव्यासेना’ म्हणत, वाघाची पार शेळी करून ठेवली आहे. मुळात वाघाची शेळी काय शिंदे तर यांना वाघच तयार नाहीत. वाघाची झूल ओढून वाघ असल्याचा बनाव करणारे डोंबारी असल्याचं सांगत यांना हिणवताना ते दिसतात.
 
 
यावेळी Uddhav Thackeray उद्धव ठाकरेंच्या लोकसभा आणि विधानसभेतील शिलेदारांना केंद्रात आणि राज्यात २०२९ पर्यंत विरोधातच बसायचं आहे. त्यामुळे उरलेल्यांना अजून पाच वर्षे सांभाळणे उद्धव ठाकरेंसाठी मोठे आव्हान आहे. त्यातही सोबत असलेल्यांचा संयम कधी तुटेल याचीही शाश्वती नाही. कुणीही सत्तेच्या बाजूने राहणे पसंत करतात. त्यातून स्वतःची आणि स्वतःच्या मतदारसंघातील चार कामं होणे त्यांना अपेक्षित असते. त्यामुळे उद्धव यांचे शिलेदार किती दिवस त्यांच्या भूलथापांना बळी पडून विरोधात राहणे पसंत करतात, याची कोणीही हमी देऊ शकत नाही. ठाकरेंचे आर्थिक स्रोत घटले आहेत. उत्पन्नाचा मुख्य स्रोत बृहन्मुंबई महानगर होती. ती आज यांच्या ताब्यात नाही आणि पुढे येईल याची खात्री नाही. हे सगळं ठाकरेंसोबत असलेल्या आत्ताच्या शिलेदारांना चांगल्याने कळून चुकलं आहे. त्यामुळे त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची, भवितव्याची चिंता लागली आहे. यावेळी नऊ खासदारांमध्ये केवळ अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे दोघेच सोबत राहतील अशी खात्री स्वतः ठाकरेंना आहे. दुसरीकडे आमदारांचा विचार केलाच तर, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई हे दोन घरचे आणि अजय चौधरी या तीन नावांच्या पलीकडे कोणावरही विश्वास आजघडीला नाही. आता संघटनात्मक बांधणीचा घाट ठाकरेंनी घातलेला दिसत आहे. ती त्यांची अपरिहार्यता आहे. कारण आजघडीला त्यांच्याकडे संघटनाच उरलेली नाही. पण तेथेही ठाकरेंनी गडबड केल्याचं दिसतं. पक्ष कार्यकर्त्यांमध्ये सर्वमान्य किंबहुना नाराजी असलेल्या संजय राऊतांकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे. ज्यांनी पक्षाची वाट लावली त्याच व्यक्तीकडे पुन्हा संघटन बांधणीची जबाबदारी देणे म्हणजे चोराच्या हातात चावी देण्यासारखं असल्याच्या प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून येत आहेत. ठाकरेंना स्वतःची, पक्षाची एवढी वाताहत होऊनही घरी बसून राजकारण करण्याचा मोह काही आवरता येत नसल्याचे दिसते. बरं येथे से बेटा सवाई’ आहे. बापाला नसेल जमत तर, मुलाने पुढाकार घ्यावा तर त्यालाही नाईट लाईफपासून फुरसत नाही. अशा परिस्थितीत हातापायात जोर नसताना, मैदानात येऊन लढण्याची कुवत नसताना, कोणाच्या जिवावर धक्का देण्याची टिमकी हे लोक वाजवतात, याचेच आश्चर्य वाटते. धक्के खाऊन खाऊन मी धक्कापुरुष झालोय्, म्हणणारे उद्धव ठाकरे आज कोणाला देण्याच्या परिस्थितीत नाहीत. मात्र, आजही कार्यशैलीत सुधारणा केली नाही तर, शिंदे अजून मोठे धक्के देतील यात शंका नाही.
 
- ९२७०३३३८८६
Powered By Sangraha 9.0