मुंबई वार्तापत्र
- नागेश दाचेवार
महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीतील पराभव, अपयश, मतदारयादीतील अनियमितता, निवडणूक प्रक्रियेतील गैरव्यवहार आदी विषयांसंदर्भात चौकशी करण्यासाठी काँग्रेस पक्षाने एका "Eagle Group" ‘ईगल ग्रुप’ची स्थापना केली आहे. या ग्रुपचे संचालन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांच्या नेतृत्वात होणार आहे. हा ग्रुप सर्वांत पहिले महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीसंदर्भातील प्रक्रियेची चौकशी करणार आहे. यात नागपूरचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत, मध्यप्रदेशचे माजी मुखमंत्री दिग्विजय सिंह, अजय माकन, अभिषेक मनु सिंघवी, पवन खेडासारख्या लोकांचा समावेश सदर ग्रुप आपल्या कामाची सुरुवात १० फेब्रुवारीपासून करणार आहे. आता अशा पद्धतीच्या चौकशी समितीची स्थापना करण्याची काँग्रेसला गरज का पडली. आणि समिती स्थापन केलीच आहे म्हटल्यावर त्या समितीचे कार्य सुरू झाल्यानंतर त्यांनी अहवाल दाखल केल्यावर जे तथ्य समोर येईल ते जनतेसमोर आणण्यासाठी पत्रकार परिषद घेणे अपेक्षित असताना, त्याआधीच पत्रकार घेऊन काँग्रेस नेते राहुल गांधींना रडारड करण्याची घाई का झाली असावी?, असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर जवळपास २७ आमदार न्यायालयात गेले असल्याची आकडेवारी समोर आली आहे. आपले आमदार न्यायालयात दाद मागत आहेत, प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे, अद्याप न्यायालयाचा निकाल आलेला आपणच बनविलेल्या समितीचा अहवाल आलेला नसताना, सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांना सोबत घेऊन हवेत गोळीबार करण्याची लगीनघाई राहुल गांधींना का झाली? हा खरा प्रश्न आहे.
"Eagle Group" : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील मतदारांच्या यादीबाबत आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणूक आयोगाने काम करण्याची गरज असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त कसे, असा प्रश्नदेखील राहुल गांधींनी उपस्थित केला. हिमाचलप्रदेशच्या लोकसंख्येएवढे मतदार पाच महिन्यांत महाराष्ट्रातील मतदारयादीत वाढले असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी ३९ लाखांची तफावत असल्याचे म्हटले. तर, हाच आरोप राहुल गांधींनी ३ फेब्रुवारी रोजी लोकसभेत बोलताना केला, ७० लाखांची तफावत असल्याचे सांगितले होते. तर, १९ जानेवारी रोजी बोलताना गांधींनी १ कोटी मतदारांची तफावत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे राहुल गांधी मनाला वाटेल तेव्हा आपल्या मर्जीने आकडे सांगतात हे यावरून सिद्ध होते. राहुल गांधी यांना केवळ आरोप करून संभ्रम निर्माण करायचा आहे. त्यामुळे वाट्टेल तसे बरळत फिरतात. आणि तर त्यांच्या होला हो लावताना खासदार सुप्रिया सुळे, संजय राऊत हे देखील दिसले.
यातली गमतीची गोष्ट अशी आहे की, ईव्हीएमवर, निवडणूक प्रक्रियेवर अविश्वास दर्शविण्यासाठी बसलेल्या तीन व्यक्तींपैकी दोन जण अर्थात राहुल गांधी हे रायबरेली आणि वायनाड अशा दोन वेगवेगळ्या मतदारसंघांतून याच ईव्हीएमवर, समान प्रक्रियेद्वारे निवडून आले आहेत. त्यांची बहीणदेखील पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्याने याच आक्षेप असलेल्या ईव्हीएमवर निवडून आलेली आहे. त्यांच्या बाजूला बसलेल्या सुप्रिया सुळेदेखील याच ईव्हीएमवर निवडून आल्या आहेत. हे दोघे मिळून ज्या महाराष्ट्राच्या निवडणुकीवर वारंवार बोटं उचलत आहेत, त्याच निवडणुकीसोबत नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक झाली त्यात काँग्रेस जिंकली. ही तीच बिचारी अभागी ईव्हीएम होती. जिने एकाचवेळी विधानसभेत हरवलं लोकसभेत जिंकवलं... या निकालावर बोलताना राहुल गांधी कधी दिसले नाही आणि दिसणार नाही. कारण तेथे काँग्रेस जिंकल्यामुळे आपसूक निर्दोषत्वाचा शिक्कामोर्तब झाला, असे म्हणायला हरकत नाही. ज्या महाराष्ट्रात एवढे मतदार आले कुठून असा प्रश्न विचारला जात आहे, त्याच महाराष्ट्रातील नांदेड मतदारसंघात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीपेक्षा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत ७ टक्के मतदान वाढले तेथे काँग्रेसचा उमेदवार निवडून आला, हे कदाचित राहुल गांधींपर्यंत पोहचलेले दिसत नाही.
"Eagle Group" : ईव्हीएमबद्दल म्हणाल तर ते एक स्टॅण्ड अलोन (स्वतंत्र) मशीन आहे. ज्याच्यावर टॅम्परिंग शक्य नाही. ते हॅक करणं शक्य नाही. कारण ते स्टॅण्ड अलोन आहे. कुठल्याही नेटवर्कशी, फ्रिक्वेंशीशी त्याचा काहीही संबंध नाही. ईव्हीएमबद्दलचे जे सगळे प्रोटोकॉल्स आहेत. म्हणजे ऑफ ईव्हीएमचे प्रोटोकॉल, ट्रान्सपोर्टचे प्रोटोकॉल, स्टोरेजचे प्रोटोकॉल, वापर करण्याचे प्रोटोकॉल, सिक्युरिटीचे प्रोटोकॉल हे सगळे इतके कडक आहेत. त्याचे काटेकोरपणे पालन केले जाते. त्यामुळे ईव्हीएमध्ये काही गडबड, गोंधळ, हॅकिंग असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
ही प्रक्रिया राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्या प्रतिनिधींच्या समक्षच केली जाते आणि त्यांच्या स्वाक्षर्या त्यावर असतात. या चित्रीकरण सुद्धा केलेले असते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांचा त्यांच्या प्रतिनिधींच्या मार्फत सहभाग हे प्रशासकीय प्रोटोकॉलचं वैशिष्ट्य आहे. टेक्निकली तर ईव्हीएममध्ये गोंधळ होणं किंवा हॅक होणं, टॅम्परिंग होणं हे केवळ अशक्य आहे. जवळपास २४ वर्षांपासून भारतीय जनता गेल्या अनेक निवडणुकांमध्ये यशस्वीपणे ईव्हीएमचा वापर करत आहे. विविध निवडणुका आतापर्यंत घेण्यात आल्या आहेत. त्या वेगवेगळ्या पद्धतीने यशस्वी झाल्या आहेत. असे असताना विरोधी पक्ष वारंवार आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएमवर फोडताना दिसतात.
"Eagle Group" : ईव्हीएम, मतदार वाढले, सहा वाजेनंतर मतदान कसे वाढले याचं निवडणूक आयोगानं वारंवार स्पष्टीकरण दिलं आहे. मतदारयादीबाबत आयोगाकडून उत्तरं दिलेली आहेत. आता पुन्हा न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. न्यायालयाने उत्तर दाखल करायला सांगितले आहे. न्यायालयाप्रमाणेच निवडणूक आयोग स्वायत्त असल्याने, ते न्यायालयासमोर चुकीची माहिती सादर करणार नाही अशी अपेक्षा आहे. तरीदेखील काही चुकीचं सादर केलंच तर, न्यायालय ते लगेच पकडेल आणि ‘दूध का दूध पानी का पानी करेल.’ पण यांचा विश्वास निवडणूक आयोगावर नाही, यांचा विश्वास न्यायपालिकांवर देखील आणि हास्यास्पद बाब म्हणजे स्वतःच निर्माण केलेल्या ‘ईगल ग्रुप’वर देखील यांचा विश्वास नाही. तो असता तर ‘ईगल ग्रुप’चा अहवाल आल्यानंतर राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली असती. पण यावेळी पत्रकार परिषद घेण्याची राहुल गांधींची घाई कदाचित दिल्लीत त्यांचा प्रचंड पराभव होत असल्यानं कव्हर फायरिंगसाठी असावी. कारण आजपर्यंतचा अत्यंत लाजिरवाणा पराभव राहुल गांधींच्या नेतृत्वात होत असल्याचा अंदाज त्यांना आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीचे अपयश ईव्हीएमच्या पदराआड लपवण्याचा हा राहुल गांधींचा प्रयत्न दिसतो. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘‘जब एक ही चुटकुला बार-बार सुनाया जाए तो उसपर हंसा नहीं करते...’’ अशा किमान शब्दांत कमाल अपमान करून, ‘ईगल ग्रुप’चे सर्वोच्च नेते राहुल यांच्या पत्रकार परिषदेची हवा काढून टाकली, हे मात्र निश्चित!
- ९२७०३३३८८६