गाडगेबाबांचे स्मरण करताना...

    दिनांक :23-Feb-2025
Total Views |
- उर्मिला राजोपाध्ये
Saint Gadge Baba : भारत हा अनेक मान्यता मानणारा आणि जपणारा देश होता आणि आहे. इथे अनेक धर्म, पंथ असून जनमानसावर त्याचा प्रचंड पगडा आहे. कोणताही धर्म माणसाला वाममार्गाला नेत नाही, तशी शिकवण देत मात्र पाखंडी वा सामान्यांना कर्मकांडांमध्ये गुंतवणारे, त्यांचा विविध मार्गाने गैरफायदा घेणारे तथाकथित साधू, बाबा, गुरू समाजाला भटकवतात. अशांच्या नादी लागणारा समाज नेहमीच आधुनिक दृष्टिकोन, ज्ञान-विज्ञानाच्या वाटा, विद्याभ्यास यापासून कित्येक योजने लांब राहतो. बुवाबाजीमध्ये गुरफटलेला आणि घाबरलेला समाज दांभिकांच्या नादी लागून आणखी अधोगतीला लागतो. म्हणूनच त्याला जागेवर आणणार्‍या, शहाणपणाच्या चार सांगणार्‍या, सामान्यांना समजणार्‍या भाषेत बोलून उपदेश करणार्‍या लोकांची समाजाला नेहमीच गरज असते. आपल्याकडील संतांनी नेहमीच हे काम केले आहे. गाडगे महाराज हे याच पंक्तीतील एक मोठे नाव. संत गाडगेबाबांनी आयुष्यभर जनांना चुकीच्या मार्गापासून दूर करण्याचे काम केले. म्हणूनच जयंती साजरी करताना त्यांच्या बहुमोल शिकवणीचे आणि कामाचे अवलोकन करायला हवे.
 
 
gadgebaba
 
गाडगेबाबा यांचे कार्य समाज सुधारणा, शिक्षण आणि आचारधर्म यामध्ये फार मोठे होते. आधी उल्लेख केल्याप्रमाणे त्यांनी सर्वसमावेशक आणि समतेच्या आधारे समाजातील चुकीच्या परंपरांचा आणि अंधश्रद्धांचा सातत्याने विरोध केला. त्यांच्या विचारांनी आणि कार्याने समाजाला एक नवी दिशा दिली. म्हणूनच गाडगेबाबांचे जीवन आणि कार्य आजही प्रगल्भतेची प्रेरणा देणारे आहे, असे म्हणावे गाडगेबाबांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेडगाव येथे झाला. गाडगेबाबांचे खरं नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. पण ते गाडगेबाबा म्हणूनच ओळखले जायचे. अतिशय साधे जीवन जगणार्‍या गाडगेबाबांना आधीपासूनच दीन-दुबळ्यांची, अनाथांची आणि गरिबांची काळजी घेणे आवडत असे.
 
 
Saint Gadge Baba : संत गाडगेबाबा यांनी समजातील अंधश्रद्धा, जातिपाती, अस्पृश्यता आणि कुपोषणाच्या बाबतीत मोठ्या काम केले. त्यांच्या शिकवणीमुळे लाखो लोक जागरूक झाले आणि त्यांनी जीवनातील चुकीच्या परंपरा सोडून दिल्या. गाडगेबाबांनी समाजाला स्वच्छता पाळण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश दिला. त्यांनी स्वत: इतरांच्या भल्यासाठी काम केले आणि तेच करण्याचा सल्ला इतरांनाही दिला. त्यांचे समाजसुधारक कार्य प्रामुख्याने काही प्रमुख बाबींवर आधारित होते. त्यांनी नेहमीच मानवतेचे आणि शुद्धतेचे, महत्त्व मांडले. समाजासमोरील अनेक समस्या आणि अडचणींचे निराकरण करण्याची क्षमता आणि इच्छा असल्यामुळेच त्यांना सर्वसामान्य जनतेमध्ये मोठा आदर प्राप्त झाला होता. आजही त्यांच्या नावाचा उल्लेख करताना या बहुमोल कामाचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते.
 
 
आपल्या जीवित कार्यामध्ये त्यांनी केलेल्या अंधश्रद्धेविरुद्ध संघर्षाचे महत्त्व वादातीत आहे. गाडगेबाबांनी अंधश्रद्धा आणि धार्मिक पाखंडाचा तीव्र विरोध पाखंडी लोकांवर कठोर प्रहार केले. त्यांचे पितळ उघडे पाडले. अशा प्रथांचा विरोध करणे हेच गाडगेबाबा यांचे ध्येय होते. लोकांमध्ये अंधश्रद्धा निर्माण करणार्‍या वृत्ती आणि प्रवृत्तींवर त्यांनी कठोर टीका केली. सर्वसामान्यांना त्याप्रती सजग केले. ते आपल्या प्रवचनांमध्ये योग्य विचारांवर जोर देत असत. समाजसुधारणेमधील त्यांचे हे योगदान फार मोठे होते. ते सर्वसमावेशक समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्नरत होते. जातिपातीचे वर्चस्व आणि समाजात अस्पृश्यता टिकवून ठेवण्याच्या परंपरेला त्यांचा तीव्र विरोध होता. ते सर्वधर्मसमभावावर विश्वास ठेवणारे संतपुरुष होते. त्यांनी शिक्षणाचे महत्त्वही नेमके ओळखले होते. म्हणूनच त्यांनी सर्वांना शिक्षण देण्याचा विचार मांडला आणि त्या दृष्टीने कार्यही केले. शाळांमध्ये आणि आश्रमांमध्ये शिक्षणाची महती वाढविण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आपण जाणतो.
 
 
Saint Gadge Baba : गाडगेबाबांनी स्वच्छतेला अत्यंत महत्त्व दिले. त्यांनी आपल्या उपदेशात त्यावर विशेष प्रकाश टाकलेला दिसतो. त्यांच्या मते, स्वच्छता हा व्यक्तीच्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग होता. स्वच्छतेची आवश्यकता केवळ शारीरिक आरोग्याकरिता नव्हे तर मानसिक आणि आत्मिक शुद्धतेसाठीही असते, असे ते सांगायचे. त्यांनी लोकांना स्वच्छतेचे महत्त्व सांगितलेच; पण त्या स्वत: झाडू हाती घेत आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात पुढाकारही घेतला. लोकांसमोर बोलायला उभे राहण्यापूर्वी आधी ते स्वत:च्या हाताने सगळा परिसर स्वच्छ करत असत. या कृतीतूनही स्वच्छतेच्या बाबतीत लोकांना जागरूक करण्याचे मोठे काम त्यांच्या हातून घडले. खेरीज गाडगेबाबांनी धर्माची खरी भावना लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी धर्माच्या नावावर होणार्‍या अन्यायाचा विरोध केला. त्यांच्या उपदेशात प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचे आणि शुद्धतेच्या पथावर चालण्याचे निर्देश दिले. संत गाडगेबाबांचा विचार आणि कार्य आजच्या काळातही अत्यंत महत्त्वाचे ठरते. आजही समाजाला जातिपाती, अंधश्रद्धा, महिलांची दुर्दशा, अन्याय आदी समस्या भेडसावताना दिसतात. आजही लोक अंधश्रद्धेच्या आहारी जात अघोरी कृत्ये करताना दिसतात. अशांना शहाणे करण्यासाठी गाडगेबाबांच्या विचारांची घेणे गरजेचे ठरते. अशांना बाबांची शिकवण उत्तम मार्गदर्शन करणारी आहे. त्याचबरोबर आजच्या छानछौकीच्या काळात त्यांच्या जीवनातील साधेपण आणि त्यांच्या कार्याची गोडीदेखील आत्मसात करावी अशीच आहे. आज त्यांच्या शिकवणीच्या प्रभावाने अनेक संस्था, समाजसेवी संघटना कार्यरत असून मोलाचे काम करत आहेत. अशा प्रकारे गाडगेबाबांच्या कार्यामुळे समाजसुधारणा घडवून आणण्यात मोठ्या प्रमाणावर मदत आहे आणि त्यांचे कार्य अजूनही समाजात परिवर्तन घडवण्याचे प्रेरणा देत आहे.
 
 
इथे लक्षात घ्यायला हवे की, गाडगेबाबा यांचे कार्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते, तर संपूर्ण भारतभर सुधारणा घडविण्याचे उद्दिष्ट ठेवून केलेले होते. खरे पाहता गरीब कुटुंबात जन्मलेल्या या व्यक्तीने लहानपणीच अनेक प्रकारचे दुःख पचवले होते. त्यांना विपरीत परिस्थितीचा सामना लागला होता. मात्र त्यापुढे हात न टेकता गाडगेबाबांनी वैयक्तिक आयुष्यातील समस्यांच्या बरोबरीने समाजाच्या समस्यांचाही खंबीरपणे सामना केला. ते कधीही मोह, माया किंवा ऐश्वर्याच्या मागे धावले नाहीत. आजच्या पिढीने या गुणांचेही महत्त्व जाणून घ्यायला हवे. त्या काळात अनेक धार्मिक, सामाजिक आणि पारंपरिक रूढींचे वर्चस्व होते. या चुकीच्या गोष्टींना समाजमान्यता होती. भीती होती, दडपण होते. मात्र यात अडकलेल्यांना बाहेर काढत त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम संत गाडगेबाबांनी केले. प्रत्येक व्यक्तीला न्याय आणि संधी मिळायला हवी, असे म्हणत त्यांनी आपले काळापुढे नेणारे विचार खंबीरपणे मांडण्याचे काम आयुष्यभर केले.
 
 
Saint Gadge Baba : अंधश्रद्धेबरोबरच त्यांनी असत्य परंपरांवरही प्रहार केला. त्याग, तप, योग इत्यादी गोष्टींवर अधिक लक्ष त्यात बुद्धीचे आणि समजुतीचे अधिष्ठान होते. थोडक्यात, त्यांनी आपल्या आचारधर्माची कल्पना दाखवून दिली. एक साधे जीवन जगण्यामध्येच खरी समृद्धी असल्याचे सोदाहरण स्पष्ट केले. ते लोकांना भेटत असत. उपदेश करत गावोगाव फिरत असत. आजही गाडगेबाबा संप्रदाय या माध्यमातून त्यांनी दिलेला उपदेश आणि केलेली लोकसेवा स्मरताना आणि त्याचा अनुनय करताना दिसतो. कार्य आणि विचार नेहमीच प्रेरणादायक राहतील. त्यांनी जीवनातील अडचणींचा सामना करत एक साधेपणाचे आणि समाजसुधारक व्यक्तिमत्त्व निर्माण केले. ते विचार आणि कार्य काळाच्या पुढे ठेवणारे संत होते. आजही गाडगेबाबांच्या जीवन आणि कार्याचा प्रभाव समाजावर आहे आणि तो तसाच राहील याची खात्री आहे.