नागपूर,
Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागातील विद्यार्थी सुचिता गुलाबराव वाघमारे या विद्यार्थिनीने आयआयटी बॉम्बे येथे आयोजित पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. सुचिताने ‘अॅडव्हान्सड अॅनालिटिकल इन्स्ट्रुमेंट्स इन रिसर्च अँड इंडस्ट्री’ या कार्यशाळेतील पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत तिसरे स्थान मिळवून विद्यापीठाचा नावलौकिक वाढविला आहे. आयआयटी बॉम्बे येथील सॉफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट्स अँड फॅसिलिटीजच्या वतीने भारतीय राष्ट्रीय अभियंता अकादमी यांच्या सहकार्याने फेब्रुवारी महिन्यात पार पडली.
संपूर्ण भारतातून या कार्यशाळेत २०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता. यातील ६० विद्यार्थ्यांना पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेसाठी निवडण्यात आले होते. यामधून १२ अंतिम विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यात सुचिता वाघमारे हिने "ब्लॉक कोपोलायमर कॉंज्युगेटेड मिसलेस फॉर टार्गेटेड डिलिव्हरी ऑफ अँटीकॅन्सर एजंट्स" या विषयावर उत्कृष्ट संशोधन सादर करीत तिसरे स्थान पटकाविले. सुचिता वाघमारे हिने डॉ. प्रमोद बी. खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य केले आहे. या संशोधन कार्याबाबत सुचिताने प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, औषधी निर्माणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रशांत पुराणिक, डॉ. राजेंद्र काकडे, डॉ. प्रफुल्ल साबळे यांचे सहकार्य प्राप्त झाल्याने आभार व्यक्त केले आहेत. सुचिता वाघमारे हिला उत्कृष्ट संशोधनाबाबत पुरस्कार प्राप्त झाल्याने औषधी निर्माणशास्त्र विभागातील शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.