रोखठोक
- दिनेश गुणे
chinese drone-sam pitroda कौरव आणि पांडव यांच्यातील न्यायाच्या लढाईचा निर्णायक क्षण समोर येऊन उभा ठाकलेला असताना, सभोवतीच्या सैन्याच्या महासागरात शत्रुपक्षाच्या बाजूने आपलेच आप्त, स्वकीय, ज्येष्ठ, गुरुजन आपल्याशी लढण्याकरिता सज्ज झाल्याचे पाहून धर्मक्षेत्र कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुनाची अवस्था केविलवाणी झाली. त्याचे धैर्य गळून पडले. अवसानही गळाले, जिभेला कोरड पडली, शरीराला भयाने कंप सुटला आणि आपण या स्वकीयांशी लढू शकणार नाही अशी त्याची खात्री पटली. त्या वेळी त्याच्या रथाचे सारथ्य करण्यासाठी श्रीकृष्ण नसता, तर महाभारतातील त्या निर्णायक क्षणाचे पारडे फिरले असते. श्रीकृष्णाने अर्जुनास धीर दिला, सत्याचा विजय होण्यासाठी लढले पाहिजे, समोर उभा असलेला प्रत्येकजण या क्षणी शत्रू आहे, एवढेच वास्तव श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मनावर बिंबविले आणि त्या रणभूमीवर अर्जुन लढाईसाठी सिद्ध झाला.
chinese drone-sam pitroda आपल्याच जवळच्या माणसांसोबत युद्ध करणे कोणत्याही संवेदनशील माणसासाठी किती अवघड असते, आपली बाजू न्यायाची आहे, सत्याची आहे हे माहीत असूनही न्यायाकरिता लढणेदेखील सोपे नसते, हे त्या क्षणाच्या इतिहासाने जगाच्या मनावर कायमचे कोरले आहे. तरीही, महाभारताच्या त्या रणभूमीवरचे काही प्रश्न अजूनही समाधानकारकरीत्या उकलले गेलेले नसावेत. पांडवांची बाजू न्यायाची आहे, धर्माची आहे, त्यामुळे या युद्धात त्यांचा विजय निश्चित आहे, हे माहीत असूनही भीष्म, द्रोणाचार्य आणि अन्य अनेक ज्येष्ठांनी कौरवांच्या बाजूने पांडवांशी युद्ध करण्याचा निर्णय का घेतला असावा, त्यांची त्या काळी अशी कोणती अपरिहार्यता असावी, याचे स्पष्ट उत्तर शोधावे लागते. या युद्धाच्या काळात एका क्षणी पांडवांचा ज्येष्ठ बंधू धर्मराज हादेखील वैफल्यग्रस्त झाला. आपल्याच आप्तांशी लढून राज्य मिळविण्यात आपल्याला कोणताही रस नाही, असे त्याचे उद्विग्न मन त्याला सांगू लागले, तेव्हा त्याला समजावण्यासाठी अर्जुन पुढे आला.
chinese drone-sam pitroda त्याआधी, या युद्धास प्रारंभ होण्याअगोदर श्रीकृष्णाने त्याला लढण्यासाठी प्रवृत्त केले होते. त्याने का लढले पाहिजे, हे स्पष्ट केले होते आणि सत्याचा विजय हाच अंतिम विजय असतो, हेदेखील अर्जुनास समजावून सांगितले होते. श्रीकृष्णाच्या या शिकवणुकीने प्रेरित झालेल्या अर्जुनाने धर्मराजाची वैफल्यावस्था ओळखून हाच मंत्र त्याला सांगितला. आपले सारे आप्त, स्वकीय, गुरुजन आपल्या शत्रूच्या बाजूने आपल्याशी युद्ध करण्यास सज्ज असले, तरी साक्षात श्रीकृष्ण आपल्यासोबत आहे, हे अर्जुनाने युधिष्ठिरास सांगितले. जेथे श्रीकृष्ण आहे, तेथे धर्म आहे आणि जेथे धर्म आहे, तेथे विजय निश्चित आहे - यतो कृष्णः ततो धर्मः, यतो धर्मस्ततो जयः - अशा शब्दांत अर्जुनाने युधिष्ठिरास युद्धप्रवृत्त केले आणि धर्माच्या, सत्याच्या विजयासाठी कटिबद्ध होऊन पांडवांनी कौरवांशी निकराचा लढा देऊन त्यांना पराभूत केले.
chinese drone-sam pitroda धर्माचा विजय झाला, सत्याचा विजय झाला. भीष्म, द्रोणाचार्य आदी ज्येष्ठांनाही हे माहीत होते. या युद्धात पांडवांची बाजू ही न्यायाची बाजू आहे आणि न्यायाच्या बाजूचा अंतिमतः विजय होतो, धर्माचा विजय होतो, हे माहीत असूनही ते कौरवांच्या बाजूने लढले व न्यायाचा विजय व्हावा यासाठी धरातीर्थी पडले. जेथे धर्म आहे, तेथे विजय आहे, ही महाभारताची शिकवण आहे. या महाकाव्यात याचा सातत्याने पुनरुच्चार झालेला आढळतो. म्हणूनच, आपल्या न्यायव्यवस्थेनेही ही शिकवण ध्येयवाक्य म्हणून स्वीकारली आणि न्यायाचा, धर्माचा विजय व्हावा यासाठी न्यायव्यवस्था सतर्क राहिली. महाभारतातील या कथानकाचा वर्तमानाशी असा धागा जुळलेला आहे. त्याहूनही अधिक म्हणजे, अशी अनेक साम्यस्थळे सध्याच्या काळात राजकारणाच्या संघर्षभूमीवर पाहावयास मिळतात आणि न्यायाचा विजय होणार हे माहीत असूनही, न्यायाच्या, धर्माच्या बाजूविरोधात लढण्यासाठी काहीजण सहजपणे शत्रूची भलामण करतात, तेव्हा याच कथानकाची आठवण होते.
chinese drone-sam pitroda ज्यांनी पांडवांना युद्धशास्त्र शिकविले, शस्त्रे चालविण्याचे ज्ञान दिले, त्या द्रोणाचार्यांशीच युद्ध करण्याची वेळ पांडवांवर आली, द्रोणाचार्यांनी दिलेले ज्ञान वापरूनच पांडवांनी त्यांच्यावरही शस्त्रे चालविली. सत्याचा विजय होतो, हे माहीत असूनही द्रोणाचार्य शत्रूच्या बाजूने युद्धभूमीवरचा किल्ला लढवत होते, हेच त्याचे कारण होते. आजही, राजकारणात अशी काही साम्यस्थळे आढळतात, तेव्हा त्याची संगती लावणे अवघड होते. सत्ताधाऱ्यांच्या, राज्यकर्त्यांच्या विरोधात बोलणे म्हणजे राष्ट्रद्रोह नव्हे, हे खरे आहे. पण सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या कोणत्याही देशहिताच्या विरोधात बोलून थेट किंवा अप्रत्यक्षपणे शत्रूचे हित सांभाळण्याच्या कृतीला काय म्हणावे असा प्रश्न पडण्यासारखी स्थिती अलिकडच्या राजकारणात वारंवार पाहावयास मिळते. आजच्या कुरुक्षेत्राचे रूप वेगळे आहे. राजकारण ही या युद्धाची रणभूमी आहे आणि सत्ताधारी व विरोधक यांच्यातील संघर्षाचे महाभारत ठायीठायी या रणभूमीवर पाहावयास मिळते.
chinese drone-sam pitroda सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष ही काही अनपेक्षित, अनाकलनीय बाब नाही. उलट, सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी विरोधकांनी आपली शस्त्रे सतत परजलेली असलीच पाहिजेत, असे लोकशाहीचे संकेतच आहेत. मात्र, विरोधकांचा विरोधही विधायक हवा, अशी लोकशाहीची अपेक्षा असते. ज्यामुळे देशहितास बाधा येईल, अशी भूमिका घेऊन सत्ताधाऱ्यांची कोंडी करणे या व्यवस्थेस मान्यच नाही. म्हणूनच, शत्रुपक्षाचे हितसंबंध जपले जातील अशी भूमिका घेत कोणी एखादा विरोधक जेव्हा सत्ताधाऱ्यांशी संघर्षाचा पवित्रा घेतो, तेव्हा राजकारणाच्या भुवया उंचावतात. अलिकडच्या काही घडामोडींतून तसेच काहीसे दिसू लागले. काँग्रेसचे सर्वेसर्वा नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची राजकीय भूमिका, राष्ट्रासंबंधीची काही मते अनेकदा वादग्रस्त ठरलेली आहेत. भारत हा राज्यांचा समूह आहे, ही त्यांनी देशातच नव्हे, तर विदेशाच्या भूमीवर जाऊन मांडलेली भूमिका देशाच्या अखंडत्वालाच आव्हान देणारी ठरली, तेव्हा राजकारणाच्या रणभूमीवर असेच वादळ माजले.
chinese drone-sam pitroda अशा भूमिका केवळ सत्ताधाऱ्यांच्या विरोधासाठी मांडल्या जात असल्या तरी त्यातून देशाचे हितसंबंध पणाला लागत असल्याने राहुल गांधींच्या या भूमिकेस प्रखर विरोध झाला. याच राहुल गांधींनी अलिकडेच केलेल्या एका वक्तव्यामुळे, महाभारतातील युद्धभूमीवर कौरवांच्या बाजूने लढणाऱ्या द्रोणाचार्यांची आठवण होणे साहजिक होते. आजच्या राजकारणाच्या रणभूमीवर राहुल गांधींनी ड्रोनच्या मुद्यावरून शत्रूच्या बाजूने किल्ला लढवत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. महाभारत काळात द्रोणाचार्यांच्या भूमिकेमुळे पांडव संभ्रमात पडले होते, आता राहुल गांधींनी घेतलेल्या चिनी ड्रोनसंबंधीच्या भूमिकेमुळे देश संभ्रमात पडला आहे. सत्ताधाऱ्यांना विरोध करताना राहुल गांधी अप्रत्यक्षपणे चीनसारख्या देशाची भारतात भलामण करत नाहीत ना, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. भारताच्या ड्रोन निर्मिती उद्योगासंबंधी वक्तव्य करताना राहुल गांधी यांनी चिनी बनावटीचे एक ड्रोन उडवून दाखविले.
chinese drone-sam pitroda या ड्रोनच्या वापरास भारतात बंदी असताना राहुल गांधी यांनी केलेल्या या कृतीवर अर्थातच देशात आणि राजकीय क्षेत्रात खळबळ माजली. भारतातील ड्रोन निर्मिती क्षेत्र तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीनपेक्षा कितीतरी मागे आहे, असा दावा करून चीनची भलामण करत देशातील उद्योग व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील मागासलेपणावर बोट ठेवण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न म्हणजे महाभारताच्या युद्धभूमीवर न्यायाच्या विरोधात लढणाऱ्या पांडवांच्या आप्तांच्या भूमिकेशी मिळताजुळताच असल्याने, या युद्धभूमीवर नवे महाभारत सुरू झाले आहे. प्रत्यक्षात ड्रोन निर्मिती क्षेत्रातील भारताचे तंत्रज्ञान आणि प्रगतीचे वास्तव राहुल गांधी सांगतात तसे नाही. ड्रोन निर्मिती क्षेत्रात तंत्रज्ञानाची भरारी मारण्यासाठी आणि चीनच्या ड्रोन उद्योगाशी स्पर्धा करण्यासाठी देशातील 400 हून अधिक संस्था व त्यांच्याशी संलग्न असलेल्या सुमारे 50 घटक संस्था कठोर परिश्रम करत असताना त्यांच्या श्रमाचा अपमान करून चीनची भलामण करण्यामागे राहुल गांधी यांचा नेमका कोणता उद्देश असावा, असा प्रश्न लगेचच उपस्थित झाला.
chinese drone-sam pitroda एक तर, बंदी असलेले चिनी बनावटीचे ड्रोन भारताच्या भूमीवर उडवून राहुल गांधी यांनी देशाच्या भूमिकेस आव्हान दिले आणि दुसरीकडे भारतीय उद्योग व तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर प्रश्नचिन्हे उमटवून चीनच्या प्रगतीचे पोवाडे गाऊन दाखविले. लोकशाहीस अपेक्षित असलेली राजकीय विरोधाची त्यांची भूमिका थेट देशहितास आव्हान देणारी ठरत नाही का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला. राहुल गांधी हे आता केवळ काँग्रेसच्या नेहरू, गांधी घराण्याच्या परंपरेनुसार काँग्रेसचे सर्वेसर्वा नेते नाहीत, तर ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्या कृती आणि उक्तीचे अनुसरण समाजातील एक वर्ग करत असतो. त्यामुळे ड्रोन निर्मिती क्षेत्रास भारताकडे काहीच नाही, चिनी बनावटीच्या ड्रोनच्या स्पर्धेत भारत अजून मागासलेलाच आहे, अशी विधाने करून त्यांनी या वर्गातही संभ्रम माजविल्याची भावना व्यक्त होऊ लागली. वैधानिक जबाबदारीच्या या पदावरून बोलताना विरोधाच्या भूमिकेसही काही वैचारिक बैठक असावयास हवी, अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली.
chinese drone-sam pitroda कोणीही एखादा नेता सत्ताधाऱ्यांना विरोध करण्यासाठी उठतो आणि या उद्योगाचा मुखभंग करून चीनची स्तुतिस्तोत्रे गाऊन दाखवितो, यामुळे या उद्योगात निराशा दाटू लागली. यामुळेच, ड्रोन फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष स्मित शहा यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याविषयी लगेचच तीव्र नाराजी नोंदविली. ज्या ड्रोनच्या वापरास भारताच्या भूमीवर बंदी आहे, असे चिनी बनावटीचे ड्रोन उडवून भारताच्या ड्रोन उद्योगाची खिल्ली उडविणे अतिशय निराशाजनक आणि अनाकलनीय आहे, अशा शब्दांत शहा यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. राहुल गांधी यांचे ड्रोनबाबतचे हे वक्तव्य केवळ चीनचे स्तुतिगान नसून भारताच्या आत्मनिर्भरतेच्या, स्वयंपूर्णतेच्या, तंत्रज्ञानाच्या आणि प्रगतीच्या वाटचालीवर उमटविलेले प्रश्नचिन्ह ठरले आहे. एकीकडे भारतीय तंत्रज्ञानाची भरारी चंद्रापर्यंत पोहोचली आहे, संरक्षण क्षेत्रात भारताने घडविलेल्या प्रगतीमुळे जगाचे डोळे विस्फारले आहेत आणि दुसरीकडे राहुल गांधी यांच्यासारखा विरोधी पक्षनेतेपदाची वैधानिक जबाबदारी असलेला नेता मात्र, या प्रगतीचे पंख कापण्यासाठी शाब्दिक शस्त्रे चालवत चीनची स्तुती करत आहे, हे चित्र खेदजनक आहे.
chinese drone-sam pitroda ड्रोन तंत्रज्ञान आणि त्याची आजच्या युगाची गरज ओळखून केंद्र सरकारने चार वर्षांपूर्वी, 2021 मध्येच या उद्योगास प्रोत्साहन देणारे धोरण आखले. त्यानंतर आज भारताने या क्षेत्रात साधलेल्या प्रगतीचे पंख विदेशांतही पोहोचले आहेत. भारतीय बनावटीचे ड्रोन केवळ भारतातच नव्हे, तर परदेशांतही निर्यात होऊ लागले असताना राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य केवळ अज्ञानापोटी होते, की चिनी ड्रोनच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी होते, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. भारतातील ड्रोन निर्मिती उद्योग आणि त्याच्या घटक कंपन्यांतून बॅटरी, प्रोपेलर, फ्लाईट कंट्रोलर, ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट यंत्रणा, असे अनेक भाग स्वतंत्रपणे तयार होत असून त्यांचा दर्जाही जागतिक स्तरावरील स्पर्धात्मक उत्पादनांएवढा श्रेष्ठ आहे. या उद्योगाची उलाढाल दोन हजार कोटींच्या घरात पोहोचली आहे. अशा परिस्थितीत, भारतातील ड्रोन उद्योगाकडे क्षमता नाही, दर्जा नाही असा दावा करण्यामागच्या राहुल गांधी यांच्या मानसिकतेचे विश्लेषण व्हायला हवे.
chinese drone-sam pitroda राहुल गांधी यांनी स्वदेशी तंत्रज्ञानास पाठिंबा देण्याऐवजी चीनच्या उत्पादनाची प्रशंसा का केली, ते चिनी उत्पादनाच्या वापरास प्रोत्साहन देत आहेत का, असे काही प्रश्नही या निमित्ताने निर्माण झाले आहेत. मुख्य म्हणजे, ज्या ड्रोनची त्यांनी प्रशंसाच नव्हे, तर प्रात्यक्षिकही करून दाखविले, त्या ड्रोनवर भारतात 2002 पासून निर्बंध असताना, हा ड्रोन राहुल गांधी यांच्याकडे कोठून आला, असाही प्रश्न विचारला जात आहे. ड्रोन चालविण्यासाठी रिमोट पायलट दाखला, परवान्याची गरज असते. दिल्लीच्या परिसरात ड्रोन चालविण्यास मनाई असताना, निषिद्ध क्षेत्रात हे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी राहुल गांधी यांच्याकडे तसा परवाना आहे का, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. चिनी बनावटीच्या याच ड्रोनचा वापर युक्रेन युद्धात झाला असून अनेक निरपराध नागरिकांच्या मृत्यूशी त्याचा संबंध असल्याची शंकाही उपस्थित केली जात असल्याने, राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दाही यातून समोर आला असल्याचा आक्षेपही घेतला जात आहे.
chinese drone-sam pitroda राहुल गांधी यांचे सल्लागार सॅम पित्रोदा यांनी तर या संदर्भात राहुल गांधी यांची थेट पाठराखण करून काँग्रेसचीदेखील हीच भूमिका असल्याचे संकेत दिल्याचे मानले जाते. त्यामुळे, गांधी कुटुंबाची चीनसोबतची जवळीक हा मुद्दा आता प्रामुख्याने अधोरेखित होऊ लागला आहे. या कुटुंबाने 2008 मध्ये चीनच्या कम्युनिस्ट पक्षासोबत गुप्त करार केल्याची चर्चा आहे. या कराराचा तपशील सार्वजनिक झालेला नाही. महाभारताच्या युद्धप्रसंगी कौरवांच्या बाजूने लढणारे द्रोण आणि सध्याच्या राजकीय युद्धात चीनच्या ड्रोनची स्तुतिस्तोत्रे गाणारे राहुल गांधी हे आधुनिक काळातील ड्रोनाचार्य ठरणार आहेत. भारताच्या प्रगतीवर प्रश्नचिन्हे उमटवून चीनच्या उत्पादनाची जाहिरात करणारे राहुल गांधी हे चीनचे ब्रॅण्ड ॲम्बेसेडर आहेत का, असा खोचक सवाल काही नेत्यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्या भूमिकांमुळे देशासमोरील कोणते प्रश्न सुटले किंवा कोणत्या भूमिकांमुळे कोणते प्रश्न वादग्रस्त ठरले, याचा लेखाजोखा मांडला जायला हवा!