वेध
- नीलेश जोशी
Mobile problems : जग चहुबाजूंनी होत असलेल्या भौतिक प्रगतीमुळे गतिमान झाले आहे. प्रवास किती दिवसांचा याऐवजी आता किती तासांचा अशी विचारणा अगदी विदेशवारी असेल तरी होते. काही तासांतच जगातील कुठल्याही देशात पोहोचणे होते इतकी दळणवळण सुविधा अद्ययावत आहे. एवढेच नव्हे, तर शेकडो मैलांवर असलेल्या आप्तांसोबत संवाद साधणारा दूरध्वनीचा १००-१२५ वर्षांचा इतिहास मागे पडून केव्हा भ्रमणध्वनी अर्थात मोबाईल हातात आला ते या प्रगतीच्या गतीत कळलेच नाही. मोबाईलमुळे चालता-फिरता होणार्या संवादाचे अप्रूप संपण्यापूर्वीच अशक्य वाटावा, असा दृश्यसंवाद सहज झाला आहे. सोबतच समाजमाध्यम नावाचे आभासी जग या क्रांतीमुळे जन्माला आले. परिवर्तन सृष्टीचा नियमच; त्यातही हे परिवर्तन तर प्रगतीची नवनवीन द्वारे खुले करणारे असल्याने त्याचे स्वागतच केले पाहिजे. पण या बदलाचे समाज जीवनावर होणार्या चांगल्या आणि वाईट बाबींचे समीक्षण करण्याची वेळ आता आली आहे. आवश्यक सुविधांसाठी मोबाईल अनेकदा गरजेचा असतो. पण जर मोबाईल मिळाला तर जीवन व्यर्थ आहे, असा समज करून आत्महत्या करण्याइतकी निकड मोबाईलची आहे का, असा प्रश्न पडावा अशा घटना सभोवताल घडत आहेत.
Mobile problems : नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात असलेले मीनकी हे छोटेसे गाव. या गावात पैलवार कुटुंबीय राहतात. कुटुंबातील ओंकार हा लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे आश्रमशाळेत शिक्षण घेत होता. दहावीत असलेल्या ओंकारची परीक्षा सुरू होणार होती. त्या आधी त्याने गावी येऊन वडिलांकडे मोबाईलची मागणी केली. शेतीवर उदरनिर्वाह असलेल्या वडिलांना लगेच मोबाईल घेऊन देणे शक्य नव्हते. त्यांनी पैसे नसल्याने आता मोबाईल घेऊ शकत नाही, असे सांगितले. नाराज होऊन ओंकार घरातून बाहेर पडला. दुसर्या दिवशी पहाटे वडील राजेंद्र शेती कामासाठी शेतावर पोहोचताच त्यांच्या वाळूच सरकली. लाडक्या ओंकारने गळफास लावून आत्महत्या केली होती. हे दुःख असह्य झालेल्या राजेंद्र यांनी ओंकारचे कलेवर खाली काढले आणि मुलाने आत्महत्या केलेल्या दोराने स्वतः गळफास लावून जीवन संपविले. हृदय पिळवटून टाकणार्या या घटनेनंतर मन सुन्न झाले. ही आणि अशा प्रकारच्या म्हणजेच मोबाईल न मिळाल्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याच्या वारंवार घडत असल्याचे दिसून येते. कधी नववी, कधी पाचवी तर कधी नुकताच तारुण्यात पदार्पण करणारे अनेक जण केवळ मोबाईल न मिळाल्याने मृत्यूला कवटाळतात. खरंच मोबाईल इतका जीवनावश्यक आहे का? तरुण आणि किशोरवयीन मुलांमध्ये दिसून येणारी ही समस्या नेमकी का उद्भवते, याचा विचार करून त्याचे निरसन करणे आवश्यक आहे. आजकाल मीडिया आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे बालवयापासूनच मुलांना ऑनलाईन राहण्याचा छंद जडला आहे. समाजमाध्यमातून लाईक, कमेंट, फॉलोवर आदी बाबी या वयातील मुलांना प्रतिष्ठेच्या वाटतात. मग आभासी असली, तरी ही ‘ऑनलाईन प्रतिष्ठा’ मोबाईल न मिळाल्यास धोक्यात आल्यासारखी वाटून त्यातूनच काही जण टोकाचा निर्णय घेतात, असे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण मुळात भारतीय पद्धती, कुटुंब व्यवस्था, कुटुंब संस्कार ही बलस्थाने असताना उद्भवणारी ही समस्या अधिक क्लेशदायी आहे.
Mobile problems : भौतिक प्रगतीच्या गतीमध्ये कुटुंबातून सहज होणारा संस्कार हरवत असल्याची चर्चा नेहमीच होते. यात संयुक्त कुटुंब पद्धतीपासून त्रिकोणी कुटुंबापर्यंतच्या प्रवासात व्यक्तिमत्त्व जडणघडण, जीवनमूल्यांची शिकवण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मनमोकळा होणारा संवाद जवळपास थांबला असल्याची खंत अनेक व्यक्त करतात. भौतिक प्रगतीच्या धुंदीत जीवनमूल्यांंची शिकवण, संस्कारांची रुजवण आणि कुटुंबातील संवाद याच्या दुर्लक्षाचे दुर्दैवी द़ृश्य परिणाम वेदनादायी ठरत आहेत. अर्थार्जनासाठी ऊर फाटेस्तोवर धावणे आणि केवळ ‘करीअर’ हेच जीवन असे पाल्यांच्या मनावर बिंबविणे घातक ठरत आहे. भौतिक प्रगतीची गती सतत वाढत जाणार आहे. मात्र प्रगती कितीही झाली तरी भारतीय रुजवण आणि कुटुंबातील सहज मोकळा संवाद याची उपयोगिता कधीही न संपणारी आहे. म्हणूनच प्रत्येक कुटुंबाने पुढच्या पिढीत जीवनमूल्यांची रुजवण आणि मोकळा संवाद साधावा एवढेच.
- ९४२२८६२८४८