गुजरात,
Crane accident on site गुजरातमधील अहमदाबादजवळ बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या साइटवर रविवारी रात्री (२३ मार्च) 'सेगमेंटल लाँचिंग गॅन्ट्री'ला अपघात झाला. काँक्रीट गर्डर लाँचिंगनंतर गॅन्ट्री मागे हटत असताना ती आपल्या जागेवरून हलली. यामुळे लगतच्या रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. या अपघातामुळे किमान २५ गाड्या रद्द, १५ गाड्या अंशतः रद्द तर ६ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल)ने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वटवा येथे घडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा विद्यमान संरचनेचे कोणतेही नुकसान झालेले नाही.अहमदाबाद रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बाधित रेल्वे मार्गावरील 'गॅन्ट्री' हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, लवकरात लवकर रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. क्रेनच्या मदतीने रेल्वे ट्रॅक पुन्हा कार्यरत करण्याचे काम सुरू आहे.
या गाड्या रद्द करण्यात आल्या
या अपघातामुळे वटवा आणि अहमदाबाद स्थानकांदरम्यानच्या डाउन लाईनवरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. रद्द झालेल्या गाड्यांमध्ये पुढील गाड्यांचा समावेश आहे
वटवा-बोरिवली एक्सप्रेस
अहमदाबाद-मुंबई सेंट्रल एक्सप्रेस
वडोदरा-वटवा इंटरसिटी
अहमदाबाद-वलसाड गुजरात क्वीन
जामनगर-वडोदरा इंटरसिटी
वडनगर-वलसाड-वडनगर एक्सप्रेस
वटवा-आनंद मेमू
गाड्यांचे मार्ग बदल
काही गाड्या वळवलेल्या मार्गावरून धावणार आहेत. त्यामध्ये खालील गाड्यांचा समावेश आहे:
श्री माता वैष्णोदेवी कटरा-जामनगर एक्सप्रेस (२३ मार्च) ही रतलाम-चित्तोडगड-बेडाच-उदयपूर सिटी-हिंमतनगर-अहमदाबाद-विरमगाम मार्गे धावेल.
पुणे-भगत की कोठी एक्सप्रेस (२३ मार्च) ही वडोदरा-रतलाम-चंदेरिया-अजमेर-मारवाड मार्गे धावेल.
ओखा-गोरखपूर एक्सप्रेस (२३ मार्च) ही अहमदाबाद-असरवा-हिम्मतनगर-उदयपूर-रतलाम मार्गे धावेल.
अहमदाबाद-दानापूर विशेष गाडी (२४ मार्च) ही अहमदाबाद-असरवा-हिम्मतनगर-उदयपूर-रतलाम मार्गे धावेल.
एनएचएसआरसीएलचे वरिष्ठ अधिकारी, पोलिस आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.