अध्यात्म शास्त्रातील भक्तीचे उदारत्व

    दिनांक :23-Feb-2025
Total Views |
संत प्रबोधन
Saint Dnyaneshwar Maharaj : अध्यात्म शास्त्रातील भक्तीचे उदारत्व हे भक्तीच्या सर्व पैलूंचे दर्शन घडविणारे आहे. संतांनी जी परमेश्वरावरती निस्सीम केली. नवभक्तीच्या वाटा उजळल्या त्या भक्तीचे उदारत्व संत साहित्यामध्ये मांडलेले आहे. भक्तीचे अनुसरण मानवी जीवनाच्या कल्याणासाठी एक सात्त्विक मार्ग आहे.
अपिचेतसुदुराचारो भजते मामेनन्यभाक |
साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ७१ ॥
(गीता ९/३०)
अतिशय दुराचरणी मनुष्यसुद्धा भक्तिमार्गात अनन्य भक्ती करून उद्धार पावू शकतो.
संत ज्ञानेश्वर महाराज
यालागी दुष्कृती जाहला | तरि अनुतापतीर्थी न्हाला |
न्हाऊनी मजआतु आला | सर्वभावे ७२ ॥
(ज्ञाने.- ९/४२०)
 
 
sant
 
जर एखाद्याने हातून झालेल्या दुराचारासाठी अत्यंत पश्चातापयुक्त अंतःकरणाने तो मनुष्य भगवंताला अनन्यभावे शरण गेला, तर तो माझ्या साक्षात्काराप्रत पोहोचू शकतो, हे भक्तिमार्गाचे उदारत्व आहे. कोणत्याही जातीचा, पंथाचा असो; स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत असा भेदभाव नाही.
 
 
अद्वैत भक्तीचा आनंद
अद्वैत भक्तीत देव व भक्तपणा असा भेद उरतच नाही. भक्त हाच देव होऊन देवाची भक्ती करू लागतो. सर्वत्र एकच परमेश्वर भरला आहे. आतही हरी व बाहेरही हरीच दिसू लागतो. या अवस्थेमुळे अवघी सृष्टीच आनंदाची वाटू लागते. कामक्रोधादी सर्व विकार भक्ताला सोडून जातात. स्वतःला ही आनंदाची अनुभवावयाला येते. तेव्हा तुकोबा सांगतात-
पिकलिया सेंदे कडूपण गेले |
तैसे आम्हा केले पांडुरंगे ॥१॥
काम क्रोध निमाले ठायीचि |
सर्व आनंदाची सृष्टी झाली ॥धु॥
आठव नाठव गेले भावाभाव |
झाला स्वयंमेव पांडुरंग ॥२॥
तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे |
संसारी जन्मौजे याचि लागी ॥३॥
अशी अवस्था प्राप्त संत तुकोबांना जेथे दुःखाचा लवलेशही नसतो, अशा आनंदाच्या स्थितीचे वर्णन करतात. अद्वैत भक्तीचा आनंद संतांनी स्वतः लुटला व सर्वांनी या आनंदात सहभागी होऊन लुटण्यास ते सांगतात-
तुका म्हणे खातों आनंदाचे लाडू |
नका चरफडू घ्यारे तुम्ही ॥
 
 
भक्तिसाधनेचा कळस : संत साक्षात्कार
Saint Dnyaneshwar Maharaj :  भक्तीच्या अनेक व्याख्या व भक्तिसाधनेच्या वेगळ्या प्रकारांचा घेतला. भक्तीशिवाय साक्षात्काराची अनुभूती येऊ शकत नाही. भक्तिमार्ग हा सर्व स्तरातील लोकांसाठ ीसुलभ व सोपा असा मार्ग आहे. सर्व धर्माच्या संतांनी याच मार्गाची वाट धरलेली आहे. सर्वांसाठी याच मार्गाचे प्रतिपादन केलेले आहे. अद्वैत भक्तीमुळे जग हे जगरूपाने न दिसता ईश्वर रूपाने दिसू लागते. तोच आत्मसाक्षात्कार होय.
रक्तश्वेत कृष्ण पीत भिन्न |
चिन्मय अंजन सुदले डोळा ॥१॥
तेणे अंजनगुणे दिव्यदृष्टी झाली |
कल्पना निमाली द्वैताद्वैत ॥धृ॥
देशकाळवस्तूभेद मावळला |
आत्मा निर्वाळला विश्वाकार ॥२॥
न झाला प्रपंच आहे परब्रह्म |
अहंसोहं ब्रह्म आकळले ॥३॥
तत्त्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग |
तेचि झाला अंगे तुका आ ॥४॥
भक्ती मार्गाच्या द्वारा अनेक संतांना झालेला आहे. त्यापैकी संत नामदेव, संत तुकाराम यांना भक्तिमार्गातून असा साक्षात्कार झाला होता.
बीज भाजुनि केली लाही | आम्हा जन्ममरण नाही ॥१॥
आकारासी कैचा ठाव | देह प्रत्यक्ष झाला देव ॥ध्रु॥
साखरेचा नोहे ऊस | आम्हा कैचा गर्भवास ॥२॥
तुका म्हणे अवघा जोग | सर्वाघरी पांडुरंग ॥३॥
(तु. गा.
अंतिम अशा बोधप्रद अवस्थेवर संतमाहात्मे स्थिर होऊन जनकल्याणासाठी भक्तिमार्ग सर्वांना आचरून दाखवतात. जे ज्ञान आत्मस्वरूपाचे अज्ञान नाहीसे करते, ते ज्ञानही गिळून असणे. अशी जी साक्षात्काराची अवस्था ती भक्तीने निश्चित प्राप्त होत असते, असा भक्तिमार्गाचा लाभ आहे.
तुका म्हणे आता | लाभ नाही यापरता| (तु.गा.३०५८)
या अवस्था प्राप्तीनंतर जीवनामध्ये दुसरा लाभ काय असू शकतो. संत तुकाराम म्हणतात तुम्ही जीवनामध्ये भक्तिमार्गाचा अवलंब केल्यास तुम्हाला निश्चितपणे पांडुरंग (आत्मसाक्षात्कार) भेटल्याशिवाय राहत नाही. हा मार्ग सर्वांना आचरण्यास सुलभ व सोपा आहे.
 
 
भक्तिपथ बह सोपा | पुण्य नागवे या पापा ॥
(तु. गा. २२८९)
Saint Dnyaneshwar Maharaj : या मार्गाने कोणीही मार्गक्रमण करू शकतो, म्हणजेच या मार्गाचा अधिकार आहे.
सकळासी येथे आहे अधिकार |
कलियुगी उद्घार हरिच्यानाम ॥ (तु. गा. २८६४)
भक्तिमार्गात नामजपाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. नामजप म्हणजे ईश्वराच्या नामाची अक्षरे वारंवार उच्चारणे नव्हे, हा अक्षरांचा जप झाला. नामजप म्हणजे ईश्वराच्या नावाच्या अर्थाचे मनन करणे होय. हे अर्थाचे मनन व्हावयास पाहिजे. नुसता शब्दोच्चार करू नये त्यामुळेच आग्रह संत तुकारामांनी केला आहे. या मार्गाने सर्वांना साक्षात्कार साध्य करता येतो, असे ते आग्रहाने सांगतात.
तुका म्हणे तुम्ही चलायाचि वाटे | भरवशाने भेटे पांडुरंग ॥
प्रत्येक व्यक्तीला आत्मस्वरूपाचे होण्यासाठी भक्तिमार्ग हाच सोपा व सर्वांना सुलभ असा मार्ग होय. भक्तिमार्गाचे मनोभावे आचरण केल्यास साक्षात्कार प्राप्ती होते. साक्षात्कारामुळे आत्मानंद मिळतो. चित्ताचा लय होतो व देहभावाचा विसर पडतो. देहभावाचा विसर म्हणजेच तो भक्तच मुळी देवरूप होऊन जातो. संत तुकारामांना देहभावाचा विसर पडल्यामुळेच ते देवरूप झाले. भक्तिमार्गामध्ये हातात कर्म, आचरणात धर्म, मुखात हरिनाम व अंतःकरणात भगवंताचे निष्काम प्रेम पाहिजे. ही शिकवण संत तुकारामांनी दिली आहे.
 
 
Saint Dnyaneshwar Maharaj : भक्तिप्रेमासाठी अंतःकरणामध्ये भगवंताविषयी अपार श्रद्धाभाव आवश्यक भावाशिवाय भक्ती घडू शकत नाही. जसा ज्याचा भाव असेल तसाच त्याचा देव असतो. भगवंताच्या भक्तिप्रेमाने चित्तवृत्ती निर्मल होतात. चित्तवृत्ती निर्मल झाल्याने कल्पना लोप पावतात. कल्पना निमाल्या म्हणजे परब्रह्म स्वरूप प्रकट होते. भक्तिप्रेमाला संतांनी सर्वश्रेष्ठ मानले आहे. भक्तीपुढे त्यांना मोक्षही तुच्छ वाटतो. पराकोटीच्या भक्तीचा सिद्धपाक अंगी माल्यानंतर ते माहात्मे मरणापूर्वीच होतात. भक्तीशिवाय मुक्ती मिळू शकत नाही. भक्तिप्रेमामुळे अंगी विरक्ती येते. विरक्तीने विषय निवृत्त होतात. विषयनिवृत्ती झाल्या म्हणजे आत्मज्ञान होते व त्यातूनच आत्मसाक्षात्कार प्राप्ती होत असते.
संत भक्ती विचारामुळे समाजामध्ये वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आजही साडेचारशे वर्षांनंतरही सदाचाराचे विचार समाजामध्ये पेरण्याचे काम सुरू आहे. आज सर्वत्र विषय स्वैराचाराची लाट आलेली असताना भक्तिमूल्य विचार समाजाला सदाचाराच्या भक्तिमार्गाला लावणारा आहे.
- प्रा. डॉ. हरिदास आखरे
७५८८५६६४००